सदोष बियाणेप्रकरणी पंचनामे करून दोषींवर कारवाई करा : किसान सभा

सोयाबीनचे सदोष बियाणे वितरित झाल्यामुळे सोयाबीन पेरा वाया गेल्याच्या गंभीर तक्रारी येत आहेत. शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. उगवण न झालेल्या शेतांमध्ये शेतकऱ्यांना दुबार पेरणी करायची आहे.
soybean
soybean

मुंबई ः सोयाबीनचे सदोष बियाणे वितरित झाल्यामुळे सोयाबीन पेरा वाया गेल्याच्या गंभीर तक्रारी येत आहेत. शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. उगवण न झालेल्या शेतांमध्ये शेतकऱ्यांना दुबार पेरणी करायची आहे. मात्र लेखी तक्रार करूनही कृषी विभागाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे. अशा शेतांचे तातडीने पंचनामे करावेत. दोषींवर कारवाई करावी. शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी व कृषी सेवा केंद्र अखंडितपणे सुरू राहतील यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी किसान सभेने केली. 

राज्यभरातील कृषी सेवा केंद्र दर रविवारी बंद राहत असल्याने शेतकऱ्यांना हंगामाच्या काळात निविष्ठा उपलब्ध होताना अडचणी येत आहेत. कृषी सेवा केंद्रांच्या राज्य संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यभरातील कृषी सेवा केंद्र आठवड्यातून एकदा बंद ठेवण्यात येत आहेत. बहुतांश ठिकाणी रविवारी केंद्रं बंद ठेवली जात आहेत. तोंडावर आलेला हंगाम व कोरोनामुळे अगोदरच खंडित झालेली वितरण साखळी पाहता कृषी सेवा केंद्रांच्या राज्य संघटनेने आपल्या या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे.  किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी याविषयीचे निवेदन दिले आहे.  सरकारने खबरदारी घेतली नाही कोरोना लॉकडाउनमुळे वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे खरीप हंगामात खते, बियाणे, अवजारे यांचा पुरवठा प्रभावित होऊ शकतो, तसेच लॉकडाउनच्या संधीचा गैरफायदा घेत बियाण्यांच्या गुणवत्तेत फेरफार होऊ शकतो, असा इशारा किसान सभेने हंगामापूर्वीच दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांना यासंबंधीचे निवेदनही देण्यात आले होते. मात्र, तरी पुरेशी खबरदारी घेतली गेली नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. सोयाबीनच्या बनावट बियाण्यांचे वितरण, खतांची राज्यभरातील टंचाई व निविष्ठांचा तुटवडा हे खरिपाच्या तयारीत सरकारी यंत्रणेने निष्काळजीपणा केला असल्याचेच लक्षण आहे, असा आरोपही किसान सभेने केला. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com