राज्यातील मातीत गंधक, जस्त, लोह, बोरॉनची कमतरता

हरितक्रांतीनंतर जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या वाणांचा उगम झाला. मात्र उत्पादन वाढले असताना मातीचे आरोग्य बिघडत गेले.
soil health map
soil health map

अकोला ः हरितक्रांतीनंतर जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या वाणांचा उगम झाला. मात्र उत्पादन वाढले असताना मातीचे आरोग्य बिघडत गेले. सेंद्रिय घटक, पीक फेरपालटाचा अभाव, खतांचा असंतुलित वापर आदी कारणांनी जमिनीची सुपीकता खालावली आहे. त्याचे दुष्परिणाम अन्नधान्य उत्पादनातून दिसू लागले आहेत. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यान्वित अखिल भारतीय सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य संशोधन प्रकल्पांतर्गत राज्यात विभागनिहाय मातीचे परीक्षण करण्यात आले. त्यात मातीत गंधक, जस्त, लोह, बोरॉनची कमतरता वाढत चालल्याची बाब प्रामुख्याने समोर आली आहे. या प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. हाडोळे, कनिष्ठ मृद्‍ शास्त्रज्ञ पी. ए. सरप, संशोधन सहयोगी एस. आर. लाखे यांच्या चमूने राज्यात विभाग, जिल्हानिहाय तपासणी झालेल्या साडेचौदा हजारांवर नमुन्यांचे विश्‍लेषण केले. त्यात उपरोक्त निष्कर्ष समोर आले.   शेतीत रासायनिक खतांचा भरमसाट वापर वाढला. तशा या खतांच्या किमतीसुद्धा वाढत गेल्या. तुलनेने दुसरीकडे सेंद्रिय खतांची पाहिजे तेवढी उपलब्धता आढळून येत नाही. या निविष्ठांची कार्यक्षमता वाढविण्याचा व अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना माती परीक्षणावर आधारित उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने काळी कसदार जमीन आढळते. विदर्भ व मराठवाड्यात काळ्या जमिनी या उथळ, मध्यम खोल व खोल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. कोकणात जास्त पावसाच्या प्रदेशात लाल तांबडी जमीन आढळून येते. त्या भागातील जमिनी आम्लयुक्त असून, उच्चतम निचऱ्याच्या असतात. पश्‍चिम महाराष्ट्रात अत्यंत उथळ, मध्यम ते खोल काळ्या जमिनी आहेत. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये दुय्यम अन्नद्रव्य सल्फर म्हणजेच गंधकाची कमतरता वाढत्या प्रमाणात आढळून येत आहे. सेंद्रिय खतांमधून गंधकाचा पुरवठा चांगल्या प्रकारे होत असतो. परंतु अलीकडच्या काळात त्याचा वापर कमी असून, हे त्यामागील महत्त्वाचे कारण आहे. त्याचप्रमाणे डायअमोनियम फॉस्फेट (डीएपी) सारख्या खताचा स्फुरदासाठी वाढता वापर हे देखील कारण आहे. सुपर फॉस्फेटचा वापर केल्यास गंधकाचा म्हणजेच सल्फरचा पुरवठा होत असतो. एकूणच गंधकाच्या व्यवस्थापनासाठी ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.  जमिनीत मोठ्या प्रमाणात जस्ताची कमतरता आढळून येत आहे. मागील दोन दशकांच्या तुलनेत फार झपाट्याने वाढल्याचे विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले. लोह तसेच बोरॉनची सुद्धा कमतरता वाढत आहे. जमिनीची वाढती विम्लता, तापमान वाढ, पीक फेरपालटाचा अभाव आणि सेंद्रिय खतांचा कमी वापर इत्यादी कारणांमुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता वाढली आहे.  तृणधान्ये, कडधान्ये, भाजीपाला व फळपिके जवळ जवळ सर्वच पिकात सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेचे विपरीत परिणाम दिसून येत आहेत. माती परीक्षणाच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा, कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत सर्वेक्षण करून जमीन सुपीकतेचा अभ्यास करण्यात आला. तालुकानिहाय मातीचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. यानुसार जमिनीत गंधक, जस्त, लोह, बोरॉन या अन्नद्रव्यांची कमतरता प्रामुख्याने समोर आली. 

