गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः भुजबळ

रब्बी हंगामाचा विचार करून ज्या भागात पाण्याची आवश्यकता जास्त आहे. त्या ठिकाणी शेतीला पाणी देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः भुजबळ
Water in priority areas: Bhujbal

नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करताना धरण साठ्यात उपलब्ध असणाऱ्या पाणीसाठ्यानुसार स्थानिक नागरिकांना २० ते २५ टक्के पाणी आरक्षित असावे. यासाठी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विभागाने शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यास स्थानिक नागरिकांच्या पाणी आरक्षणाबाबतचा प्रश्न मार्गी लागणार असून सर्वांना समान न्याय देता येणार आहे. या बरोबरच रब्बी हंगामाचा विचार करून ज्या भागात पाण्याची आवश्यकता जास्त आहे. त्या ठिकाणी शेतीला पाणी देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील मोठे प्रकल्पांचे २०२१-२२ करिता सिंचनाचे नियोजन करणेकामी कालवा सल्लागार समितीच्या आयोजित बैठकीत भुजबळ बोलत होते. या बैठकीला कृषिमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार डॉ. सुधीर तांबे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, माणिकराव कोकाटे, दिलीपराव बनकर, देवयानी फरांदे, सुहास कांदे, नितीन पवार, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, राजेंद्र गोवर्धने यांच्यासह इतर पदाधिकारी व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

गंगापूर प्रकल्पाच्या नाशिक डावा तट कालव्यातून सिंचन व बिगर सिंचनासाठी रब्बी व उन्हाळा हंगामात प्रत्येकी तीन आवर्तने, कडवा प्रकल्पाच्या उजवा कालव्यातून सिंचन व बिगर सिंचनासाठी एक, ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प पालखेड डाव्या तट कालव्यातून सिंचनासाठी रब्बी हंगामात दोन आवर्तने व बिगर सिंचनासाठी उन्हाळा हंगामात दोन आवर्तने तसेच पालखेड उजव्या तट कालव्यातून सिंचन व बिगर सिंचनासाठी रब्बी व उन्हाळी हंगामात प्रत्येकी तीन आवर्तने सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प ओझरखेड प्रकल्प यामध्ये ओझरखेड व तिसगाव कालव्यातून सिंचनासाठी रब्बी हंगामात दोन व उन्हाळा हंगामात बिगर सिंचनासाठी एक आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चणकापूर प्रकल्प कालव्यातून सिंचन व बिगर सिंचनासाठी रब्बी हंगामात एक व उन्हाळा हंगामात मर्यादित क्षेत्रासाठी एक आवर्तन देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.  

जिल्ह्यातील गिरणा धरण प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी योग्य नियोजन केले; तर त्या धरणालगत असणाऱ्या एकूण सात गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. यासाठी पाण्याचे नियोजन करताना पिण्याचे पाणी व या क्षेत्रात असणाऱ्या ‘एमआयडीसी’साठी लागणारे पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे. तसेच   तळवाडे व दाभाडी या गावांसाठी स्वतंत्र्य पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षणाचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना कृषिमंत्री भुसे यांनी संबंधित विभागाला यावेळी दिल्या.

पाणी आरक्षित करून नियोजन  जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पातील गंगापूर, कडवा, पालखेड व ओझरखेड आणि चणकापूर प्रकल्पांमधून सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करताना स्थानिकांच्या पिण्याचे पाणी आरक्षित करून नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी केल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com