‘महाबीज’च्या बीजोत्पादकांना मिळणार एकच दर

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजने आपल्या बीजोत्पादक शेतकऱ्यांना यापुढे राज्यभरात प्रमुख बाजारपेठांमधील दरांचा आढावा घेऊन एक सारखाच दर देण्याबाबत महत्त्वाचे धोरण स्वीकारल्याची माहिती मिळाली आहे.
‘महाबीज’च्या बीजोत्पादकांना मिळणार एकच दर
Seed growers of ‘Mahabeej’ will get a single rate

अकोला ः राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे विश्वासाचे बियाणे पुरवठादार म्हणून ओळख बनलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजने आपल्या बीजोत्पादक शेतकऱ्यांना यापुढे राज्यभरात प्रमुख बाजारपेठांमधील दरांचा आढावा घेऊन एक सारखाच दर देण्याबाबत महत्त्वाचे धोरण स्वीकारल्याची माहिती मिळाली आहे. 

महाबीजची नुकतीच मावळत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सर्वसाधारण सभा झाली. या सभेत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. त्यात बीजोत्पादकांना एकसमान दर देण्याचा महत्त्वाचा निर्णयसुद्धा घेतल्या गेला. महाबीजमार्फत खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात विविध पीकवाणांचे बीजोत्पादन केले जाते. विभागनिहाय ही पिके घेतली जातात. या बीजोत्पादन केलेल्या पिकांना दर हा त्या-त्या भागातील बाजारपेठांमधील दरांवर निश्चित केल्या जातो. बाजारपेठेतील दरांपेक्षा अधिकची एक विशिष्ट रक्कम निश्चित करून अंतिम दर दिला जातो. परंतु राज्यातील वेगवेगळ्या बाजारात संबंधित पीक वाणाचे वेगवेगळे दर निघतात. त्यामुळे जिल्हानिहाय भावात फरक निर्माण होतो. अशा वेळी बीजोत्पादकांचे नुकसान होते. 

दरवर्षी भाव फरकाची मागणी केल्या जाते. गेल्या हंगामात बाजारात सोयाबीनचा दर वाढीव असताना महाबीजकडून कमी दर मिळाल्याची शेतकऱ्यांमधून ओरड झाली. त्यामुळे या शेतकऱ्यांना ४०० अधिक  २०० असा एकूण ६०० रुपये भावफरक देण्याची घोषणा सर्वसाधरण सभेत केल्या गेली. असे इतर पिकांबाबतही व्हायचे. त्यामुळे यापुढे एकसमान धोरण राबवले जाणार आहे.

ठिबक सिंचनासाठी १० टक्के सीएसआर महाबीजच्या सभासद, बीजोत्पादकांना ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहन म्हणून १० टक्के सीएसआर निधीमधून निधी देण्याच्या मागणीस अध्यक्षांनी तत्त्वतः मान्यता दिल्याची माहिती महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख यांनी दिली. यावर्षी शेतकऱ्यांनी याबाबत मागणी केली होती. त्यामुळे आता ठिबक सिंचनासाठी शासनाचे ८० टक्के अनुदान व महाबीज १० टक्के सीएसआर निधीमधून देईल, असा ९० टक्क्यांपर्यंत लाभ संबंधितांना घेता येऊ शकेल. याला अध्यक्षांनी संमती दर्शविली असल्याचेही ते म्हणाले.

 २०१६-१७ च्या हंगामापासून बोनस महाबीजच्या यंदाच्या सर्वसाधारण सभेत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. त्यात भागधारक, बीजोत्पादकांना विविध पिकांसाठी बोनसही जाहीर करण्यात आला. यात सन २०१६-१७ पासून काही पिकांचा समावेश करण्यात आला आहे. सन २०१६-१७ साठी हरभरा पिकाला १३१ रुपये प्रतिक्विंटल बोनस जाहीर करण्यात आला. तर सन २०१८-१९ मध्ये सोयाबीनला २०० रुपये, सन २०१९-२० मध्ये सोयाबीनला ५६० रुपये, करडईला ९२० रुपये, धानाला ७५० रुपये, सुधारित ज्वारीला १५७८, बाजरी १६२९, मूग-उडीद ३५०, तूर ५०६, हरभरा ९६०, नागली ९२२, जवस ३९७ रुपये प्रतिक्विंटल बोनस दिले जाणार आहे. तर यंदाच्या हंगामात सोयाबीनसाठी ४०० अधिक २०० असे सहाशे रुपये दिले जातील. या निर्णयाचा राज्यातील हजारो  बीजोत्पादक, भागधारकांना बोनसचा लाभ मिळू शकणार आहे.

महाबीजने सातत्याने शेतकरी, भागधारक, बीजोत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. यंदाच्या सर्वसाधारण सभेत बोनससह इतर लाभ देण्याबाबत निर्णय घेतले.  - वल्लभराव देशमुख, संचालक, महाबीज, अकोला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.