कार्बन कमी करण्यासाठी  बांबू लागवड हाच पर्याय ः पाशा पटेल  

पृथ्वीवरील कार्बनचे वाढते प्रमाण ही गंभीर समस्या असून, त्यापासून मानव जातीला मोठा धोका आहे. कार्बन कमी करायचा असेल तर बांबू पिकाची लागवड हाच एकमेव पर्याय आहे.
कार्बन कमी करण्यासाठी  बांबू लागवड हाच पर्याय ः पाशा पटेल   
To reduce carbon Bamboo planting is the only option: Pasha Patel

पुणे ः पृथ्वीवरील कार्बनचे वाढते प्रमाण ही गंभीर समस्या असून, त्यापासून मानव जातीला मोठा धोका आहे. कार्बन कमी करायचा असेल तर बांबू पिकाची लागवड हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीची गरज असून, डोंगर, शेती, नदी किनाऱ्यालगतच्या जमिनींवर अधिकाधिक बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी येथे केले.  ‘सकाळ’, ‘एसआयआयएलसी’ आणि ‘ॲग्रोवन’ यांच्या वतीने आयोजित बांबू शेतीतील संधी आणि मूल्यवर्धन या विषयी पुण्यात एकदिवसीय कार्यशाळा आयोजिली होती. त्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर कोकण बांबू व केन डेव्हलपमेंट सेंटरचे (कोनबॅक) संचालक संजीव करपे, इंडिया बांबू फोरमचे सिल्पेश गंभीरे उपस्थित होते.  पटेल म्हणाले, ‘‘इतर झाडांपेक्षा बांबू पिकाची कार्बन खाण्याची क्षमता ३० टक्के अधिक आहे. बांबू रोज दोन फूट वाढतो व ३२० किलो ऑक्सिजन देतो. जगात ४८ देशांत बांबू लागवड होते. बांबू लागवड टिश्युकल्चर रोपांद्वारे करणे अधिक फायद्याचे ठरत असून, बलकोवा ही जात लावल्यास एकरी ५० टन उत्पादन मिळते. बांबूपासून इथेनॉल बनविणारी जगातील पहिली रिफायनरी आसाममधील नुमालीगड येथे तयार होत आहे.’’  बांबूनिर्मित उद्योगाबाबत बोलताना करपे म्हणाले, ‘‘चीनमध्ये बांबूची सर्वाधिक लागवड होत असून, बांबू व बांबूनिर्मित उत्पादनांपासून वार्षिक ३ लाख २० हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. आपल्या देशात अगरबत्ती बनविण्यासाठी लागणारी काडी आणि आइस्क्रामचे चमचे बनविण्याचे मटेरिअल व्हिएतनाम देशातून आयात केले जाते. अगरबत्ती बनविणाऱ्या प्रमुख पाच कंपन्या भारतीय असून, त्यासाठी लागणारे मटेरिअल आयात होणे ही खेदाची बाब आहे. त्यामुळे आपल्याकडे बांबू लागवडीला व त्यापासून बांबूनिर्मित उत्पादने बनविणारे उद्योग सुरू करण्याला व रोजगार क्षमता वाढविण्याला खूप मोठा वाव आहे.’’  ‘एसआयआयएलसी’चे कृषी विभाग प्रमुख अमोल बिरारी यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. प्रॉडक्ट मॅनेजर शाहबाज शेख व समन्वयक परवीन खान यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. कार्यशाळेला राज्यभरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

बांबूपासून इथेनॉल अधिक फायद्याचे  ‘‘उसापासून इथेनॉल बनविण्याच्या तुलनेत बांबूपासून इथेनॉल बनविणे अधिक फायद्याचे आहे. एक हेक्टर उसासाठी सुमारे २ कोटी लिटर पाणी लागते तर १ हेक्टर बांबूसाठी केवळ २० लाख लिटर पाणी लागते. १ टन ऊस क्रश केल्यानंतर ८० लिटर इथेनॉल मिळते तर १ टन बांबू क्रश केल्यानंतर सद्यःस्थितीत २०० लिटर इथेनॉल मिळते. लॅब कंडिशनला हेच प्रमाण ४०० लिटर इतके आहे,’’ अशी माहितीही पाशा पटेल यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.