सिंधुदुर्गात ऊसतोड रखडली

नादुरूस्त करूळ घाट रस्त्यामुळे ऊसवाहतूक करणे शक्य नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे तोडणी होणार कधी असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.
सिंधुदुर्गात ऊसतोड रखडली
Sugarcane fell in Sindhudurg

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ऊसशेती तोडणी अभावी संकटात सापडली असून दोन महिन्यात केवळ १ हजार ५०० टन उसाची तोडणी झाली आहे. नादुरूस्त करूळ घाट रस्त्यामुळे ऊसवाहतूक करणे शक्य नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे तोडणी होणार कधी असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.

जिल्ह्यातील वैभववाडी आणि कणकवली या दोन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस लागवड आहे. याशिवाय कुडाळ, मालवण, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांत देखील ऊस लागवड काही प्रमाणात आहे. जिल्ह्यात सरासरी १७६० हेक्टरवर ऊस लागवड असून उत्पादन १ लाख ५ हजार टन आहे. यातील ९० हजार टनांपेक्षा अधिक ऊस हा वैभववाडी आणि कणकवली या दोन तालुक्यामध्ये उत्पादित होतो. हा ऊस असळज (ता. गगनबावडा) येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याला जातो. या कारखान्याचा गाळप हंगाम यावर्षी १ नोव्हेंबरपासून सुरू झाला. मात्र, हंगामाच्या सुरुवातीलाच नादुरूस्त करूळ घाटरस्त्यामुळे या घाटमार्गे ऊस वाहतूक करणे जिकरीचे असल्याचे कारण पुढे करीत कारखाना प्रशासनाने ऊसतोडणी मजूर पाठविण्यास नकार दिला. जोपर्यंत रस्ता सुस्थितीत येत नाही तोपर्यंत ऊसतोडणी होणार नाही हे ऊस उत्पादकांच्या लक्षात आल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. 

चर्चेवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला ५ नोव्हेंबर त्यानंतर ५ डिसेंबरपूर्वी करूळ घाट दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन दिले. परंतु दोन्ही वेळा टळून गेल्या आहेत. अजूनही रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही.त्यामुळे जिल्ह्यातील ऊसतोडणी रखडली आहे. आतापर्यंत स्थानिक शेतकऱ्यांनी १५०० टन उसाची तोडणी करून तो कारखान्यावर पोहोचविला आहे. ऊसतोडणीला विलंब होत असल्यामुळे ऊसशेतीचे संपूर्ण गणित बिघडणार आहे. नव्याने लागवड, खोडव्याला भरणी कधी करायची असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील १५०० टन उसाची तोडणी आतापर्यंत झालेली आहे. करूळ घाटरस्त्याने ऊस वाहतूक करणे जिकरीचे आहे. त्यामुळे जोपर्यंत रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत ऊसतोडणी करता येणार नाही. - भागोजी शेळके, पर्यवेक्षक, डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना,  असळज, गगनबावडा

मी साडेपाच एकरवर ऊसलागवड केलेली आहे. दीड दोन महिन्यापूर्वी तोडणी होणे आवश्यक होती. परंतु अद्याप तोडणी झालेली नाही. हा ऊस नेमका कधी तुटणार हे देखील आम्हाला समजेनासे झाले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर शासनाला जाग येणार का. - समाधान साळुंखे, ऊस उत्पादक शेतकरी, कुसूर

ऊसतोडणी जितक्या उशिराने होणार तितके शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे. उत्पादनात घट, वन्यप्राण्यांकडून नुकसान, पुर्नेलागवडीत अडचणी अशा अनेक समस्या शेतकऱ्यांसमोर आहेत. - किशोर जैतापकर, ऊस उत्पादक शेतकरी, नापणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.