उन्हाळ्यात पाणी टंचाई कमी भासणार 

पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्याने भूगर्भातील पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे दर वर्षी पाणी टंचाई भासणाऱ्या गावांच्या संख्येत घट झाली आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईची शक्यता कमी असली तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.
Water scarcity will be less in summer
Water scarcity will be less in summer

पुणे : पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्याने भूगर्भातील पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे दर वर्षी पाणी टंचाई भासणाऱ्या गावांच्या संख्येत घट झाली आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईची शक्यता कमी असली तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या अभ्यासानुसार राज्यातील ५६ तालुक्यांतील सुमारे ६१० गावांतील पाणीपातळी एक मीटरहून अधिक खोल गेली असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी अवघ्या ७३ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सदृश्य परिस्थिती भासणार असल्याचे चित्र आहे. 

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे या भागातील धरणे तुडुंब भरली होती. मात्र, विदर्भातील पश्चिम भागात अत्यंत कमी, पूर्व भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे धरणेही कमीअधिक स्वरूपात भरली आहे. मात्र, दर वर्षी उन्हाळ्यात उन्हाचा तीव्रता वाढत असल्याने झालेल्या भूजल साठ्यातून सिंचनासाठी, औद्योगिक वापरासाठी तसेच शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.  भूजलातील उपसा मोठ्या प्रमाणात झाला असून, त्याचा परिणाम भूजल पातळीच्या स्थितीवर होऊ लागला आहे. गेल्या वर्षी सुमारे ९८२ गावांमध्ये एक मिलीमीटरपेक्षा पाणी पातळी खोल गेलेली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी वाढ झाली असली तरी उपसा अधिक झाल्यास उन्हाळ्यात काही प्रमाणात टंचाई भासण्याची शक्यता आहे. 

पर्जन्यमानाचा तुलनात्मक अभ्यास  ऑक्टोबर अखेरीस तालुकानिहाय पर्जन्यमानासोबत तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार सरासरीच्या तुलनेत ३५५ तालुक्यांपैकी २५८ तालुक्यात सरासरी, त्यापेक्षा जास्त पर्जन्यमान झालेले असून, ६७ तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत घट आढळून आली आहे. सरासरीच्या पर्जन्यामानाच्या तुलनेत तूट आलेल्या २५८ तालुक्यांपैकी ६७ तालुक्यांत ० ते २० टक्के तूट आढळून आली आहे. तर १७ तालुक्यांत २० ते ३० टक्के, १३ तालुक्यांत ३० ते ५० टक्के, तर ५० टक्केपेक्षा जास्त तूट एकाही तालुक्यात आढळून आलेली नाही. 

असा झाला विहिरीच्या पाणीपातळीचा अभ्यास  भूगर्भातील पाणीपातळीचा अभ्यास करण्यासाठी राज्यात पाणलोट क्षेत्रनिहाय ३२ हजार ७६९ निरीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत. गेल्या ऑक्टोबर महिना अखेरमधील निरिक्षण विहीरीतील पाणी पातळीचा मागील पाच वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील सरासरी भूजल पातळीशी तुलनात्मक करण्यात आला. राज्यातील ३ हजार ६६० निरीक्षण विहिरींपैकी ३ हजार ९९ विहिरींमधील भूजल पातळीमध्ये सरासरीपेक्षा वाढ झाली आहे. ५६१ निरीक्षण विहिरीमधील भूजल पातळीमध्ये सरासरीच्या तुलनेत घट आढळून आलेली आहे. त्यामध्ये राज्यातील एकूण ६१० गावांत भूजल पातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आहे. त्यापैकी ७३ गावांत तीन मीटरपेक्षा घट आढळून आली आहे. तर १०१ गावांमध्ये दोन ते तीन मीटर, ४३६ गावांत एक ते दोन मीटरने घट आढळून आली आहे. 

विदर्भात ६७९ गावांत पाणी पातळी खोल  विदर्भात काही भागात कमी झालेल्या पावसाचा परिणाम २३ तालुक्यात जानेवारी महिन्यापासून दिसून येईल. विदर्भातील सुमारे २३४ गावांत एक मीटरहून अधिक खोल पाणीपातळी आहे. यामध्ये नागपूर विभागातील ५५ तर अमरावती विभागातील १७९ गावांचा समावेश आहे. त्यापैकी १४० गावांत एक ते दोन मीटर, तर ३७ गावांत दोन ते तीन मीटर, तर ५७ गावांत तीन मीटरहून अधिक पाणीपातळी खोल गेली आहे. 

मराठवाड्यात भूजल पातळीत वाढ  मराठवाड्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने भूजलपातळीत चांगली वाढ झाली आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. मात्र, उपसा अधिक होत असल्याने मराठवाड्यातील तीन तालुक्यातील आठ गावांत एक मीटरहून अधिक पाणी पातळी खोल असल्याचे निदर्शनास आले आहे. यात जालना, परभणी, लातूर जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे. त्यापैकी सहा गावात एक ते दोन मीटर, तर दोन गावांत दोन ते तीन मीटर, तर तीन मीटरहून अधिक खोल पाणी पातळी असलेल्या गावांची संख्या शून्य आहे. 

खानदेशात पाणीपातळी खोलच  मध्य महाराष्ट्रातील पाणीपातळी चांगलीच वाढ झाली आहे. त्यातच कमी झालेला उपशामुळे या भागातील पाणी पातळी चांगली झाली आहे. मात्र, खानदेशात कमी झालेल्या पावसामुळे भूजल पातळी खोल गेलेल्या गावांची संख्या अधिक आहे. खानदेशात २७५ गावांत एक मीटरहून अधिक पाणीपातळी खोल गेल्याचे दिसून आले आहे. त्यापैकी १९९ गावांत एक ते दोन मीटर, तर ६१ गावांत दोन ते तीन मीटर, तर १५ गावांत तीन मीटरहून अधिक पाणी पातळी खोल गेल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात नंदुरबार जिल्ह्यातील सर्वाधिक गावांचा समावेश आहे. या शिवाय पुणे, नाशिक या जिल्ह्यातील गावामध्येही भूजल पातळी खोल असल्याचे निदर्शनास आले आहे. 

भूजल पातळी खोल जाण्याची कारणे  - पावसाचे स्थळ, वेळ आणि दोन पावसातील खंड  - भूजलाचा सिंचनाकरिता होणारा अतिउपसा  - भूजलाचे नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव  - कमी पर्जन्यमान पर्यायाने कमी भूजल पुर्नभरण  - पर्जन्यमानाची तीव्रता व त्याचा कालावधी 

प्रतिक्रिया  पावसाळ्यात चांगल्या पावसामुळे भूजल पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, रब्बी हंगामात पाण्याचा उपसा अधिक वाढला तर पुन्हा पाणीपातळी झपाट्याने खाली जाईल. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून कमीत कमी उपसा कसा करता येईल, यावर भर द्यावा. जेणेकरून टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश्य परिस्थिती तयार होणार नाही.  -चिंतामणी जोशी, आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com