शेती वाचवण्याच्या मार्गात शेतकरी कंपन्या आशेचा किरण : सुभाष देसाई

सुभाष देसाई
सुभाष देसाई

औरंगाबाद : शेती वाचविण्याच्या मार्गात शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे (एफपीसी) आपण आशेचा किरण म्हणून पाहतो, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. तो किरण हातातला सोडू नका, सतत काम करत राहिले तर यामधून निश्चित यश मिळेल, असा सल्लाही श्री. देसाई यांनी दिला.  

सह्याद्री फार्मस्‌, गोदा फार्मस्‌ आणि महाएफपीसी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. ५) शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची एकदिवसीय कार्यशाळा करमाड येथील करमाड फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती, या वेळी श्री. देसाई बोलत होते. 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, ‘महाएफपीसी’चे योगेश थोरात, श्रीरामपूर येथील प्रभात डेअरीचे अध्यक्ष सारंग निर्मळ, नाशिक येथील एव्ही ब्रॉयलर्सचे अध्यक्ष श्रीकृष्ण गांगुर्डे, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन विलास शिंदे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजीच्या संचालिका डॉ. स्मिता लेले, करमाड फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे भारत सपकाळ, संजय काटकर, गोदावरी व्हॅली फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे सूर्याजी शिंदे उपस्थित होते. 

श्री. देसाई म्हणाले, की भारताला शेतीप्रधान देश, आपली सगळी शेतीसंस्कृती वगैरे बोलत बोलत, शेतकऱ्यास अन्नदाता म्हटलं म्हणजे आपला गौरव केला असं आपल्याला वाटतं; परंतु असं म्हणून शेतकऱ्याला फसवलंय. कारण दाता म्हणजे जो दान करतो तो. म्हणजे शेतकऱ्याने, त्याच्या कुटुंबाने काबाडकष्ट करून पिकवायचे अन्‌ दान करायचे. इतर वस्तूंचे निर्माण करणाऱ्या कारखानदारांना जसा त्यांच्या उत्पादित मालाचा दर ठरविण्याचा अधिकार, तसा शेतकऱ्याला नाही. यामध्ये रचना, यंत्रणा, पद्धत या साऱ्यांचाच दोष आहे. बाजारपेठेवर अवलंबून राहून उपयोग होणार नाही.

बाजारपेठा म्हणजे शेतकऱ्यांना लुटण्याचं साधन बनल्या आहेत. अशा स्थितीत बाजार समित्या नेमक्‍या काय करतात, हा प्रश्न आपल्याला पडतो. यामधून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी मूल्यवर्धनासाठी काय करता येईल याचा विचार करावा, असे श्री. देसाई यांनी सांगितले.

कार्यशाळेत संजय काटकर, डॉ. स्मिता लेले, सारंग निर्मळ, विलास शिंदे, श्रीकृष्ण गांगुर्डे, डॉ. पी. अन्बलगन यांनी मार्गदर्शन केले. एफपीसींना असलेल्या संधी, तसेच अडचणींवर या वेळी प्रकाश टाकण्यात आला. यावेळी प्रास्ताविक योगेश थोरात यांनी केले. राज्यात कार्यरत असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना एमआयडीसीमध्ये थेट भूखंड वाटपाचा निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आहे. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांची औद्योगिक चळवळ पुढील टप्प्यावर नेण्याच्या दृष्टीने सर्व कंपनी प्रतिनिधींसाठी ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com