सांगली जिल्ह्यातील जनावरे तहानली

सांगली जिल्ह्यातील जनावरे तहानली
सांगली जिल्ह्यातील जनावरे तहानली

सांगली : तीन महिन्यांपासून दुष्काळी पट्ट्यात टॅंकरची मागणी सुरू होती. तरीदेखील जिल्हा प्रशासनाने लवकर टॅंकर सुरू केले नाहीत. सध्या जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात पिण्यासाठी  २९ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, टॅंकरच्या पाण्यात जनावरांना पाणी नाही. त्यांना पाणी कुठून आणायचे, या चिंतेत पशुपालक अडकल्याची स्थिती आहे. 

यंदा पावसाने दडी मारली. यामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून पाणी टंचाईला सुरुवात झाली. नोव्हेंबर महिन्यापासून पाणीटंचाईची तीव्रता अधिक होऊ लागली. दुष्काळी पट्ट्यातील जनतेने पिण्यासाठी टॅंकर सुरू करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली. पण जिल्हा प्रशासाने जिल्हा टॅंकरमुक्त अशी घोषणा केल्यामुळे ते सुरू करण्यासाठी नकारच दिला. मात्र, वस्तुस्थिती बघितल्यानंतर जिल्हा प्रशासनाने टॅंकर सुरू केले. परंतू दुष्काळी भागात पाणीपुरवठा करताना केवळ पिण्याच्या पाण्याचा विचार प्रशासनाने केल्याचे चित्र आहे.  

प्रत्येक माणसाला दररोज २० लिटर पाणीपुरवठा करताना प्रशासनाला जनावरांचा पूर्णतः विसर पडला आहे. जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्‍यांत २ लाख ३३ हजार मोठी, तर ३ लाख ६६ हजार छोटी जनावरे आहेत. त्यातील सत्तर टक्‍क्‍यांहून अधिक जनावरे माणसाच्या वाट्यातील पाण्यावर जगवली जात आहेत. मोठ्या जनावरांना रोज ४० ते ६० लिटर, तर छोट्या जनावरांना किमान ८ लिटर पाणी आवश्‍यक असते. जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्याचा हिशेब टॅंकरच्या पाण्यात नाही. यामध्ये जनावरांचे प्रचंड हाल होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. कारण, इथे माणसांना पाणी देताना हिशेब मांडला जातो. तिथे जनावरांचे काय? अशी स्थिती आहे. टॅंकरच्या खेपा वाढविण्याची मागणी करूनदेखील त्या वाढविल्या जात नाहीत. 

कवठेमहांकाळ, आटपाडी व जत तालुक्‍यांतील गावांत पंचक्रोशीत पाणी नाही, अशी निम्म्याहून अधिक गावे आहेत. काही गावांना दोन-तीन किलोमीटर वणवण केल्यावर पाणी मिळते. 

विहिरी, बोअरवेलमध्ये ठणठणाट  जत तालुक्यात २८ प्रकल्प आहेत. त्यापैकी १६ प्रकल्प कोरडे आहेत. या तालुक्यातील अनेक गावात पाऊस झाला नाही. विहिरीने तळ गाठला, कूपनलिकांचे पाणी आटले आहे. जत तालुक्यात नऊ गावांत १० टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. तालुक्यातून टॅंकरची मागणी आहे. त्याद्वारे जित्राबांनाही पाणी द्या, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com