उद्ध्वस्त पीक पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यांत अश्रू

Tears in the farmer's eyes over the devastated crop
Tears in the farmer's eyes over the devastated crop

बुलडाणा ः हे संपूर्ण वर्षच शेतकऱ्यांसाठी अग्निपरीक्षा घेणारे ठरले आहेत. जिल्ह्यात खरीप पिके पूर्ण हातातून गेले होते. आता रब्बीत आशा लागलेल्या पिकांना मंगळवारी (ता. १७) झालेल्या वादळी पाऊस, गारपिटीने उद्ध्वस्त  केले. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. नैसर्गिक आपत्तीत संपूर्ण हातातून गेल्याचे पाहून मोताळा तालुक्यातील जनूना येथील वयोवृद्ध शेतकरी ढसाढसा रडला. हे चित्र मन हेलावणारे होते. 

वऱ्हाडात मंगळवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार गारपिटही झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी या नुकसानीमुळे कर्जाच्या खायीत लोटल्या गेला. सोयाबीन व कापसाचा हंगाम पावसामुळे वाया गेला. आता रब्बीकडून आशा असताना या अवकाळीने गहू व मका पिकाचे नुकसान केले. 

नुकसानाची पाहणी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मोताळा (जि. बुलडाणा) तालुक्यातील जनूना, धामणगाव, कोथळी, परडा, शिरवा, डिडोळा, बोरखेड, तरोडा, जयपूर या गावात भेटी दिल्या. 

मका व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून आले. यामध्ये जनूना येथील शेतकरी सुभाष पंढरीनाथ मानकर यांच्या शेतातील दीड एकरातील संपूर्ण मका पीक उद्‍ध्वस्त झाले. या शेतकऱ्याच्या शेतात तुपकर हे पाहणीसाठी गेले असता शेतकरी मानकर यांनी रडायला सुरुवात केली. सर्वांनी शेतकऱ्यांस धीर देण्याचा प्रयत्न केला. शासनाची मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. शेतकऱ्याची व्यथा तुपकर यांनी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्यापर्यंत पोचविली. शेतकऱ्यांना तत्काळ मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सरकारचे काम हे आपत्तीच्या काळात मदत करणे आहे. दर दोन-तीन वर्षांनी अशी नैसर्गिक आपत्ती येत असते. याकरीता सरकारने शेतकऱ्यांसाठी फंड राखून ठेवला पाहिजे. इतर उद्योगांना कर्ज माफ होतात. मदत केली जाते. शेतकरी जेव्हा नैसर्गिक आपत्तीमुळे कोलमडल्या जातो, तेव्हा मात्र सरकार त्यांना मदत करायला धजावत नाही. या आपत्तीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीही तुपकर यांनी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com