ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत  डॉ. एन. डी. पाटील यांचे निधन 

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, महाराष्ट्राच्या सामाजिक लढ्याचे झुंजार नेतृत्व, लढाऊ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील (वय ९३) यांचे सोमवारी (ता. १७) निधन झाले. प्रकृती अस्वस्थतेमुळे अकरा जानेवारीपासून येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
 ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत  डॉ. एन. डी. पाटील यांचे निधन 
senior thinker Dr. N. D. Patil passes away

कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, महाराष्ट्राच्या सामाजिक लढ्याचे झुंजार नेतृत्व, लढाऊ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील (वय ९३) यांचे सोमवारी (ता. १७) निधन झाले. प्रकृती अस्वस्थतेमुळे अकरा जानेवारीपासून येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारपासून त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी सरोज पाटील, मुले सुहास, प्रशांत, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. पाटील यांच्या निधनाचे वृत्त कळताच राज्यभर शोककळा पसरली. मंगळवारी (ता. १८) सकाळी आठ ते दुपारी एकपर्यंत येथील सदर बाजार परिसरातील राजर्षी शाहू कॉलेज परिसरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर कसबा बावडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.  प्रा. डॉ. पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील ढवळी (ता. वाळवा) या गावी १५ जुलै १९२९ रोजी एका गरीब व निरक्षर शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच तर माध्यमिक शिक्षण तेथून आठ मैलांवर असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील माध्यमिक शाळेत झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या चळवळीचे वाळवा तालुका हे मुख्य केंद्र होते. त्यामुळे स्वातंत्र्याचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे बाळकडूही त्यांना येथेच मिळाले. महात्मा गांधींच्या ‘भारत छोडो’ संग्रामात त्यांनी विद्यार्थिदशेतच उडी घेतली. महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू छत्रपती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्या सामाजिक जीवनाला प्रारंभ झाला. पुढे राजाराम महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयाची बी. ए., एम. ए. व एलएल.बी. या पदव्या त्यांनी संपादन केल्या.  रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेव्हापासून ते रयत शिक्षण संस्थेचे अविभाज्य घटक बनले. संस्थेतील विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळताना बदलत्या काळानुसार नवे अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण संस्थाही सुरू केल्या. कर्मवीर विद्याप्रबोधिनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदी संस्थांच्या माध्यमातूनही त्यांनी लोकमानस घडवण्यासाठी अनेक प्रयोग केले. सुमारे अठरा वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य होते. १९८५-१९९० या काळात महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. तसेच काहीकाळ विरोधी पक्षनेते होते. १९७८-८० या अवधीत ते महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री होते. जनतेने दिलेले प्रतिनिधित्व आणि शासकीय सत्तापदे त्यांनी सामाजिक न्यायासाठीच वापरली. आमदारकी असो किंवा प्राध्यापक म्हणून काम करताना मिळालेल्या मानधनातील एक दमडीही स्वतःसाठी किंवा स्वतःच्या संसारासाठी त्यांनी कधी वापरली नाही. ही सारी रक्कम पहिल्यापासून त्यांनी समाजासाठीच दिली. 

शेतकरी, उपेक्षितांसाठी लढा  महाराष्ट्रात वेळोवेळी जे प्रश्‍न निर्माण झाले आणि मानवी मूल्यांनाच आव्हान देणारे राजकीय निर्णय होऊ लागले, तेव्हा त्यांचा विरोधात घेण्यासाठी सर्वशक्तीनिशी ते रस्त्यावर आले. शेतकरी कामगार पक्षाची बांधिलकी मानून त्याच्या विचारप्रणालीशी ते एकनिष्ठ राहिले. कोणत्याही प्रलोभनाने विचलित न होता व्रतस्थ वृत्तीने पक्षाच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, शेतमजूर, दलित, पीडित, उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अखंड लढा दिला. केवळ सामाजिक परिवर्तनच नव्हे, तर शोषणमुक्त समाजनिर्मितीचा त्यांचा प्रयत्न होता. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, कापूस एकाधिकार खरेदी योजना, महागाई आणि उपासमार विरोधी आंदोलन, सीमाप्रश्‍न, धरणग्रस्तांचे आंदोलन, जागतिकीकरण विरोधातील आंदोलन आणि वीजप्रश्‍नावरील आंदोलनात त्यांनी सक्रिय पुढाकार घेतला. ‘भाई माधवराव बागल पुरस्कार', क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार, राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार आदी पुरस्कारांसह विविध विद्यापीठांनी डी. लिट देऊन त्यांचा गौरव झाला. 

