राज्यात ५७३ लाख टन उसाचे गाळप 

राज्यात जानेवारीच्या मध्यापर्यंत ५७३ लाख एक टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ९. ८६ टक्के साखर उताऱ्याने ५६६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
 राज्यात ५७३ लाख टन उसाचे गाळप 
State 573 MT Usache Gap

कोल्हापूर : राज्यात जानेवारीच्या मध्यापर्यंत ५७३ लाख एक टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ९. ८६ टक्के साखर उताऱ्याने ५६६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उताऱ्यात कोल्हापूर विभागाची आघाडी कायम असून, १२ जानेवारी अखेरच्या आकडेवारीनुसार कोल्हापूर विभागाचा सरासरी साखर उतारा ११.२१ टक्के इतका राहिला आहे. त्या खालोखाल पुणे विभागाने १०.५ साखर उतारा मिळवत दुसरा क्रमांक राखला आहे. राज्यात १९२ साखर कारखाने सुरू असून, यामध्ये ९७ खासगी तर ९५ सहकारी साखर कारखाने यंदा ऊस गाळप करत आहेत.  गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे, याचा अनुकूल परिणाम साखरेचा उतारा वाढण्यावर होत आहे. प्रमुख साखर पट्टा असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही चांगली थंडी पडत असल्याने येत्या काही दिवसांत उताऱ्यात आणखी काहीशी वाढ होईल, असा अंदाज साखर उद्योगातील तज्ज्ञांचा आहे.  साखर उताऱ्यात वाढ अपेक्षित असली तरी अजूनही पश्चिम महाराष्ट्रात पूरग्रस्त भागातील ऊस साखर कारखान्यांना जाण्यातील अडचणी कायम आहेत. हंगाम सुरू होण्याअगोदर शेतकरी संघटनांनी पूरग्रस्त उसाची तोड पहिल्यांदा करावी, अशी अट ठेवली होती. परंतु हंगाम सुरू होऊन तीन महिन्यांहून अधिक कालावधी झाला असला तरी अजूनही ऊस पट्ट्यात पुरात खराब झालेला ऊस कारखान्यांना देणे शेतकऱ्यांना त्रासदायक बनले आहेत.  या उसाला वाढे नसल्याने ऊस तोडणी कामगारांकडून ऊस तोडण्यासाठी नापसंती व्यक्त होत आहे. कारखानेही हतबल असल्याने बहुतांशी भागात पुराने बुडलेला ऊस तसाच राहत असल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता वाढली आहे. 

पूरग्रस्त भागातील ऊसतोडणी रखडली  अनेक ठिकाणी पूरग्रस्त भागातील ऊसतोडणी रखडली आहे. बहुतांशी कारखान्यांचा पुरात बुडालेला सुमारे ३० ते ४० टक्के ऊस तोडणी अभावी पडून आहे. मध्यंतरी पावसामुळे रखडलेली ऊस तोडणी आणि आता पुराने बुडलेल्या उसाची ऊस तोडणी करण्या अडथळे येत असल्याने कारखान्यांपुढील डोकेदुखी वाढल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले. 

गाळप हंगामावर दृष्टिक्षेप  जानेवारीच्या मध्यापर्यंत ५७३ लाख एक टन उसाचे गाळप  सरासरी ९. ८६ टक्के साखर उतारा  ५६६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन  उताऱ्यात कोल्हापूर विभागाची आघाडी  १२ जानेवारी अखेरच्या आकडेवारीनुसार विभागाचा सरासरी साखर उतारा ११.२१ टक्के

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.