सातारा जिल्ह्यात ऊसदराचा ८०-२० चा फॉर्म्युला निश्चित होणार?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा ः गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालवधी झाला असताना फक्त अजिंक्यतारा व जयवंत शुगर या साखर कारखान्यांनी ऊसाची पहिली उचल दिली आहे. या कारखान्यांनी दिलेल्या दरावरून एकरकमी एफआरपीऐवजी ८०-२० या फॉर्म्युल्यानुसार दर दिल्याचे दिसत असल्याने इतरही साखर कारखाने हाच फॉर्म्युला स्वीकारतील अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. 

जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेगात सुरू आहे. राज्याच्या अनेक भागांत दुष्काळाच्या झळा तीव्र असल्याने बहुतांशी कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात ऊस तोड मजूर उपलब्ध झाले असल्याने विनाखंडीत गाळप हंगाम सुरू आहे. हा हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. अजिंक्यातारा कारखान्याने या हंगामात ऊसदराची कोंडी फोडत पहिली उचलपोटी प्रतिटन २३०० रुपये दर दिला आहे. त्यानंतर जयवंत शुगर या कारखान्याने प्रतिटन २४०० रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केले आहेत. या दोन्ही कारखान्यांची एफआरपी बघता ८०-२० या फॉर्म्युलानुसार एफआरपी दिली असल्याचे दिसून येत आहे.

साखरेचे दर २९०० ते २९५० रुपये क्विंटल आहेत. साखरेच्या बाजारभावाच्या ८५ टक्के कर्ज पुरवठा बँकाकडून दिला जातो. यातून तोडणी, वाहतूक व प्रक्रिया जाता पहिल्या उचलीसाठी ८०-२० प्रमाण स्वीकारण्याशिवाय पर्याय नसल्याचे कारखान्यांकडून बोलले जात आहे. त्यामुळे उर्वरित कारखाने हाच फॉर्म्युला कायम ठेवतील असे सध्यातरी दिसत आहे. 

साखरेच्या दरात सुधारणा होत नसल्यामुळे साखर कारखान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. मात्र, यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. एफआरपीचे तुकडे झाल्याने घेतलेले पीककर्ज फिरणार नाही. पहिली उचल उशिरा आल्याने किमान दीड महिन्यांचे अधिक व्याज शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे. तसेच उसाच्या बिलातून देण्यात येणारी वार्षिक देणी लांबणीवर जाणार आहेत. कमी पर्जन्यमानामुळे उसाचे अपेक्षित वजन मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असतानाच बिलाचे तुकडे झाल्याने या नाराजीत भर पडली आहे. 

शेतकरी संघटना काय भूमिका घेणार? जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांकडून एक रकमी एफआरपीची मागणी कायम आहे. मात्र सध्याचे साखरेचे दर व बँकांकडून मिळणारे कर्ज बघता कारखानदारांकडून उसाला ८०-२० या फॉर्म्युल्याप्रमाणे दर दिला जाईल असे दिसत आहे. सध्या अजिंक्यतारा व जयवंत शुगर ऊस बिले जमा केली आहे. यामुळे शेतकरी संघटना उसदराबाबत काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com