
नारायणगाव, जि. पुणे : कोरोना महामारी, बेरोजगारी व महागाई यामुळे जनता होरपळत असताना पेट्रोल, डिझेल व घरगुती वापराचा गॅस या इंधनाची दरवाढ करून केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला नाही, अशी टीका शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नारायणगाव येथे केली.
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ तालुका शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी (ता. ५) पुणे नाशिक महामार्गावर आंदोलन केले. या वेळी माजी खासदार आढळराव पाटील यांनी केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या धोरणाचा निषेध केला.
शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, सरपंच योगेश पाटे, रशीद इनामदार यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटे, बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, संभाजी तांबे, जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव पारखे, संतोष वाजगे, मंगेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटे, राजेश बाप्टे आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले, ‘‘कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून, महागाईमुळे शेतकरी सर्वसामान्य नागरिक अडचणीत आहेत. या परिस्थितीत अर्थसंकल्पात केंद्र सरकार जीवनावश्यक इंधनाच्या किमती कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देईल, अशी अपेक्षा होती. मात्र केंद्र सरकारने इंधन दरात मोठी वाढ करून जनतेवर अन्याय केला आहे.
केंद्र सरकारने राज्य शासनाचे तीन लाख कोटी रुपये अडकवून ठेवून मोठा अन्याय केला आहे. इंधन दरवाढ तातडीने मागे न घेतल्यास या पुढील काळात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या वेळी त्यांनी दिला. या वेळी तालुका प्रमुख खंडागळे, इनामदार, काकडे, सह्याद्री भिसे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन हेमंत कोल्हे यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.