पशुसंवर्धन विभागाची यंत्रणाच आजारी 

सरकारकडून शेतीपूरक पशुपालनासाठी प्रोत्साहन दिले जात असतानाच अमरावती जिल्ह्यात मात्र पशुसंवर्धन विषयक सेवा-सुविधांचा अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
पशुसंवर्धन विभागाची यंत्रणाच आजारी 
The system of the Animal Husbandry Department is sick

अमरावती : सरकारकडून शेतीपूरक पशुपालनासाठी प्रोत्साहन दिले जात असतानाच अमरावती जिल्ह्यात मात्र पशुसंवर्धन विषयक सेवा-सुविधांचा अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या संदर्भाने पशुपालकांच्या तक्रारींची दखल घेत जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी थेट पशुसंवर्धन आयुक्तांना पत्र लिहित हा कारभार सुधारावा, असे आदेश दिले आहेत. 

चांदूर बाजार तालुक्यातील बेसखेडा येथील शेतकरी रविकिरण पाटील यांच्या शेळ्या आजारी पडल्या होत्या. जनावरांच्या आजारपणाचे नेमके कारण कळावे याकरिता त्यांनी पशुसंवर्धन खात्याकडे आजारी जनावरांचे रक्त नमुने घेण्याची विनंती केली. त्यानुसार चांदूरबाजार येथील लघू पशुचिकित्सालय यांच्याकडून शेळ्या-मेंढ्यांचे रक्त नमुने घेण्यात आले. परंतु या ठिकाणी रक्त नमुने तपासण्याची सुविधा नसल्याने हे नमुने अमरावती येथील सर्व पशुचिकित्सालयाकडे पाठविण्यात आले.

अमरावती येथे सुद्धा रक्त नमुने तपासण्यासाठीचे इन्ग्रेडियंट नव्हते. त्यामुळे हे नमुने पुढील कारवाईसाठी अकोला येथील पशुसंवर्धन खात्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. अकोला प्रयोगशाळेतील मायक्रोस्कोप महिनाभरापासून नादुरुस्त असल्याचे कारण सांगून हे नमुने त्यानंतर पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले.

अशाप्रकारे रक्त नमुने तपासण्यासाठी टोलवाटोलवी करण्यात आल्याने आजारी शेळ्यांवर योग्य वेळी उपचार करता आला नाही. परिणामी शेळ्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण वाढीस लागले यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान झाले. त्या पार्श्‍वभूमीवर विदर्भातील एकाही पशुवैद्यकीय दवाखान्यात रक्त तपासण्याची सुविधा नसावी ही बाब खेदजनक असल्याचा आरोप पशुपालक रविकिरण पाटील यांनी केला होता. त्यांनी या संदर्भाने पशुसंवर्धन खात्याकडे पत्रव्यवहारही केला मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. 

पशुसंवर्धन विभागाकडून आहवाल सादर करण्याचे आदेश  जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. पशुसंवर्धन विभाग तसेच पशुसंवर्धन आयुक्त यांना पत्र लिहीत अमरावती जिल्ह्यातील पशुसंवर्धन खात्याचा कारभार सुधारावा, असे आदेश दिले आहेत. दर्यापूर, अंजनगावसुर्जी, अचलपूर, मोर्शी, वरुड, चांदुररेल्वे, चांदुरबाजार, अशा सर्व ठिकाणी पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय आहेत. परंतु पशूंच्या प्राथमिक आरोग्या बाबतच्या रक्त तपासणी व सोनोग्राफी सारख्या सुविधादेखील या ठिकाणी नसल्याचे गंभीर आणि धक्कादायक वास्तव आहे, असे कडू यांनी या पत्रात म्हटले आहे.

अमरावती येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील एक्स-रे मशिन ही गेल्या बारा वर्षांपासून बंद आहे. आता सोनोग्राफी मशिनसुद्धा बंद असल्यामुळे जनावरांवर उपचार करणे पशुपालकांना शक्य होत नाही. त्यामुळे शासनाच्या मुख्य उद्देशाची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकत नाही. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने यावर तत्काळ कारवाई करून अहवाल सादर करावा, असे निर्देशही कडू यांनी दिले आहेत.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.