पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढ

पुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी कांदा लागवडीकडे वळत आहे. रब्बी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी पीक बदल केला आहे. रब्बी कांद्याच्या लागवडीच्या क्षेत्रात तुलनेने ३० हजार हेक्टरने वाढ झाली आहे.
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढ
Rabbi in Pune division Increase in onion cultivation

पुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी कांदा लागवडीकडे वळत आहे. रब्बी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी पीक बदल केला आहे. रब्बी कांद्याच्या लागवडीच्या क्षेत्रात तुलनेने ३० हजार हेक्टरने वाढ झाली आहे. पुणे विभागात हंगामात दोन लाख ४९ हजार ७२२ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. 

गतवर्षी रब्बीत याच कालावधीमध्ये २ लाख २१ हजार ६२७ हेक्टर लागवड झाली होती. तुलनेत ३० हजार हेक्टरने वाढ झाली आहे. चालू वर्षी परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे वाफसा न झाल्याने शेतकऱ्यांनी इतर पिकांऐवजी कांदा पिकांकडे मोर्चा वळवला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून कांद्याला बऱ्यापैकी दर मिळत आहे.

अनेक शेतकऱ्यांनी हरभरा, कांदा भाजीपाला पिके घेण्यावर भर दिला आहे. रब्बी कांदा तीन ते चार महिन्यांत काढणीस येत असून पाण्याचा ताण पडला तरी हातात अपेक्षित उत्पादन हाती येईल या उद्देशाने अनेक शेतकरी कांदा लागवडीकडे वळाले आहेत. शेतकरी वर्षभरामध्ये खरीप, लेट खरीप, रब्बी (उन्हाळी) हंगामात कांद्याची लागवड करतात. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये कांद्याची लागवड केली आहे.

पुणे विभागातील नगर जिल्ह्यात श्रीगोंदा, कोपरगाव, राहुरी, नेवासा, कर्जत, पाथर्डी, नगर या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली आहे. पारनेर तालुक्यात सर्वाधिक २९ हजार ७१० हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. जामखेड, शेवगाव, अकोले, राहाता या तालुक्यात कमी लागवडी झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सर्वाधिक १५ हजार ५६१ हेक्टरवर लागवड झाली आहे.

जुन्नर, खेड, बारामती, दौंड, पुरंदर, आंबेगाव, इंदापूर या तालुक्यांतही बऱ्यापैकी लागवड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, माढा, उत्तर, दक्षिण सोलापूर, करमाळा या तालुक्यांत बऱ्यापैकी कांदा लागवडी झाल्या आहेत. पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, उत्तर सोलापूर या तालुक्यात कमी प्रमाणात लागवडी झाल्या  आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.