पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची पिके

विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांत सरासरी १० लाख ८६ हजार ६१० हेक्‍टरच्या तुलनेत १४ लाख ८६ हजार ६९७ हेक्‍टरवर रब्बी पेरणी झाली आहे.
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची पिके
Rabi crops on 14 lakh hectares in five districts

लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांत सरासरी १० लाख ८६ हजार ६१० हेक्‍टरच्या तुलनेत १४ लाख ८६ हजार ६९७ हेक्‍टरवर रब्बी पेरणी झाली आहे. सरासरीच्या १३७ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झालेल्या या पिकांवर गत काही दिवसांपासून प्रतिकूल हवामानाचा परिणाम दिसून येत आहे. हरभऱ्यावर काही ठिकाणी पाने खाणारी अळी तर रब्बी ज्वारी व मकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

यंदाच्या रब्बी हंगामासाठी लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र ३ लाख ७० हजार ५९९ हेक्‍टर आहे. त्या तुलनेत ३ लाख ९ हजार ३२२ हेक्‍टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली. सरासरीच्या ८३ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झालेली रब्बी ज्वारी दाणे भरण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र १ लाख २७ हजार ५७८ हेक्‍टर असून त्या तुलनेत प्रत्यक्षात १०६ टक्‍के अर्थात १ लाख ३५ हजार ४३१ हेक्‍टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. 

पोटरी व दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या या पिकांची स्थिती समानाधानकारक आहे. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र ५ लाख १६ हजार १४० हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्षात १० लाख २१ हजार ७४६ हेक्‍टर अर्थात १९८ टक्‍के क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. फुलोरा व घाटे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या हरभऱ्याच्या पिकावर ढगाळ हवामान व धुक्‍यामुळे संकटाचे ढग जमा झाले आहेत. काही प्रमाणात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 

शिवाय उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील हरभऱ्यावर काही ठिकाणी पाने खाणाऱ्या अळीचाही प्रादुर्भाव आढळून आला आहे. मका पिकाचे सरासरी क्षेत्र २२०३५ हेक्‍टर असताना प्रत्यक्षात १७११७ हेक्‍टरवर म्हणजे ७८ टक्‍के क्षेत्रावर मकाची पेरणी झाली. कणसे लागण्याच्या अवस्थेतील मका पिकावर काही ठिकाणी अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. करडईचे सरासरी क्षेत्र ३६ हजार ६१६ हेक्‍टर असताना प्रत्यक्षात १३४५४ हेक्‍टरवर करडई पेरणी झाली.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.