संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज प्रस्थान

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

आळंदी, जि. पुणे  ः  सुखालागी जरी करिसी तळमळ,  तरी तू पंढरीशी जाय एकवेळ,  मग तू अवघाची सुखरूप होसी,  जन्मोजन्मीचे दुःख  ही भावना उरी बाळगून राज्यभरातून निघालेल्या हजारो वारकऱ्यांचा मेळा आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी तीन दिवसांपासून दाखल झाला आहे. इंद्रायणीत स्नानासाठी झालेल्या भाविकांच्या अलोट गर्दीने इंद्रायणीचे दोन्ही काठ फुलून गेले आहेत. आज संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे.

गेले दोन दिवस वातावरण ढगाळ आहे. काळ्याभोर आभाळाच्या दाटीतून अधूनमधून सूर्याचे दर्शन होत आहे. रविवारी दुपारी चारनंतर पाऊस बरसला. पावसामुळे वारकऱ्यांची मुक्कामाच्या ठिकाणी थोडी त्रेधा उडाली. अनेकांनी धर्मशाळेचा आसरा घेतला. मात्र पावसाचे आगमन झाल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. मावळ भागातील आंद्रा धरणातून पाणी सोडल्याने आळंदी इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे भाविकांच्या स्नानाची चांगली सोय झाली.

पहाटेपासून भाविक इंद्रायणी काठी गर्दी करून होते. स्नानानंतर माउलींच्या समाधी दर्शनासाठी भक्ती सोपान पुलावर भाविक रांगेत उभे होते. दर्शनाची रांग नदीपलीकडे गेली होती. इंद्रायणी नदीत भाविक वाहून जाऊ नये यासाठी दोरखंड आणि रबर बोट तैनात केली आहे. स्पीकरवरून पोलिसांच्या वतीने वारंवार काळजी घेण्याबाबत भाविकांना सूचना देण्यात येत होत्या.

मंगळवारी माउलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा असल्याने दुपारनंतर दिंड्यांव्यतिरिक्त मंदिर परिसरात इतरांनी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले. मंदिर परिसरात गर्दी होऊ नये यासाठी प्रदक्षिणा मार्गावर विविध ठिकाणी स्क्रीनची सोय देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. प्रस्थानाचे थेट प्रक्षेपण वारकऱ्यांना दाखविले जाणार आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे साडेचारशेहून अधिक दिंड्या आळंदीत दाखल झाल्या. हरिनामाचा गजर आळंदीत सुरू आहे. ठिकठिकाणी कीर्तन प्रवचने सुरू आहेत. गोपाळपुरा, सिद्धबेट, इंद्रायणी नगर, पद्मावती रस्ता भागात भाविकांची गर्दी जास्त होती. 

देऊळवाड्याचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला. दीड ते दोन तासांच्या अंतराने भाविकांचे समाधी दर्शन होत होते. सकाळी बारापर्यंत माउलींच्या समाधीवर अभिषेक सुरू होते. दुपारनंतर महाद्वारातील पोलिसांचा बंदोबस्त कडक करण्यात आला. आळंदीतील रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पालिकेच्या वतीने स्वच्छता आणि आरोग्यावर भर देण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com