तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या बाजाराला पसंती 

सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील शेवटचे पीक तुरीचे बाजारात आगमन झाले आहे. शासनाने हमीदराने नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरू केले आहेत.
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या बाजाराला पसंती 
Toor Vikrisathi Shetakalyanchi open market place

अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील शेवटचे पीक तुरीचे बाजारात आगमन झाले आहे. शासनाने हमीदराने नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरू केले आहेत. हमीदराच्या तुलनेत खुल्या बाजारात तुरीला चांगले दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली, तरी विक्रीसाठी मात्र खुल्या बाजाराला पसंती देत शासकीय केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.  शासनाने नाफेडच्या माध्यमातून एक जानेवारीपासून तूरखरेदीचे आदेश काढले आहेत. अमरावती जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंगची सात व विदर्भ मार्केटिंगची आठ, अशी एकूण पंधरा केंद्रे सुरू करण्यात आली असून, ४६२८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या पूर्वी मूग, उडीद व सोयाबीनच्याही शासकीय खरेदीला शेतकऱ्यांचा फार प्रतिसाद मिळालेला नाही. दर्यापूर येथे ६९ शेतकऱ्यांचा २२० क्विंटल मूग व ८ शेतकऱ्यांचा ३३ क्विंटल उडीद इतकीच खरेदी शासकीय केंद्रांवर झाली आहे. सोयाबीनचा शेतकरी फिरकलाही नाही.  तुरीच्या बाबतीतही हीच स्थिती दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यात १ लाख २३ हजार २०९ हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी आहे. या वर्षी तुरीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी तुरीचे दर हमीदराच्या खाली होते. सध्या हा दर खुल्या बाजारात हमीदराच्या आसपास आहे. शनिवारी (ता. १५) नवीन तुरीला ५,६०० ते ६,५०० रुपये भाव होता. आवक मात्र अत्यंत अल्प म्हणजे केवळ २७७ पोत्यांची होती. गेल्या पंधरवड्यात तुरीला हमीभावाच्या आसपास भाव मिळू लागला आहे. ३ जानेवारीला नवीन तुरीला ५,४०० ते ५,९०० असा हमीदरापेक्षा कमी भाव होता. तुरीच्या भावात वाढ होईल, अशी शक्यता खुल्या बाजारातील खरेदीदारांनी वर्तविली आहे.  शासनाच्या खरेदी केंद्रांवर विविध निकष लावले जातात. त्यामुळे खरेदी ऑनलाइन जरी असली, तरी शेतकऱ्यांसाठी ती डोकेदुखी ठरू लागते. त्यामुळे शेतकरी खुल्या बाजारातील स्थिती बघूनच या केंद्रांकडे जाऊ लागला आहे. शिवाय हमीदराच्या तुलनेत चांगले भाव मिळवू लागल्याने शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रांना सध्यातरी टाटा केला आहे.  जिल्ह्यातील नोंदणी  जिल्हा मार्केटिंग फेडरेशन (७ केंद्र) : २१५२  विदर्भ मार्केटिंग फेडरेशन (८ केंद्र) : २४७६ 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com