सोलापूर जिल्ह्यात टंचाईच्या झळा कायम

सोलापूर जिल्ह्यात टंचाईच्या झळा कायम
सोलापूर जिल्ह्यात टंचाईच्या झळा कायम

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पाऊस लांबणीवर पडत असल्याने गावोगावी पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. साहजिकच, टॅंकरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ३७९ टॅंकरद्वारे पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येत असून, सर्वाधिक सांगोला ६१, तर मंगळवेढा ५८, करमाळ्यात ५८ टॅंकर सुरू आहेत. 

राज्याला जलयुक्‍तचा नवा पॅटर्न देणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात टॅंकरची संख्या वाढत असल्याने जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांबाबत प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. विशेषत: जलयुक्‍तची सर्वाधिक कामे झालेल्या तालुक्‍यात टॅंकर संख्या जास्त आहे. जूनपर्यंत टॅंकर कमी होतील, असा अंदाज टंचाई शाखेने व्यक्‍त केला. परंतु, चित्र उलट दिसू लागले आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील सात लाख ४६ हजार नागरिकांना टॅंकरच्या माध्यमातून पाणी देण्यात येत आहे. दररोज टॅंकरच्या ८०४ खेपा होत असूनही नागरिकांची तहान भागेना, असे चित्र दिसत आहे. पावसाने ओढ दिल्याने खरीप पेरण्या खोळंबल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. जिल्ह्यातील एकूण टॅंकरमध्ये केवळ पाच टॅंकर शासकीय, तर उर्वरित खासगी आहेत.

३३४ गावे अन्‌ दोन हजार वाड्या तहानलेल्या  माढा तालुक्‍यातील ३४ गावे अन्‌ २९ वाड्यांत ४० टॅंकरद्वारे पाणी देण्यात येत आहे. तर सांगोल्यातील ५३ गावे व ४४४ वाड्या, माळशिरसमधील २३ गावे व २१९ वाड्या, मंगळवेढ्यातील ५१ गावे अन्‌ ५७२ वाड्या, मोहोळ तालुक्‍यातील २५ गावे अन्‌ १६० वाड्या, पंढरपुरातील ११ गावे व ११४ वाड्या, करमाळ्यातील ५० गावे व ३९६ वाड्या, अक्‍कलकोटमधील १६ गावे तर दक्षिण सोलापुरातील २७ गावे, बार्शीतील २४ गावे आणि उत्तर सोलापुरातील २० गावांना सध्या टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com