अंत्ययात्रा निघणार नाही  कोरोनाच्या नियमांमुळे अंत्ययात्रा निघणार नाही. तसेच एन. डी. पाटील समाजवादी प्रबोधिनीचे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विवेकवादी चळवळीचे अग्रणी असल्याने कोणत्याही कर्मकांडा शिवाय त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी होणार आहेत. कोरोनाच्या नियमांमुळे केवळ वीस लोकांच्या अर्थात कुटुंबियांच्या उपस्थितीत अंत्यविधी होणार आहेत. कार्यकर्त्यांनी शाहू कॉलेजवर अंत्यदर्शनासाठी यावे. मात्र अंत्यविधीच्या ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.    डॉ. एन.डी. पाटील यांचा जीवनपट     संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील  जन्म : १५ जुलै १९२९, ढवळी (नागाव), जि. सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म  शिक्षण : एम. ए. (अर्थशास्त्र), पुणे विद्यापीठ, १९५५; एल. एल. बी. (१९६२) पुणे विद्यापीठ अध्यापन  १९५४-१९५७ ः छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर  १९६० ः कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य 

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य  १९६२ ः शिवाजी विद्यापीठ पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य  १९६५ ः सिनेट सदस्य, शिवाजी विद्यापीठ  १९६२-१९७८ ः शिवाजी विद्यापीठ, कार्यकारिणी सदस्य  १९७६-१९७८ ः शिवाजी विद्यापीठ, सामाजिकशास्त्र विभागाचे डीन  १९९१ ः सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग, महाराष्ट्र राज्य  १९५९ पासून ः रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य  १९९० पासून ः रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन  १९८५ पासून ः दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बेळगाव अध्यक्ष 

राजकीय कार्य  १९४८ ः शेतकरी कामगार पक्षात प्रवेश  १९५७ ः मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस  १९६०-६६,१९७०-७६, १९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य  १९६९- १९७८, १९८५ – २०१० ः शे.का.प.चे सरचिटणीस  १९७८-१९८० ः सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य  १९८५-१९९० ः महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )  १९९९-२००२ ः निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार  महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते 

मिळालेले सन्मान / पुरस्कार  १९९४ ः भाई माधवराव बागल पुरस्कार  १९९९ ः स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड-डी. लीट. पदवी  १९९८-२००० ः राष्ट्रीय बियाणे महामंडळ (अध्यक्षपद) भारत सरकार  २००० ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ- डी. लीट. पदवी  २००१ ः विचारवेध संमेलन, परभणी अध्यक्षपद  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर डी. लीट. पदवी  शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार 

भूषविलेली पदे  रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य  समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी – उपाध्यक्ष  अंधश्रद्धा निमूर्लन समिती, महाराष्ट्र – अध्यक्ष  डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, सातारा – अध्यक्ष  जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती- मुख्य निमंत्रक  म. फुले शिक्षण संस्था, इस्लामपूर-अध्यक्ष  दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था, बेळगाव-अध्यक्ष  महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती-सदस्य 

प्रसिद्ध झालेले लेखन  समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)  शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२  कॉँग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२  शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३  वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६  महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७  शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०  शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी? ( पुस्तिका ) १९९२  महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )  नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ) 

रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य  औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आश्रमशाळा, साखरशाळा, नापासांची शाळा, श्रमिक विद्यापीठ, संगणक शिक्षक केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर, स्पर्धा परीक्षा केंद्रे, गुरुकुल प्रकल्प, लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजना यांची राबणूक, दुर्बल शाखा विकास निधी, म. वि. रा. शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना, कर्मवीर विद्याप्रबोधिनी मार्फत विविध पुस्तकांची निर्मिती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक-प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.  

