हळद यंदाही भाव खाण्याची शक्यता

देशात यंदा हळद उत्पादनात २० ते २५ टक्के घट येण्याची शक्यता आहे. तसेच हळद दर सध्या ७ ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान असून मागणीही चांगली आहे. हळदीचा मुख्य हंगाम मार्च-एप्रिलमध्ये सुरू होईल आणि या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हळद यंदाही भाव खाण्याची शक्यता
Turmeric is likely to be priced this year as well

पुणे ः देशात यंदा हळद उत्पादनात २० ते २५ टक्के घट येण्याची शक्यता आहे. तसेच हळद दर सध्या ७ ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान असून मागणीही चांगली आहे. हळदीचा मुख्य हंगाम मार्च-एप्रिलमध्ये सुरू होईल आणि या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. असे झाल्यास ऐन हंगामात हळदीला देशांतर्गत आणि निर्यातीसाठी मागणी वाढेल. यामुळे दरही टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

मसाले बोर्डाच्या मते यंदा देशात जवळपास तीन लाख हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे. मात्र मसाले बोर्डाच्या आकडेवारीचा गोंधळ कायम आहे. कारण महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या मते राज्यात यंदा ८४ हजार ६६ हेक्टरवर हळद लागवड असून, मसाले बोर्डाच्या मते ५७ हजार ६६९ हेक्टरवर हळद पीक आहे. तेलंगणा राज्याच्या आकडेवारीचाही गोंधळ असून, बोर्डाच्या मते तेलंगणात यंदा हळद लागवड ४९ हजार हेक्टरवर आहे, तर येथील राज्य सरकारने ५६ हजार हेक्टरवर हळदीची लागवड असल्याचे म्हटले आहे. इतर राज्यांचा विचार करता मसाले बोर्डाच्या मते यंदा आंध्र प्रदेशात ३० हजार हेक्टर, कर्नाटकात २१ हजार आणि तमिळनाडूत २० हजार हेक्टरवर हळद पीक आहे.  दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाना आणि काश्मीर भागांतील उद्योग सध्या नव्या मालाची वाट पाहत आहेत. कारण मागील काही महिन्यांत हळदीला चांगला उठाव मिळाला. निर्यातही झाली. त्यामुळे बऱ्याच भागात मालाचा तुटवडा आहे. प्रक्रिया उत्पादनात अग्रेसर असलेल्या काही बहुराष्ट्रीय आणि मोठ्या कंपन्या चांगल्या गुणत्तेच्या हळदीचा वापर करतात. त्या कंपन्याही नवीन हंगामातील हळदीकडे डोळे लावून आहेत, असेही प्रक्रिया उद्योगाकडून सांगण्यात आले. गुजरातमध्ये राज्यासह इतर भागातून नं.१ च्या हळदीचा मोठा पुरवठा होत असतो. तर दिल्ली, पंजाब, हरियाना आणि राजस्थान भागात नं.२ च्या हळदीला मागणी असते, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

बाजारात किती माल येऊ शकतो? जाणकारांच्या मते देशातील हळद उत्पादनात यंदा २० ते २५ टक्के घट होण्याचा अंदाज. मसाले बोर्डाच्या मते यंदा देशात ११ लाख टन हळद उत्पादन होण्याची शक्यता आहे. तर व्यापारी आणि उद्योगाच्या मते देशात सरासरी ९० ते ९५ लाख पोत्यांची बाजारात आवक होत असते. मात्र यंदा उत्पादनात २० ते २५ टक्क्यांची घट होऊन बाजारातील हळदीची आवक ७० ते ७५ लाख पोत्यांच्या दरम्यान राहील.  

कोणत्या राज्यात बसला फटका? देशात सरासरी तमिळनाडूत यंदा सततचा पाऊस आणि कीड-रोगामुळे हळद उत्पादनात सर्वाधिक घट येण्याची शक्यता आहे. येथे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचा फटका उत्पादनाला बसला आहे. तेलंगणातही यंदा हळद उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्यासह काही जिल्ह्यांत हळद उत्पादनात घट होणार असल्याचे शेतकरी आणि व्यापारी सूत्रांनी सांगितले. बिहारमध्ये पाऊस झाल्याने येथील उत्पादन हाती येण्याबाबत शंका आहे. बिहारमध्ये यंदा १ ते दीड लाख पोत्यांची आवक होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे येथून राज्यातील हळदीला मागणी राहील, असे जाणकारांनी सांगितले. 

काय आहे दराची स्थिती? देशातील महत्त्वाच्या बाजारांत सध्या हळदीला चांगला दर मिळत आहे. चांगल्या गुणवत्तेच्या नं.१ च्या हळदीला प्रति क्विंटल ७ हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. तर मध्यम गुणवत्तेच्या हळदीला प्रति क्विंटल ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. सध्या बाजारात जुन्या हळदीची आवक होत आहे.

यंदाही हळदीला झळाळी मिळेल?

देशातील हळदीचा हंगाम तोंडावर असला तरी आवकेचा दबाव पुढील महिन्यापासून वाढेल. सध्या महत्त्वाच्या बाजारांत दर तेजीत आहेत. मात्र आवकेचा दबाव वाढल्यानंतर दर काहीसे दबावात येण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव २०२२ च्या पहिल्या तीमाहीत कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे झाल्यास देशांतर्गत आणि निर्यातीसाठीही हळदीला मागणी वाढेल आणि दराला आधार मिळेल, असे जाणकारांनी सांगितले. देशातील हळद हंगामाला निजामाबाद बाजारातून प्रारंभ होत असतो. येथील बाजारात संक्रांतीच्या काळात मुहूर्ताचे सौदे होतात.

प्रतिक्रिया

निजामाबाद बाजारात दोन दिवसांपासून हळदीच्या दरात ५०० ते १ हजार रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे. सध्या नं.१ च्या हळदीला प्रति क्विंटल ९ हजार ते ९ हजार २०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. तर सिंगल पॉलिश हळदीचे व्यवहार सरासरी ८ हजारांनी होत आहे. यंदा उत्पादनात २० ते २५ टक्क्यांची घट होण्याचा अंदाज आहे. बाजारात आवक कमी राहिल्यास दराला आधार मिळेल. - शुभम झावर, हळद व्यापारी आणि प्रक्रियादार, निजामाबाद, तेलंगणा

सध्या बाजारात जुन्या हळदीची आवक सुरू आहे. दैनंदिन आवक तीन ते साडेतीन हजार पोत्यांची होत आहे. तसेच चांगल्या दर्जाच्या हळदीला ८ हजार २०० ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. तर मध्यम गुणवत्तेच्या मालाला ७ हजार २०० रुपयांपासून दर आहे.  - लक्ष्मीनारायण मुर्क्या, हळद व्यापारी, वसमत बाजार समिती

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com