राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी

पाऊस
पाऊस

पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर पावसाला सुरवात झाली आहे. शनिवारपासून आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ होताच पावसाच्या सरींनी जोर धरल्याने खरिपाच्या अशा पल्लवित झाल्याने पेरण्यांना वेग येणार आहे. सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील वेंगुर्ला येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर पाऊस झाला, मध्य महाराष्ट्रातील शिरपूर (जि. धुळे) येथे ११० मिलिमीटर, मराठवाड्यातील वाशी (जि. उस्मानाबाद) येथे ११० मिमी आणि उदगीर येथे ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.   सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. शिराळा, वाळवा, कडेगाव, तासगाव तालुक्यांत जोरदार; तर पलूस, खानापूर, कवठे महांकाळ, जत, आटपाडी तालुक्यांत तुरळक पाऊस पडला. पावसामुळे भुईमूग, सोयाबीन आदी पेरण्यांना गती येण्याची चिन्हे आहेत. दुष्काळाने होरपळत असलेल्या पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. सातारा शहरासह शाहूपुरी, संभाजीनगर, गोडोली, कोडोली, खेड, माहुली, शेंद्रे, नागठाणे परिसराला पावसाने झोडपून काढले. पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, पेरणीपूर्व व पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.  कोरडवाहू पट्ट्यातील बारामती, शिरूर, इंदापूर, दौंडसह, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात रविवारी (ता. २३) दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसानंतर वाफसा मिळताच खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे. बुलडाणा, नांदुरा, मोताळ्यातील काही भागात दमदार पाऊस... पहा Video पावसामुळे ऊस, टोमॅटो, भाजीपाल्यासह उन्हाळी पिकांना जीवदान मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ, माळशिरस तालुक्‍यांमध्ये पावसाला सुरवात झाली. नगर जिल्ह्यात रविवारी सलग दुसऱ्या दिवशी पाऊस पडला. पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव, शेवगाव तालुक्यातील बोधेगाव मंडळात सर्वाधिक पाऊस झाला. पश्चिम भागातील अकोले तालुक्यात मात्र अजूनही पाऊस सुरू झालेला नाही, खानदेशातील धुळे जिल्ह्यासह जळगाव, नंदुरबारात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. काही शेतकऱ्यांनी धूळपेरणी झालेल्या भागात पावसामुळे दिलासा मिळला आहे.  मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील उस्मानपुरा, फुलंब्री, वडोदबाजार, नागमठाण येथे दमदार पाऊस झाला. नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कमी होता. शिरूर कासार तालुक्‍यातील वारणी (जि. बीड) येथील नागनाथ सेवाभावी संस्थाच्या छावणीत वीज पडून दोन म्हशी, एक बैल व दोन वासरांचा मृत्यू झाला. वऱ्हाडातील बुलडाणा, अकोला, वाशीम या तीनही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. बुलडाणा तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर आला. पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळण्याची चिन्हे आहेत.  सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत : हवामान विभाग)  कोकण : वेंगुर्ला १४०, दोडामार्ग ६०, वैभववाडी, मालवण, भिरा, कणकवली प्रत्येकी ५०, कुडाळ, महाड प्रत्येकी ३०, माणगाव, उरण, श्रीवर्धन प्रत्येकी २०. मध्य महाराष्ट्र : शिरपूर ११०, तळोदा ७०, जावळी मेढा ६०, कराड, सोलापूर प्रत्येकी ५०, जामनेर, सिंधखेड प्रत्येकी ४०, अमळनेर, दहिवडी, जामखेड, मालेगाव, पन्हाळा, पाथर्डी, शेवगाव, शिराळा, शिरोळ, तासगाव, विटा, वाई प्रत्येकी ३०, कवठेमहांकाळ, कोल्हापूर, कोरेगाव, महाबळेश्वर, मंगळवेढा, मिरज, पंढरपूर, सातारा प्रत्यकी २०.मराठवाडा : वाशी ११०, उदगीर ९०, केज, सेलू प्रत्येकी ७०, नांदेड ६०, उमरगा ५०, आष्टी, गेवराई, निलंगा, शिरूर कासार, उमरी प्रत्येकी ४०, भोकरदन, धारूर, शिरूर अनंतपाळ, सोयेगाव प्रत्येकी ३०, अर्धापूर, जालना, खुलताबाद, मानवत, मुखेड, उस्मानाबाद, पाथरी, पाटोदा प्रत्येकी २०.विदर्भ : बुलडाणा, रामटेक, तुमसर प्रत्येकी ५०, सेलू, शेगाव प्रत्येकी ४०, अकोला, चांदूर, नांदुरा, परतवाडा, संग्रामपूर, तेल्हारा, तिरोडा प्रत्येकी ३०, अमरावती, गोरेगाव, हिंगणा, जळगाव जामोद, कळमेश्वर, कामठी, कोपर्णा, मौदा, उमरेड, प्रत्येकी २०.  कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस शक्य मॉन्सूनने राज्याचा बहुतांशी भाग व्यापल्यानंतर राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. आज (ता. २५) कोकणात काही ठिकाणी अति जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळणार आहेत. तर, विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com