वादळी नेतृत्व हरपले  मुख्यमंत्री ठाकरे यांची डॉ. पाटील यांना श्रद्धांजली 

मुंबई : अखंड महाराष्ट्रात बेळगावसह सीमाभाग यावा. हा डॉ. एन. डी. पाटील यांचा ध्यास होता. एखाद्या वादळासारखे ते शेतकरी, कष्टकऱ्यांच्या लढ्यात उतरत. त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी होते. डॉ. पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त करून पाटील यांना आदरांजली वाहिली आहे.  मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाठविलेल्या शोक देशात म्हटले आहे, ‘‘शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे. एन. डी. पाटील राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत ठेवली. लढणे आणि संघर्ष करणे हेच त्यांचे जीवन होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ते एक बिनीचे शिलेदार होतेच, पण त्यानंतरच्या बेळगावसह सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात एन. डी. पाटील आघाडीवर होते. सीमा भागात जाऊन त्यांनी लढे दिले व पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा चांगलाच स्नेह होता. महाराष्ट्राच्या विरोधात कोणी ‘ब्र’ काढलाच तर शिवसेनाप्रमुखांच्या बरोबरीने एन. डी. उभे राहिले. अखंड महाराष्ट्रात बेळगावसह सीमा भाग यावा हा त्यांचा ध्यास होता. एखाद्या वादळासारखे ते शेतकरी, कष्टकऱ्यांच्या लढ्यात उतरत. महाराष्ट्रासाठी त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी होते. एन. डी. पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याचे अतोनात नुकसान झाले आहे.’’ 

उपेक्षितांसाठी लढणारा  कार्यकर्ता गमावला ः पवार  

पुणे ः महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील कष्टकरी, शेतकरी या सगळ्यांच्या हिताचे जपणूक करणारा. जुन्या पिढीतल्या एका माणसाला आपण गमावले आहे. एनडी पाटील यांची विचारधारा डावी होती आणि त्या विचारसरणीसाठी त्यांनी आपले आयुष्य झोकून दिले. व्यक्तीगत सुख- घरदार याचा कधीच विचार केला नाही. शैक्षणिक चळवळीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार हा त्यांच्या दृष्टीने अंतिम होता. एका बाजूने डाव्या विचारासंबंधी सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी संघर्ष आणि दुसऱ्या बाजूने उपेक्षित समाजातल्या घटकांचा कल्याणासाठी, शिक्षणासाठी जे दरवाजे खुले केले त्यामध्ये पूर्णपणाने कर्मवीरांचा विचार पुढे नेण्यासाठी आयुष्य घालवले. राजकारणामध्ये आम्ही वेगवेगळ्या दिशेने होतो. ते त्यांच्या विचारांशी प्रामाणिक होते. आम्ही लोक गांधी-नेहरुंच्या विचारांनी पुढे जाणारे लोक होतो. त्यांच्याशी वेळप्रसंगी मतभेदही व्हायचे. पण ते मतभेद एका विशिष्ट चौकटीच्या बाहेर जाऊ द्यायचे नाहीत, याचे पथ्य त्यांनी प्रकर्षाने पाळले होते, अशा शब्दांत शरद पवार यांनी पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. 

प्रतिक्रिया

शेतकरी कामगार पक्षाचे नेते एन. डी पाटील यांच्या निधनामुळे चळवळीचा अर्ध्वयू गेल्याची भावना दाटून आली आहे. शेकापच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. कष्टकऱ्यांसाठी त्यांनी अनेक चळवळी उभ्या केल्या. सीमाभागासाठीचा लढा हा त्यांच्या आयुष्यातील मोठा लढा आहे. दुष्काळामध्ये त्यांनी दिलेले लढे प्रभावी आणि आक्रमक होते. १९७२च्या लढ्यावेळी झालेल्या गोळीबारात त्यांचा पुतण्या मृत्यूमुखी पडला होता. रायगड जिल्ह्यातील उरणचा लढा, एसईझेडचा लढा त्यांनी यशस्वी करून दाखविला. माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी बळ दिले. विधिमंडळातील त्यांची कामगिरी आक्रमक आणि नाविण्यपूर्ण होती. त्यांनी कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी केलेल्या कायद्यांबाबत मांडलेले विचार महाराष्ट्राच्या विधिमंडळ कामकाजात मार्गदर्शक आहेत.  -भाई जयंत पाटील, आमदार शेकाप नेते

