युरोपचे ‘ग्रीन डील’ खरेच तसे ठरणार का?
युरोपचे ‘ग्रीन डील’ खरेच तसे ठरणार का?

युरोपचे ‘ग्रीन डील’ खरेच तसे ठरणार का?

केवळ युरोपातील कर्ब उत्सर्जन रोखण्याच्या कृतीतून जागतिक पातळीवर फारसे काही हाती लागणार नसल्याचा निष्कर्ष कार्लशुहेर इस्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजी या संस्थेतील शास्त्रज्ञांनी काढला आहे.

केवळ युरोपातील कर्ब उत्सर्जन रोखण्याच्या कृतीतून जागतिक पातळीवर फारसे काही हाती लागणार नसल्याचा निष्कर्ष कार्लशुहेर इस्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजी या संस्थेतील शास्त्रज्ञांनी काढला आहे. हे विश्लेषण ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. युरोपीय महासंघाने २०१९ च्या उत्तरार्धामध्ये हवामान बदलाच्या समस्येवर मात करण्याच्या उद्देशाने ग्रीन डील जाहीर केले. त्यानुसार २०५० या वर्षापर्यंत युरोप हा हवामान उदासीन ठेवणारा पहिला खंड बनणार आहे. येथील कर्ब उत्सर्जन कमी करण्यात येणार असून, जंगलाची वाढ, कृषी, अपारंपरिक ऊर्जा आणि पर्यावरणपूरक वाहतूक यांना चालना देण्यात येत आहे. एकूणच पृथ्वीवरील वातावरण बदल रोखण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल म्हणून याकडे पाहिले जात आहे. मात्र, कार्लशुहेर इस्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजी या संस्थेतील शास्त्रज्ञांनी या धोरणांचे विश्लेषण केले आहे. त्यांच्या मते, उद्देश चांगला असला तरी गरजेच्या अत्यावश्यक शेतीमालासाठी अन्य खंडावर त्यांना अवलंबून राहावे लागेल. एकूणच पृथ्वीचा विचार केला असता एका बाजूचे उत्सर्जन कमी झाले तरी अन्य ठिकाणचे उत्सर्जन वाढणार आहे. म्हणजेच एकूण उत्सर्जनामध्ये फारसा फरक पडणार नसल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. त्या ऐवजी जागतिक पातळीवर एकत्रितरीत्या शाश्वत कृती करण्याची आवश्यकता आहे. असे असतील बदल

  • युरोपीय महासंघाच्या वतीने कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्याद्वारे येत्या २०३० पर्यंत कृषी क्षेत्रातील एक चतुर्थांश क्षेत्र सेंद्रिय पद्धतीखाली आणण्यात येणार आहे. एकूण क्षेत्रातील रासायनिक खते व कीडनाशकांच्या वापरामध्ये अनुक्रमे २० टक्के आणि ५० टक्के घट करण्यात येणार आहे.
  •  ३ अब्ज झाडांची लागवड करण्यासोबतच २५ हजार कि.मी. नद्यांचे संवर्धन केले जाणार आहे.
  •  मधमाश्या आणि गांधीलमाश्यांची घटणारी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
  • सध्याची व्यापार स्थिती युरोपीय महासंघातील देशांकडून लक्षावधी टन शेतीमाल आयात करण्यात येतो. २०१९ मध्ये एक पंचमांश पिके, मांस आणि दुग्धजन्य उत्पादने आयात करण्यात आली. युरोपपेक्षा पर्यावरणीय निकष तुलनेने कमी असलेल्या देशांतून ही आयात झाली. उदा. जनुकीय सुधारित पिकांच्या लागवडीसाठी युरोपमध्ये बंदी असली अशी सोयाबीन, मका उत्पादने ब्राझील, अर्जेंटिना, अमेरिका आणि कॅनडा येथून आयात केली जातात. ज्या देशातून आयात केली जाते, ते देश युरोपच्या तुलनेमध्ये दुप्पट खतांचा वापर करतात. या देशातील कीडनाशकांचा वापरही सातत्याने वाढत आहे. अशा स्थितीमध्ये केवळ एकाच खंडामध्ये उपाययोजना केल्या तरी अन्य खंड अथवा देशातून होणाऱ्या उत्पादन व आयातीमुळेही हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढणार आहे. त्याचा फटका एकूण जागतिक हवामानाला बसणारच आहे. उपाययोजना ः

  • सातत्याने वाढत राहणाऱ्या मागणी व पुरवठ्यातील ताणांमुळे युरोपिय निकष अन्य देशांवर फार काळ लादता येणार नाहीत. उलट जागतिक पातळीवर कर्ब पदचिन्ह (कार्बन फूटप्रिंट) विश्लेषणाचे एकसारखे निकष लावले गेले पाहिजेत.
  •  मांस आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वापरामध्ये योग्य तितकी घट झाली पाहिजे.
  •  स्थानिक उत्पादनाला चालना दिली पाहिजे.
  •  जैवविविधता कमी असलेल्या किंवा शेतीखाली नसलेल्या क्षेत्राचे रूपांतर जंगलामध्ये केले पाहिजे.
  •  जनुकीय सुधारणांच्या तंत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बाह्य घटकांतील जनुकांचा वापर करण्याऐवजी अंतर्गत जनुकीय सुधारणांद्वारे खाद्य वस्तुमान, पिकांची उंची व रोग, कीड प्रतिकारक्षमता वाढवणे याकडे लक्ष दिले पाहिजे.
  • युरोप खंडामध्ये केले जाणारे संभाव्य प्रयत्न हे महत्त्वाचे आणि योग्य असले तरी एकाच विभागामध्ये करण्यात येणार आहेत. येथील लोक अत्यावश्यक गरजांसाठी आयातीवर अवलंबून राहणार आहे. थोडक्यात, येथील शेतीचा ताण अन्य देशांतील शेती क्षेत्रावर येण्याची शक्यता आमच्या संशोधनात दिसत आहे. - रिचर्ड फुक्स, हवामान आणि वातावरण संशोधन संस्था.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com