सोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवक

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पंधरवड्यात सलग तिसऱ्यांदा कांद्याची विक्रमी आवक झाली असून, गुरुवारी (ता. २७) कांद्याची तब्बल एक हजार ८५ गाड्यांपर्यंत (एक लाख ८ हजार ५७८ क्विंटल) आवक झाली.
सोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवक
Ten thousand tons of onion arrives in Solapur

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पंधरवड्यात सलग तिसऱ्यांदा कांद्याची विक्रमी आवक झाली असून, गुरुवारी (ता. २७) कांद्याची तब्बल एक हजार ८५ गाड्यांपर्यंत (एक लाख ८ हजार ५७८ क्विंटल) आवक झाली. आवक वाढली, तरी कांद्याचे दर मात्र किरकोळ चढ-उतार वगळता स्थिर राहिले. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३००० रुपयांपर्यंत दर मिळाला. दरम्यान, एकाच दिवशी आवक वाढल्याने बाजार समितीत कांदा ठेवायला जागा नसल्याने शुक्रवारचे (ता. २८) कांद्याचे लिलाव रद्द करण्यात आले आहेत.   

गेल्या पंधरवड्यापासून बाजार समितीत कांद्याची आवक सातत्याने वाढते आहे. १० जानेवारीला १ लाख ५ हजार चारशे क्विंटल आवक झाली होती. त्यानंतर २४ जानेवारीलाही ६० हजार क्विंटलपर्यंत आवक झाली होती. त्यानंतर आता तिसऱ्यांदा आवक एक लाख क्विंटलच्या वर पोहोचली आहे. कांद्याची ही आवक स्थानिक भागातून तुलनेने कमी आहे. पण पुणे, नगर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर या भागांतून अधिक होते आहे.  यंदा सततच्या पावसामुळे नाशिक, नगर भागांत कांद्याचे उत्पादन घटले आहे.

परिणामी, सोलापूर व परिसरातील उस्मानाबाद, बीड, लातूर भागांत उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे. त्याचा परिणाम आवक वाढण्यात झाला असल्याचे सांगण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त बुधवारी (ता. २६) कांदा लिलावाला सुट्टी होती. पण रात्रीपासूनच बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढत राहिली. रात्रीपर्यंतच ८०० गाड्या आवक झाली. त्यानंतर गुरुवारी (ता. २७) सकाळी त्यात आणखी २०० गाड्यांची भर पडली. पण आवक वाढली, तरी किरकोळ चढ-उतार वगळता दर मात्र ‘जैसे थे’ राहिले. गुरुवारी कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये दर मिळाला. कांद्याची एकूण आवक आणि विक्री विचारात घेता सुमारे १६ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

वातावरणात होणारे बदल यामुळे कांदा बाजारात आणत आहेत. एकाच दिवशी आवक झाली, तरी अन्य बाजारपेठात कांद्याची आवक कमी असल्याने दर मात्र फारसे उतरलेले नाहीत. पुढेही हीच स्थिती राहिली, असे वाटते. - महेश ठेसे, कांदा आडत व्यापारी, सोलापूर बाजार समिती   

कांद्याची वाढलेली आवक आणि झालेले व्यवहार याचा विचार करता एका दिवसात सर्व कांद्याचे लोडिंग पूर्ण होईल, अशी शक्यता कमी आहे.   त्यामुळे उद्याचे शुक्रवारचे लिलाव रद्द करण्यात येणार आहेत.  - विनोद पाटील, कांदा विभाग प्रमुख, सोलापूर बाजार समिती

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.