संगमनेर तालुक्यात रब्बी  मोहरीचा प्रयोग 

उत्तर भारतातील महत्त्वाचे पीक असलेल्या मोहरीची संगमनेर (जि. नगर) तालुक्यातील साधारण आठ गावांत ९० एकर क्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर रब्बीतील मोहरीची लागवड केली असून, हे पीक चांगले आले आहे.
 संगमनेर तालुक्यात रब्बी  मोहरीचा प्रयोग 
Sangamner Talukyat Rabbi fancy experiment

पुणे नगर ः उत्तर भारतातील महत्त्वाचे पीक असलेल्या मोहरीची संगमनेर (जि. नगर) तालुक्यातील साधारण आठ गावांत ९० एकर क्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर रब्बीतील मोहरीची लागवड केली असून, हे पीक चांगले आले आहे. रब्बीमधील अन्य पिकाला चांगला पर्याय म्हणून कृषी विभागाने नावीन्यपूर्ण योजनेतून शेतकऱ्यांना बियाणे देऊन नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच लागवड केली आहे. हे पीक चांगले आल्याचे दिसत आहे. 

उत्तर भारतातील पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेशातील हे महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रात केवळ गव्हाच्या पिकांत मोजकी ठोंबे टाकण्याची परंपरा आहे. मात्र कृषी विभागाने नगर जिल्ह्यात पहिल्‍यांदाच संगमनेर तालुक्यात सलग ९० एकरांवर रब्बी मोहरीचे पीक घेण्याचा प्रयोग केला आणि यशस्वीही झाल्याचे दिसत आहे. पारंपारिक पिकांतील बदल म्हणून मोहरी लागवड करण्याचा निर्णय झाल्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी व आत्माचे समन्वयक वैभव कानवडे यांनी सुधारित वाणांचा शोध घेत नागपूरच्या कृषी महाविद्यालयातील अखिल भारतीय समन्वित जवस व मोहरी संशोधन प्रकल्पातील प्रमुख शास्रज्ञ डॉ. बिना नायर व मोहरी पैदासकार डॉ. संदीप कामडी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सुधारित टी. ए. एम १०८-१ हा वाण उपलब्ध करून दिला. त्यानंतर संगमनेर तालुक्यातील श्रीकृष्ण शेतकरी गटामार्फत सारोळेपठार, कर्जुले पठार, बांबळेवाडी, नांदूर खंदरमाळ, जाखुरी, चंदनापुरी, तळेगाव दिघे, निमगाव जाळी आदी गावशिवारात ९० एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. सध्या ही पीक फुलोऱ्यातील शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू, हरभरा, कांदा, ज्वारी सारख्‍या पारंपरिक पिके घेतली जात असलेल्या भागात पहिल्यांदाच मोहरीचे सलग पीक डौलत आहे. 

सुधारित वाणांची वैशिष्ट्ये  संगमनेर तालुक्यातील आठ ते दहा गावांच्या शिवारात लागवड केलेल्या ‘टी.ए.एम १०८-१’ या मोहरीचा हा वाण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा अंतर्गतच्या भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर यांनी २०१९ साली विकसित केलेला आहे. हा वाण सर्व प्रकारच्या जमिनीत जोमाने वाढतो. पेरणी नंतर ४० दिवसांनी फुलोऱ्यात येतो. मोहरी शेंगा परिपक्व होण्याचा कालावधीत १०० दिवसांचा आहे. चराऊ प्राणी व रानडुक्कर या प्राण्यांचा उपद्रव होत नाही. पूरक मधमाशी पालन केल्यास हेक्टरी ८ ते ९ किलो मोहरी फुलातील वैशिष्ट्यपूर्ण मधाचे उत्पादन मिळते. रोगप्रतिकारक शक्ती अधिक आहे. हेक्टरी १०-१२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. महाराष्ट्रातील स्थानिक वाणांपेक्षा यांची अधिक वाढते. पक्व झाल्यानंतर शेंगा फुटत नाहीत. बियाणांचा दर कमी असल्याने व एका एकरासाठी एक किलो बियाणे लागत असल्याने बियाणांचा मोठा खर्च वाचतो. कमी पाण्यात हा वाण येतो. 

प्रतिक्रया  संगमने तालुक्यात यावर्षी पहिल्यांदाच मोहरी पिकाचा प्रयोग केला आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून सुधारीत ‘टी.ए.एम १०८-१’ वाणांचे बियाणे दिले आहेत. यंदा चांगले उत्पादन निघण्याची आशा आहे. अधिक मागणी असलेले हे पीक रब्बीतील अन्य पिकांना चांगला पर्याय ठरू शकते.  - प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी संगमनेर (जि. नगर)  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.