...तर गावांना मिळणार ५० लाख 

राज्यात कोरोनाच्या फैलावाला सुरूवात झाल्यानंतर वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर खबरदारी आणि उपाययोजनांसाठी सरकारनं प्रयत्न केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी या सारखे अभियान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राबवले.
...तर गावांना मिळणार ५० लाख 
Corona

पुणे - भारतासह जगात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनानं मुक्काम ठोकला आहे. पहिली लाट, दुसरी लाट अशा लाटांवर लाटा येत आहेत. पण कोरोना काय जायचं नाव घेईना. त्यात कमी म्हणून का काय, तर आता या कोरोनानं (Covi-19) आपल्या भावबंदकीला पण आणलं आहे. अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा (Delta) झालचं तर आत्ता आत्ता आलेला ओमीक्रॉन (Omicron) ही सगळी कोरोनाचीच भावबंदकी. पण नाव वेगवेगळी. 

गेल्या दोन वर्षांपासून माणसं आपलं नॉर्मल आयुष्य जगायचंच विसरून गेलीत. आत्ता आत्ता कुठं मुलं शाळेत जायला लागलेली. तर पुन्हा कोरोनाची तिसरी लाट आली. आता झपाट्यानं रुग्णांची संख्या वाढतीयं म्हटल्यावर लाटच आलीय म्हणायची न्हाय का. केंद्र सरकार बरोबरच महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) पण ह्या कोरोनाला आळा घालण्यासाठी नाय नाय त्या उपाययोजना केल्या. पण कोरोना काय जायचं नाव घेईना. मग आता सरकारनंच एक नामी शक्कल काढलीय. कोरोना जात नाय ना. मग आपणच कोरोनापासून लांब ऱ्हायचं.  आता तुम्ही म्हणालं लांब ऱ्हायचं म्हणजे काय करायचं. 

तर राज्य सरकानं ग्रामीण भागात कोरानाचा प्रसार वाढू नये म्हणून. कोरोनामुक्त गाव स्पर्धेचं आयोजन केलं आहे. कोरोनामुक्त गावासाठी सरकार ५० लाख रुपयांचं बक्षिस देणारं आहे. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्यावतीनं ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या गावांना अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ५० लाख, १५ लाख आणि १० लाख रुपयांच बक्षिस मिळणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबतची माहिती दिली आहे.  

राज्यात कोरोनाच्या फैलावाला सुरूवात झाल्यानंतर वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर खबरदारी आणि उपाययोजनांसाठी सरकारनं प्रयत्न केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी या सारखे अभियान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राबवले. आपल्या कुटुंबाबरोबरच गावपातळीवर वाड्या वस्त्यांना कोरोनामुक्त ठेवले तर तालुका, जिल्हा आणि राज्य कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे गावे कोरोनामुक्त होणे आवश्‍यक आहेत. त्यामुळे गावांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारनं या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गावांना प्रामुख्याने कुटुंबनिहाय सर्वेक्षण करणे, गावात विलगीकरण कक्ष स्थापन करणे, कोरोना तपासणीसाठी आणि उपचारासाठी गावातच रुग्णवाहिका उपलब्ध करून त्यासाठी वाहनचालकांचे पथक निर्माण करणे, कोरोना हेल्पलाइन आणि कोरोना लसीकरण पथक स्थापन करणे, अशा सुविधा कराव्या लागणार आहेत.  

स्पर्धेतील सहभागासाठी अटी - 

- पुणे जिल्ह्यात १० जानेवारी ते १५ मार्च २०२२ स्पर्धा कालावधी - स्पर्धा कालावधीत केलेल्या कामांचेच मूल्यांकन केले जाणार - ग्रामपंचायतींना १५ मार्चपर्यंत स्वमूल्यांकन करावे. - स्वमूल्यांकनाचे प्रस्ताव १५ मार्चअखेर गट विकास अधिकाऱ्याकडे सादर करणे अनिवार्य - ग्रामपंचायतींच्या स्वमूल्यांकनाची २० मार्चपर्यंत गट विकास अधिकारी तपासणी करणार - तपासणीतील गुणांच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील गुणानुक्रमे पहिल्या गावांची यादी होणार - गावांची तपासणी मुख्यकार्यकारी अधिकारी करून पहिली तीन गावे निवडणार - निवड झालेल्या गावांची नावे विभागीय आयुक्तांना पाठविणार

४४ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले - 

राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आतापर्यंतच्या सुमारे पावणे दोन वर्षांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील ४४ गावांनी कोरोना विषाणूला वेशीवरच रोखून धरलं आहे. या सर्व गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. यामध्ये भोर तालुक्यातील सर्वाधिक १७ गावांचा समावेश आहे. तर पुरंदर तालुक्यातील एकमेव गावाने यात स्थान पटकावलं आहे.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.