सांगलीत साडेतेवीस लाख टन उसाचे गाळप

ऊस गाळप हंगाम
ऊस गाळप हंगाम
सांगली ः यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे हंगाम सुरू झाले आहेत. दीड महिन्यात २३ लाख ५८ हजार ४७५ टन उसाचे गाळप होऊन २५ लाख ८७ हजार २३३ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी उतारा १०.९७ टक्के आहे.
 
दुष्काळी भागातील आटपाडी आणि कवेठमहांकाळ तालुक्‍यात उसाची कमतरता असल्याने माणगंगा व कवठेमहांकाळ येथील महांकाली या कारखान्याने उशिरा गाळप सुरू केले असून यंदाच्या हंगामात हे कारखाने किती दिवस गाळप करतील, याबाबत प्रश्‍न उपस्थित राहू लागला आहे. 
 
राज्य शासनाने यंदा साखर गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली. यामुळे यंदा साखर कारखान्यांनी लवकर गाळपाला सुरवात केली. तरीही ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या कमी आल्यामुळे तोडणी संथ गतीने सुरू आहे. शेतकऱ्यांकडून एकरी तोडणीसाठी आतापासूनच पैशाची मागणी होत आहे.
 
जिल्ह्यात सहकारी व खासगी साखर कारखान्यांची संख्या १८ आहे. त्यातील १५ साखर कारखाने सुरू झाले आहेत. आटपाडीच्या माणगंगा साखर कारखान्याचे गाळप उशिरा म्हणजे १ डिसेंबरला सुरू झाले. तासगाव, जत, यशवंत आणि नागेवाडी येथील चार साखर कारखाने बंद आहेत.
हंगामाचा आढावा घेतला तर २३ लाख ५८ हजार ४७५ टन उसाचे गाळप होऊन २५ लाख ८७ हजार २३३ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
 
साखर उताऱ्यात सांगली-कोल्हापूर जिल्ह्याची आघाडी यंदाही कायम राहिली आहे. साखर उताऱ्यामध्ये राजारामबापू साखराळे (११.५९ टक्के) व सर्वोदय (११.४८ टक्के) आघाडीवर आहेत. आजअखेरचा सरासरी उतारा १०.९७ टक्के आहे. राजारामबापू वाटेगाव युनिटचा साखर उतारा ११.४५, हुतात्मा कारखान्याचा ११.२५, सोनहिरा कारखान्याचा ११.२५, क्रांती कारखान्याचा ११.१२ टक्के आहे. महांकाली कारखान्याचा साखर उतारा ९.२९ तर आटपाडीच्या माणगंगा कारखान्याचा साखर उतारा सर्वात कमी ५.५० टक्के इतका आहे.
 
आजपर्यंतचा हंगाम समाधानकारक असला तरी ऊस तोडणी मजुरांच्या कमतरतेमुळे कारखान्यांना तारेवरची कसरत करायची वेळ येणार आहे. दुष्काळी पट्ट्यात कारखान्यांना गाळपासाठी उसाची कमतरता भासू लागली आहे. यामुळे या कारखान्यांनी गाळप हंगाम उशिरा सुरू केला आहे.
 
दुष्काळी भागातील आटपाडी येथील माणंगगा आणि कवठेमहांकाळ येथील महांकाली कारखान्याने जरी उशिरा गाळप सुरू केले असले तरी या कारखान्यांना अजून गाळपासाठी लय सापडलेली नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com