परीक्षणात आढळलेल्या महत्त्वाच्या बाबी

  • विदर्भात २५.७ टक्के माती नमुन्यांमध्ये गंधकाची कमतरता आढळली. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जस्त, लोह व बोरॉनची कमतरता अनुक्रमे ४९, १८ व २० टक्के मातीच्या नमुन्यात आढळली.
  •  मराठवाड्यात गंधकाची २९.४ टक्के नमुन्यांमध्ये, तर सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जस्त (५१.५), लोह (१९.७), तर बोरॉन (२६.२) कमी आढळले.
  • कोकणात अतिपावसाच्या लाल जमिनींमध्ये गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची ४०.४ टक्के मातीच्या नमुन्यात कमतरता आढळली. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये बोरॉनची ५८.७ टक्के, तर जस्ताची कमतरता २९.८ टक्के नमुन्यात दिसून आली.
  • पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये गंधकची कमतरता १४.३ टक्के, तर सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जस्त, लोह व बोरॉनची अनुक्रमे २०.७, २८.२ आणि ५३.० टक्के नमुन्यात निर्देशित झाली.
  • महाराष्ट्र राज्यात गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता २८.५ टक्के मातीच्या नमुन्यात दिसून आली. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जस्त, लोह व बोरॉनची कमतरता अनुक्रमे ३७.८, १६.५ आणि ३६.० टक्के नमुन्यात दिसून आली.
  • दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन १) गंधक : गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीला विविध पिकांच्या शिफारशीनुसार (प्रति हेक्टरी ३०-४० किलो गंधक) जिप्सम किंवा बेन्टोनाइट गंधक यामधून द्यावा. सिंगल सुपर फॉस्फेटचा स्फुरद पुरवठा करण्यासाठी नियमित वापर करावा. सेंद्रिय खते (शेणखत, कंपोस्ट, इत्यादी) पीक फेरपालट, शेतावरील काडीकचरा यांचा नियमीत वापर करावा. २) जस्त : कमतरता असल्यास शिफारशीनुसार (झिंक सल्फेट २० ते २५ किलो प्रतिहेक्टरी). जस्तयुक्त खतांचा तृणधान्य, तेलवर्गीय व भाजीपाला पिकांना तीन वर्षांतून एकदाच वापर करावा. झिंक कोटेड युरिया या खतांचा वापर करावा. सेंद्रिय खते, हिरवळीचे खते यांचा नियमित वापर करावा. झिंक सल्फेट (०.५ टक्का) किंवा झिंक ईडीटीएची (०.२५ टक्का) पिकांना आवश्यकतेनुसार फवारणी करावी. ३) लोह : सेंद्रिय खते, हिरवळीची खते, कंपोस्ट यांचा नियमीत वापर करावा. लोह सल्फेट (हिराकस) (१ टक्का) किंवा लोह ईडीटीएची (०.५० टक्का) फवारणी करावी. ४) बोरॉन : सेंद्रिय खतांचा नियमीत वापर. कमतरता असलेल्या जमिनीत बोरॅक्स ३ ते ५ किलो प्रति हेक्टर वापरावे.

    गंधक २७.४८ टक्के
    जस्त ३७.८
    लोह १६.५७
    तांबे ०.१९
    बोरॉन ३६.०८

    डॉ. हाडोळे - ८२०८६५६८६५

    प्रतिक्रिया जमिनीचा अल्कधर्मी सामू, सेंद्रिय कर्बाची कमतरता, एक पीक पद्धतीचा अवलंब, चुनखडीयुक्त, क्षारयुक्त आणि चोपण जमिनी, जमिनीची धूप होणे आणि रासायनिक खतांचा असमतोल वापर यामुळे जमिनीत विविध व अनेक अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शिफारशीप्रमाणे खते दिली पाहिजेत.  - डॉ. हरिहर कौसडीकर, संचालक संशोधन, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com