पुणे जिल्ह्यात सर्वदूर पूर्वमोसमी पाऊस 

​ पुणे जिल्ह्याच्या विविध भागांना रविवारी (ता.२) सायंकाळी झालेल्या अवकाळी आणि गारांच्या पावसामुळे झोडपले. जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, पुरंदर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा इंदापूर, दौंड बारामती आदी तालुक्यांमधील काही भागांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पूर्वमोसमी पाऊस  Pre-monsoon rains all over Pune district
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पूर्वमोसमी पाऊस  Pre-monsoon rains all over Pune district

पुणे : जिल्ह्याच्या विविध भागांना रविवारी (ता.२) सायंकाळी झालेल्या अवकाळी आणि गारांच्या पावसामुळे झोडपले. यामध्ये जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, पुरंदर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा इंदापूर, दौंड बारामती आदी तालुक्यांमधील काही भागांचा समावेश आहे. या वादळी आणि गारांच्या पावसामुळे आंब्यासह विविध पिकांचे नुकसान झाले. तर नसरापूर येथे वीज कोसळून दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 

जुन्नर तालुक्यात शहरासह ओतूर, नारायणगाव आळेफाटा, गोळेगाव लेण्याद्री आदी परिसराला पावसाने झोडपले. आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात रविवारी सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील कांदे, गवार, उन्हाळी बाजरी, मका व आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. वीटभट्टीवरील मातीच्या कच्च्या विटा पावसाने भिजून फुटल्याने वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  तालुक्याच्या पूर्वभागातील अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, पोंदेवाडी, जारकरवाडी, टाव्हरेवाडी, खडकवाडी, पारगाव, काठापूर बुद्रूक, लाखणगाव, देवगाव, लोणी, धामणी परिसरात रविवारी सायंकाळी अवकाळी पावसामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने नुकसान झाले आहे.  उन्हाळी बाजरी व मका पीक वादळी वाऱ्याने भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर आंब्याच्या कच्च्या कैऱ्या वाऱ्यामुळे गळून पडल्याने मोठे नुकसान झाले  धामणी, वैदवाडी, जारकरवाडी परिसरात असलेल्या वीटभट्टीवरील मातीच्या कच्च्या विटा पावसाने भिजून फुटल्याने वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वीटभट्टी व्यवसायिकांना एप्रिल महिन्यात तीन ते चार वेळा अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे.  गारांच्या पावसामुळे पुरंदरमध्ये नुकसान  साकुर्डे (ता. पुरंदर) येथे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. रविवारी (ता. २) दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. सव्वा दोनच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाळा सुरुवात झाली. सुमारे पाऊण तास पाऊस पडत होता. पावसाचा आणि वाऱ्याचा वेग एवढा होता की अनेक ठिकाणी झाडे जमीनदोस्त झाली. साकुर्डे, बेलसर, नाझरे, कोळविहिरे, खळद, शिवरी, वाळुंज, निळुंज परिसरात फळबागांचे मोठे नुकसान झाले. आंब्यांच्या झाडांची फळे गळून पडली. कांदा पिकासह नगदी पिकांचे, चारा पिकांचे नुकसान झाले.  भोरला पावसाने वीजपुरवठा खंडित  वादळी पावसामुळे रविवारी (ता. २) दुपारी भोर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात विजेच्या तारा तुटल्या आणि काही ठिकाणी खांबही कोसळले. त्यामुळे शहरासह तालुक्याच्या वीसगाव आणि चाळीसगाव खोऱ्यातील वीजपुरवठा खंडित झाला. पावसाळ्यापूर्वीची विजेची कामे करावयाची असल्यामुळे मागील १५ दिवसांपासून महावितरणकडून काही तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे.

रोजच्या पावसामुळे त्यात अधिकच भर पडत आहे. रविवारी सकाळपासून महावितरणने विजेच्या कामासाठी शहराचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यातच दुपारी शहरातील संजयनगर भागातील विजेच्या हाय टेन्शन पाइनच्या तारा तुटल्या. त्यामुळे रविवारी दिवसभर शहराचा वीजपुरवठा खंडित होता. महावितरणचे शाखाधिकारी सचिन राऊत यांनी कर्मचाऱ्यांसह जाऊन पावसातच काम करण्यास सुरुवात केली. सायंकाळी उशिरापर्यंत तारांच्या जोडणीचे काम सुरू होते. वीसगाव खोऱ्यातही विजेच्या तारा व खांब कोसळले आहेत. महावितरणकडून तेथेही काम सुरू आहे.  वीज कोसळून दोन मुलींचा मृत्यू  नसरापूर चेलाडी येथील आदिवासी कातकरी वस्तीजवळ वादळी  वाऱ्यासह आलेल्या पावसात वीज कोसळून दोन लहान मुलींचा जागीच मृत्यू झाला तर एक मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. सीमा अरुण हिलम (वय ११), अनिता सिकंदर मोरे (वय ९) व चांदणी प्रकाश जाधव (वय ९) या तिघी छोट्या टेकडीवरील मोठ्या दगडा जवळ खेळत असताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आभाळ भरून येऊन गडगडत होते. या दरम्यान विजांचा मोठा आवाज होत, वीज मुली खेळत असलेल्या ठिकाणीच पडली. यामध्ये सीमा हिलम व अनिता मोरे या दोघी जागीच ठार झाल्या तर चांदणी प्रकाश जाधव ही मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com