ओल्या दुष्काळा’साठी पायऱ्यांवर निदर्शने

पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधक आक्रमक
Political News
Political NewsAgrowon


मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतीची नुकसानभरपाई तत्काळ जाहीर करा, अशी मागणी करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी जोरदार निदर्शने केली. ‘५० खोके एकदम ओक्के’, ‘या सरकारचे करायचे काय... खाली डोके वर पाय’, ‘महाराष्ट्रात गद्दारी, सत्तेत आली शिंदे स्वारी’ अशा घोषणा देत विरोधकांनी विधान भवनाचा परिसर दणाणून सोडला.
सकाळी १० वाजल्यापासून विरोधकांनी पायऱ्यांवर निदर्शने सुरू केली. या वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी आमदारांनी फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. ‘ओला दुष्काळ जाहीर करा’, ‘अतिवृष्टिग्रस्तांना मदत करा, ईडी सरकार हाय हाय’, ‘खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो’,‘ स्थगिती सरकार हाय हाय’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पावणेअकराच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले असता घोषणांना जोर आला.

Political News
ओला दुष्काळ जाहीर करून अधिवेशन बोलवा

सत्ताधारी - विरोधक आमनेसामने
विरोधी सदस्य पायऱ्यांवर निदर्शने करत असताना अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री आणि आमदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी बाहेर आले. त्या वेळी विरोधकांनी ‘पन्नास खोके एकदम ओके...’ ‘ईडी सरकार हाय हाय...’ अशा घोषणा दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र विरोधकांकडे दुर्लक्ष करत सत्ताधारी पुतळ्याकडे गेले.

मुंडेंनी डिवचले नाराजांना
पायऱ्यांवर घोषणाबाजी सुरू असताना शिवसेनेतून फुटून शिंदे गटात गेलेल्या आणि मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या संजय शिरसाट यांचे आगमन होताच धनंजय मुंडे यांनी ‘संजय शिरसाठ यांना मंत्रिपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ अशी घोषणा देताच हशा पिकला. तर आशिष शेलार यांचे आगमन होताच ‘आशिष शेलार यांना डावलणाऱ्या सरकारचा निषेध असो,’ अशी घोषणा देताच शेलार यांनीही विरोधकांना हात उंचावणे पसंत केले.

मंत्र्यांवर अतिरिक्त जबाबदारी
रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप यामुळे प्रश्‍नांच्या उत्तरांचा घोळ निर्माण झाला होता. प्रश्‍नांची उत्तरे तयार करण्यासाठी अधिकारी शेवटच्या क्षणापर्यंत कसरत करत होते. मंत्रिमंडळात केवळ १८ मंत्री असल्याने विविध खात्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे कोण देणार असा प्रश्‍न होता. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्याकडील खाती अन्य मंत्र्याकडे वाटली आहेत. यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे परिवहन, अन्न व औषधमंत्री यांच्याकडे सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मृदा व जलसंधारण विभाग, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण व वातावरणीय बदल, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे अल्पसंख्याक व औकाफ विभागाची जबाबदारी सोपविली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com