सोयाबीन दराची घोडदौड सुरूच राहणार 

तेलबिया आणि खाद्यतेलाच्या दारातील आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, आयातीसाठी कंटेनर्सची टंचाई आणि ३ ते ४ पट वाढलेले वाहतूक भाडे, देशातील बाजारातील कमी आवक, स्थानिक सोयापेंड आणि सोयातेलाला वाढलेली यामुळे सोयाबीन दराला तडका बसतो आहे.
The soybean price race will continue
The soybean price race will continue

पुणे ः तेलबिया आणि खाद्यतेलाच्या दारातील आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, आयातीसाठी कंटेनर्सची टंचाई आणि ३ ते ४ पट वाढलेले वाहतूक भाडे, देशातील बाजारातील कमी आवक, स्थानिक सोयापेंड आणि सोयातेलाला वाढलेली यामुळे सोयाबीन दराला तडका बसतो आहे. चालू आठवड्यात सोयाबीन दरात ५०० ते ७०० रुपयांची वाढ होऊन दराने ७ हजार रुपयांचा टप्पा गाठला. लवकरच सोयाबीन साडेसात हजारांचे शिखरही गाठेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. सर्व मूलभूत घटक दराला पूरक असल्याने सोयाबीनची घोडदौड सुरूच राहील, असेही जाणकार म्हणाले.  देशांतर्गत बाजारात प्लांट्स आणि स्टॉकिस्ट यांच्याकडून मागणी असल्याने सोयाबीन दरातील तेजी कायम आहे. बाजारात आवक मात्र कमी आहे. त्यातच देशात मोहरीची उपलब्धता कमी असल्याने सोयाबीनला मागणी राहील. तसेच महाराष्ट्र सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार नसल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र सोयाबीन उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असतो. त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच देशभरातील सोयाबीन दरात सुधारणा झाली. बुधवारी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय जाहीर केल्यानंतर सोयाबीन दरात २५० रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे. महाराष्ट्रात प्लाट्सचे खरेदी दर सात हजार रुपयांवर पोचले आहेत. सध्याची शेतकऱ्यांची विक्री, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि जागतिक भाडेवाढ यामुळे पुढील काही दिवसांत सोयाबीन दर ७५०० रुपयांचा टप्पा गाठतील, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.  जागतिक तेलबिया आणि खाद्यतेल बाजारही तेजीत आहे. देशाला एकूण गरजेपैकी ६५ टक्के गरज आयातीतून भागवावी लागते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीने देशांतर्गत सोयाबीन तेजीला बळकटी मिळत आहे. त्यातच जागितक पातळीवर तेलबिया आणि खाद्यतेल वाहतुकीसाठी कंटेनर्सची मोठी टंचाई असून, भाड्यांत अजूनही ३ ते ४ पट वाढ झालेली आहे. त्यामुळे जे देश शेतीमालासाठी आयातीवर अवलंबून आहेत, त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारत या फटक्यातून सुटला नाही. या परिस्थितीचा भारतीय खाद्यतेल आयातीवर परिणाम झाला. आयात पडतळ म्हणजेच पॅरिटी महाग पडत आहे. मागील वर्षाएवढीच खाद्यतेल आयातीसाठी भारताला यंदा तब्बल ४५ हजार कोटी रुपये अधिक मोजावे लागले. यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि वाहतूक खर्चात झालेली वाढ ही दोन कारणे प्रामुख्याने सांगता येतील. त्यामुळे येणाऱ्या काळात खाद्यतेल आयात कमी होण्याची शक्यता जणकार व्यक्त करत आहेत, असे झाल्यास स्थानिक तेलबिया पिकांवरच अवलंबून राहावे लागेल. त्यातच रब्बीतील पीक येईपर्यंत सोयाबीनवरच भिस्त राहील. त्यामुळे सोयाबीन बाजारातील फंडामेंटल्स दरातील तेजीसाठी मजबूत आहेत.  या सर्व परिस्थितीत सोयापेंडचीही आयात सोपी होणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजार चालू आठवड्यात सोयापेंडचे दर ३९० ते ४२० डॉलरच्या जवळपास राहिले. तर भारतीय सोयापेंड ७५० ते ८०० डॉलर राहिली, असे जाणकारांनी सांगितले. मात्र कमी उपलब्धता, कंटेनर टंचाई आणि वाहतूक भाडेवाढ यामुळे सोयापेंड आयात करण्यातच अडथळे येत आहेत. त्यामुळे देशातीलच सोयापेंडला मागणी आहे. जाणकार तर हे ही सांगत आहेत की, जी काही साडेसहा लाख टन सोयापेंड आयात झाली, त्या पेंडेचा वापर होत गेला आणि शिल्लक साठा नगण्य आहे. त्यातच बाजारातील सोयाबीनची आवकही कमी आहे. त्यामळे पोल्ट्रीसह इतर उद्योगांना देशातील सोयापेंडवरच अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी सोयापेंड दरालाही तडका मिळत आहे. सोयातेलही भाव खात आहे. या सर्व पूरक स्थितीमुळ सोयाबीन दराला फोडणी मिळत आहे. 

चालू आठवड्याती सोयाबीनचे दर  चलू आठवड्यात फंडामेटल्स म्हणजेच मुलभूत घटक पूरक असल्याने बाजार समित्यांत सोयाबीन दरात ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली. मध्य प्रदेशात या आठड्यात सरासरी दर ६ हजार २०० ते ६ हजार ६०० राहिला. तर महाराष्ट्रात ६ हजार ३०० ते ६७०० रुपये दर मिळाला. राजस्थानमध्ये ६ हजार ते ६ हजार ८०० रुपयाने सोयाबीनचे व्यवहार झाले. तर प्लांट्सच्या दरातही ४०० ते ७०० रुपयाने वाढ झाली. या वाढीसह मध्य प्रदेशातील प्लांट्सचे दर ६ हजार ५५० ते ६ हजार ९०० रुपये, महाराष्ट्रात ६ हजार ७०० ते ७ हजार रुपये आणि राजस्थानध्ये ६ हजार ६०० ते ६ हजार ९०० रुपये तसेच छत्तीसगढमध्ये ६ हजार ७०० रुपये दर मिळाला. तेलंगणात ६ हजार ७०० ते ६ हजार ७५० रुपये आणि तमिळनाडूत ७ हजार २५ रुपये सरासरी प्लांट्स दर राहिले.  सोयापेंडच्या दरात सुधारणा  सोयापेंडच्या दरात चालू आठवड्यात ४ हजार ते ७ हजार रुपयांपर्यंत सुधारणा पाहायला मिळाली. बाजारात सोयाबीनची आवक कमी असल्याने गाळपही घटले आहे. त्यातच आयात माल शिल्लक नसल्याने नाईलाजाने का होईना देशांतर्गत सोयापेंडची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे दरवाढीला आधार मिळतो आहे. दरातील या वाढीसह मध्य प्रदेशात सोयापेंडीचे दर ५५ हजार ८०० ते ५८ हजार रुपये दर राहिले. महाराष्ट्रात सर्वाधिक ५९ हजार ते ६० हजार ५०० रुपये प्रति टनाने सोयापेंडचे व्यवहार होत आहेत. तर राजस्थानमध्ये ५८ हजार ते ५९ हजार रुपये सोयापेंडला दर मिळाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com