भरडधान्ये निर्यातीला बळकटी

वाणिज्य मंत्रालयांतर्गत ‘अपेडा’ व भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) या दोन्ही संस्थांनी संयुक्तपणे भरडधान्ये (मिलेट्‌स) निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. त्या संदर्भात शुक्रवारी (ता. ३) दोन्ही संस्थांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या.
Strengthening coarse grain exports
Strengthening coarse grain exports

नवी दिल्ली ः वाणिज्य मंत्रालयांतर्गत ‘अपेडा’ व भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) या दोन्ही संस्थांनी संयुक्तपणे भरडधान्ये (मिलेट्‌स) निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे.  त्या संदर्भात शुक्रवारी (ता. ३) दोन्ही संस्थांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या. या अनुषंगाने राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमात देशातील भरडधान्ये क्षेत्रांचे ‘क्लस्टर्स’ तयार करण्यात येणार आहे.

 त्याद्वारे तंत्रज्ञान पाठबळासह शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडण्याचे काम साध्य होणार आहे. विविध शेतीमालांमध्ये भरडधान्ये अत्यंत पौष्टिक मानली जातात. त्यामुळे आरोग्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहेत. यामध्ये ज्वारी, नाचणी, राळा, बाजरी, बार्नयार्ड मिलेट, कोदो आदींचा समावेश होते. हेच महत्त्व जाणून घेऊन वाणिज्य मंत्रालयांतर्गत ‘अपेडा’ व भारतीय कृषी संशोधन परिषद यांनी (आयसीएआर) भरडधान्यांचे महत्त्व अधिक वाढवण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प संयुक्तरीत्या हाती घेतला आहे. शुक्रवारी (ता. ३) दोन्ही संस्थांनी त्याविषयीच्या सामंजस्य करारावर सह्या केल्या.  

वाणिज्य मंत्रालयाने याबाबतचे प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने तसेच मूल्यवर्धन करण्यासाठी भरडधान्यांवरील संशोधनाला गती देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने प्रकल्पाची दिशा ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर करारांतर्गत महत्त्वाची उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये निर्यातीवर मुख्य लक्ष केंद्रित करून पुरवठा साखळी यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचे पाठबळ देणे, जागृती वा प्रबोधन, धोरणांमध्ये सुधारणा आणि उद्योजकता विकास या बाबींचा समावेश त्यात करण्यात आला आहे.  

प्रशिक्षण सुविधा  प्रकल्पांतर्गत ‘अपेडा’ व ‘आयसीएआर’ या दोन्ही संस्था संयुक्तरीत्या निर्यात धोरण विकसित करतील. त्या अनुषंगाने भरडधान्ये प्रक्रियादार व उद्योजकांना प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये निर्यातविषयक विविध धोरणे व योजनांचा समावेश असेल. या प्रयत्नांतून भरडधान्यांची निर्यात वाढण्यास गती मिळेल. विविध शेतीमालाच्या निर्यातीला अजून उत्तेजन देण्यासाठी अपेडाने तमिळनाडू कृषी विद्यापीठ, बंगळूर येथील कृषी विज्ञान विद्यापीठ, नाफेड आदींशीही करार केले आहेत.

तयार होणार ‘क्लस्टर्स’ प्रकल्पात मुख्यत्वे देशातील भरडधान्यांचे प्रमुख क्षेत्र असलेल्या राज्यांचा वा भागांचे संकलन व संबंधित शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे. या शेतकऱ्यांना बियाण्यांचा सक्षम पुरवठा करण्याच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात येणार आहे. भरडधान्ये निर्यात प्रोत्साहन व्यासपीठही स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये संबंधित तज्ज्ञांच्या मार्फत निर्यातीचे ‘क्लस्टर्स’ निश्‍चित करण्यात येतील. त्यादृष्टीने गरजेएवढ्या उत्पादनाचा स्रोत व उपलब्धता तयार होणे शक्य होणार आहे. त्यानंतर शेतकरी कंपन्यांसोबत ही संपर्क यंत्रणा जोडली जाईल. साहजिकच शेतकरी व शेतकरी कंपन्यांना विविध बाजारपेठांचा स्रोत मिळून त्या हस्तगत करण्यास मदत होईल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com