सांगली बाजार समितीचे त्रिभाजन करा ः पणनमंत्री सुभाष देशमुख

पणनमंत्री सुभाष देशमुख
पणनमंत्री सुभाष देशमुख

सांगली  ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील नावाजलेली संस्था आहे. बाजार समितीच्या उपसमित्या आहेत. प्रत्येक तालुक्‍यातील कार्यकर्त्यांना राजकारणात संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी बाजार समितीचे त्रिभाजन करावे, असा सल्ला सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला. बाजार समितीच्या विस्तारासाठी जागा खरेदी करण्यासाठी लवकरच मुंबई येथे बैठक घेऊ, असे सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

बाजार समितीतर्फे विविध कामांचा प्रारंभ पणनमंत्री देशमुख यांच्या हस्ते शनिवारी (ता. ५) झाला. या वेळी खासदार संजय पाटील अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार दिनकर पाटील, जे. के. जाधव, महापौर संगीता खोत, समितीचे सभापती दिनकर पाटील उपस्थित होते. हळदीला जी. आय. मानांकन मिळवून देणारे गणेश हिंगमिरे यांचा पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते सत्कार झाला.  

या वेळी मंत्री देशमुख म्हणाले, की सांगलीतील मोठ्या बाजार समितीचा ताण कमी करण्यासाठी तुम्हीच तुमच्या पातळीवर विभाजन करावे. यामुळे अनेक राजकीय कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांसाठी समितीच्या माध्यमातून काम करता येईल. सांगलीच्या हळदीला जी. आय. मानांकन मिळाल्याने लौकिकात भर पडलीय. गूळ, मिरचीसाठीही मानांकन मिळावे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडण्यासाठी बाजार समितीने प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणुकीत मतदानाचा अधिकार दिल्याने त्यांना न्यायासाठी समितीची जबाबदारी वाढली आहे.    

सभापती दिनकर पाटील म्हणाले, की बाजार समितीवरील ताण आणि ई-नाम अंमलबजावणीसाठी, बेदाणा, हळद विक्रीसाठी जागा कमी पडते आहे. महापालिका क्षेत्रात कुपवाड एमआयडीसी येथे असणाऱ्या जागा खरेदीसाठी मंजुरी मिळावी.  संचालक जीवन पाटील, अभिजित चव्हाण, देयगोंडा बिरादार, हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, शीतल पाटील, सचिव एन. एम. हुल्याळकर, व्यापारी, हमाल या वेळी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com