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात डॉ. पाटील यांना आदरांजली वाहताना कष्टकरी, शेतकऱ्यांच्या झुंजार लोकनेत्याला मुकलो, अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे. प्रा. पाटील हे जनसामान्य, कष्टकरी, शेतकरी व कामगारांसाठी अतिशय पोटतिडीकीने काम करणारे झुंजार नेते होते. कोणताही प्रश्न ते अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडत व त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करत. शिक्षण क्षेत्राकरिता त्यांचे  कार्य मोठे होते. अनेक आंदोलने व विधायक चळवळींचे नेतृत्व केले. राज्य विधान मंडळाचे सदस्य म्हणून दीर्घकाळ काम करणारे प्रा. पाटील आदर्श लोकप्रतिनिधी होते. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, समाजकारण व राजकारण यांसह विविध क्षेत्रांमध्ये वावर असलेल्या एका प्रामाणिक लोकनेत्याला आपण मुकलो आहोत.  भगतसिंह कोश्‍यारी, राज्यपाल  ‘ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतीशील विचार होते. त्यांच्या जाण्याने शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारे संघर्षशील नेतृत्व हरपले आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील पाटील म्हणजे सामान्य माणसाचा संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनाने शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारे संघर्षशील नेतृत्व हरपले आहे.  -अजित पवार, उपमुख्यमंत्री 

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार  ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्यावर उद्या कोल्हापुरात शासकीय इमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेन यांनी प्रशासनाला दिले आहेत.   शेतकरी, कष्‍टकरी, कामगारांचे कैवारी, पुरोगामी चळवळीचे आधारस्‍तंभ, ज्येष्‍ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील सर यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. महाराष्‍ट्राच्या सामाजिक व राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास व आम्‍हा तरुणांचे मार्गदर्शक आज काळाच्या पडद्याआड गेले. समाजाच्या हितासाठी अखेरपर्यंत त्यांनी रस्‍त्यावर उतरून लढाई केली. आदरणीय सरांना भावपूर्ण श्रद्धां‍जली.  -सतेज पाटील, पालकमंत्री  आयुष्‍यभर पुरोगामी विचारांचा जप करणाऱ्या एका महान नेत्याचे आज निधन झाले. त्यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीचे नेतृत्‍व हरपले आहे. एन. डी. पाटील यांनी आयुष्यभर इतरांसाठी संघर्ष केला. कामगार, शेतकरी, कष्‍टकरी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी रस्‍त्यावरची लढाई केली. वयाच्या ९०व्या वर्षी रस्‍त्यावर उतरून विजेच्या प्रश्‍‍नासाठी त्यांनी आंदोलन केले. संयुक्‍त महाराष्‍ट्र चळवळीतील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. राजकीय महत्त्‍वकांक्षेसाठी विचारांशी कधीही तडजोड न करता ते आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षात राहिले. अशा या महान नेत्याला विनम्र अभिवादन.  - हसन मुश्रीफ , ग्रामविकास मंत्री 

प्रा. एन. डी. पाटील हे मोठे व्यक्‍तीमत्त्‍व होते. त्यांनी मागे पुढे न पाहता समाजहित डोळ्यासमोर ठेवून आयुष्‍यभर सर्वसामान्य लोकांसाठी प्रचंड काम केले. वयाच्या विचार न करता रस्‍त्यावर उतरून संघर्ष केला. त्यांच्यासारखे लोकनेते तयार व्‍हावेत, हीच अपेक्षा.  -संभाजीराजे छत्रपती, खासदार 

चळवळीच्या इतिहसातील मोठे नाव म्‍हणजे एन. डी. पाटील. अन्यायाच्या विरूद्ध कायम उभे राहणारे नेतृत्‍व. संघर्षाला पर्यायी नाव म्‍हणजे एन. डी. पाटील. सर्वसामान्य माणसासाठी लढणारे, टोल सारखे विषय मार्गी लावणारे हे नेतृत्‍व आता हरपले आहे. त्यांच्या या संघर्षाचा वसा तरूण पिढीने पुढे चालवला पाहिजे.  -चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार  ज्येष्‍ठ नेते एन. डी. पाटील यांच्या निधनाने फार मोठा धक्‍का बसला आहे. राज्यातील पुरोगामी विचारांचा आधारवड हरपला आहे. ते आम्‍हा चळवळीच्या लोकांचे भिष्‍माचार्य होते. रायगडचे एसईझेड आंदोलन असो, टोल किंवा विजेचे आंदोलन असो की, पाणी प्रश्‍‍न किंवा सीमा प्रश्‍‍नाचा वाद असो, या सर्व आंदोलनात ते नेहमीच अग्रभागी राहिले. रस्‍त्यावर उतरून न्याय करण्याची भूमिका त्यांनी घेतली. वाट चुकलेल्या कार्यकर्त्याला कान धरून योग्य मार्गावर आणण्याचे कामही त्यांनी केले. त्यांनी जी पायवाट मळवली आहे, त्यावरून वाटचाल करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.  -राजू शेट्टी, माजी खासदार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com