राज्यात पावसाचा जोर ओसरला 

कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून धुव्वाधार पाऊस बरसल्यानंतर काही प्रमाणात जोर ओसरला आहे.
river
river

पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून धुव्वाधार पाऊस बरसल्यानंतर काही प्रमाणात जोर ओसरला आहे. शुक्रवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंत रायगडमधील माथेरान येथे सर्वाधिक १७८.४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी दिवसभर ऊन पडल्याची चित्र होती. 

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असला तरी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र काही प्रमाणात सोसाट्याचे वारे वाहत आहेत. पाऊस ओसरल्यामुळे सिंधुदुर्गामधील तिलारी नदी  वगळता इतर नद्यांच्या पाणीपातळीत घट होत आहे. तिलारी नदीची पाणीपातळी अजुनही इशारा पातळीनजीक आहे. वादळीवाऱ्यांमुळे घरे, गोठ्यांच्या पडझडीत वाढ होताना दिसत आहे. रत्नागिरीत पुराचे पाणी भात खाचरात कायम राहिल्यामुळे  नदीकिनारी भागात नुकसान झाल्याची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे कोल्हापुरातील धरणांतून नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने नद्यांचे पाणी अजूनही वाढत आहे. जिल्ह्यातील २३ गावांतील दोन हजार कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले होते. सांगली, साताऱ्यातील अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरू होता. महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा, कऱ्हाड, वाई या तालुक्यात जोर अधिक होता. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगावमध्ये बऱ्यापैकी पाऊस होता. खडकवासला, भाटघर, पवना, गुंजवणी, वीर या महत्वाच्या धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सोलापूर, नगर, नाशिक, खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या भागातही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. 

गेल्या दोन ते तीन दिवस मराठवाड्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यानंतर शुक्रवारी पावसाने उघडीप दिली. विदर्भातील अकोला व गडचिरोलीमधील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या.  १०० मिलिमीटरहून अधिक पावसाची ठिकाणे  माथेरान १७८.४, वाडा १०५, भिरा १५७, महाड १४७, पोलादपूर १२६, रोहा ११८.२, तळा १०६,मंडणगड १४०, चंदगड ११८, गगणबावडा १२२, राधानगरी १४७, इगतपुरी १०८, लोणावळा कृषी १४४.४, महाबळेश्वर १५३.६,  शुक्रवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिमीमध्ये)  कोकण : सांताक्रुझ ७९.२, वसई ५७, विक्रमगड ७३, कर्जत ५१.२, खालापूर ४७, माणगाव ६८, म्हसळा ५८, मुरूड ६७, पेण ८०, सुधागडपाली ८८, चिपळूण ४४, गुहागर ७३.४, हर्णे ७३.४, खेड ४२, राजापूर ४५, संगमेश्वर ६३, दोडामार्ग ४०,  सावंतवाडी ७०, वैभववाडी ४०, अंबरनाथ ९२, भिवंडी ५५, कल्याण ७६, शहापूर ४८, ठाणे ५९, उल्हासनगर ८८.  मध्य महाराष्ट्र : आजरा ९७, पन्हाळा ९०, शाहूवाडी ६७, त्र्यंबकेश्वर ७०, पौड ६५, वेल्हे ९५.  विदर्भ : अहेरी २४.२, एटापल्ली १७.३.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com