बासमतीची निर्यात वाढण्याची शक्यता

येत्या २ एप्रिलपासून रमझान सुरु होत आहे आणि २१ मार्च रोजी नवरोज आहे. या सणासुदीच्या काळातील वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सौदी अरेबिया आणि इराणकडून जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाणार आहे.
बासमतीची निर्यात वाढण्याची शक्यता
basmati-rice

इराण आणि सौदी अरेबियाकडून होणारी बासमती तांदळाची वाढीव खरेदी भारतीय निर्यातदारांसाठी दिलासादायक ठरणार आहे. या दोन्ही देशांकडून येत्या काळात बासमती खरेदीचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे त्यामुळे भारतीय बासमतीची निर्यात (indian exporters) वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

ऑक्टोबर महिन्यात नवीन धान्य बाजारात दाखल झाल्यापासून सलग तीन महिने भारतीय बासमती निर्यातीचे  (export) प्रमाण घटले होते. तरीही युक्रेनच्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्यातीचे  (export) प्रमाण समाधानकारक राहिले आहे.     

व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यातील पहिल्या तीन आठवड्यांत ०.२५ लाख टन निर्यातीचे  (export) करार करण्यात आले आहेत. यंदाच्या जानेवारीतील निर्यातीच्या कराराचे प्रमाण गेल्यावर्षीच्या जानेवारी महिन्यातील एकूण कराराच्या ७० टक्के ठरले आहे.     

येत्या २ एप्रिलपासून रमझान सुरु होत आहे आणि २१ मार्च रोजी नवरोज आहे. या सणासुदीच्या काळातील वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सौदी अरेबिया आणि इराणकडून जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाणार आहे.

गेल्यावर्षीपेक्षा या दोन महिन्यात बऱ्यापैकी निर्यात होणे शक्य होणार आहे. त्यामुळेच २०२०-२०२२ दरम्यान ४. ४ मेट्रिक टन बासमती निर्यातीचे उद्दिष्ट गाठणे शक्य असल्याचे प्रतिपादन ऑल इंडिया राईस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे (All India Rice Exporters Association) माजी अध्यक्ष विजय सेठिया यांनी केले आहे.     

एप्रिल ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान बासमती निर्यातीचे प्रमाण २१ टक्क्यांनी घटून ते २.४ मेट्रिक टनांवर आले होते. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० दरम्यान बाजारात मोठ्या उलाढाली घडूनही २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात बासमतीच्या एकूण निर्यातीत केवळ ४ टक्क्यांची वाढ होऊन केवळ ४.६३ मेट्रिक टन निर्यात झाली.      

व्हिडीओ पहा   

अधिकृत माहितीनुसार, इराण आणि कुवैतखेरीज सौदी अरब, इराक, येमेन, संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, इंग्लंड, कतार आणि ओमान या देशांतही बासमती निर्यातीची संधी उपलब्ध आहेत. २०२० साली देशांतर्गत उत्पादन समाधानकारक झाल्याने इराणकडून बासमतीची मागणी मंदावली होती, असे निर्यातदारांनी म्हटले आहे.  एप्रिल ते नोव्हेंबर २०२१-२०२२ दरम्यान बासमतीची इराणकडील निर्यात गेल्यावर्षीच्या ०.५१ मेट्रिक टनांवरून ३ टक्क्यांनी वाढली आहे. 

डिसेंबर २०२१ मधील कराराच्या नोंदणीवरून बासमतीच्या निर्यातीत ५ टक्क्यांची घट दिसून येते आहे, मात्र काही निर्यातदार दरावरून नव्याने वाटाघाटी करत असल्यामुळे प्रत्यक्षात ही घट १५ ते २० टक्क्यांपर्यंत जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२० मध्ये बासमतीचे दर ८३० डॉलर्स प्रति टन होते. तर ऑक्टोबर २०२० मध्ये ९७० डॉलर्स प्रति टन असे होते. बासमतीची किंमत ऑक्टोबर २०२१ मध्ये ८९०-९०० डॉलर्स प्रति टन वरून ९८०- ९९० डॉलर्स प्रति टनांवर गेला आहे.  

आपण आपली युरोपियन युनियनमधील मोठी बाजारपेठ गमावली आहे. त्यात पाकिस्तान आणि इराणकडून आपल्या बाजारपेठेतील स्थानाला धक्का पोहचला आहे. पाकिस्तानचा तथाकथित बासमती हायब्रीड हे वाण भारताच्या मूळ वाणाला आव्हान देत आहे. भारताने आपली दर्जेदार उत्पादने जागतिक बाजारात प्रमोट करण्याची गरज असल्याचे मत परकीय व्यापार नियोजन तज्ज्ञ एस. चंद्रशेखरन यांनी व्यक्त केले आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.