नगर जिल्हा परिषदेच्या कडबाकुट्टी वाटप नियोजनात असमतोल

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः  जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे देण्यात येणाऱ्या कडबाकुट्टी वाटपाच्या नियोजनात असमतोल झाला आहे. यात चौदा तालुक्यांपैकी तीन तालुक्यांवर अधिक मेहरबानी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद स्वनिधीतून राबविण्यात येणाऱ्या या ७५ लाख रुपये खर्चाच्या योजनेत ८३३ कडबाकुट्टींपैकी एकट्या संगमनेरच्या वाट्याला २१८ कडबाकुट्ट्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे, कृषी समितीचे विद्यमान सभापती काशिनाथ दाते यांच्या पारनेर तालुक्याच्या वाट्याला अवघ्या ३९ कडबाकुट्टी आहेत. यावरून जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये संघर्षाची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून दरवर्षी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना कडबाकुट्टीचा लाभ दिला जातो. त्यासाठी तालुकापातळीवरून अर्ज मागवून घेतले जातात. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, सभापती यांच्या शिफारशीवरून कृषी समितीच्या मासिक लाभार्थी निवडले जातात. जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने दरवर्षीच कडबाकुट्टीला मोठी मागणी असते. त्यातुलनेत निधीची तरतूद होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे यापूर्वीदेखील कडबाकुट्टीवरून वादंग झाल्याचे पाहावयास मिळालेले आहे. यंदादेखील जिल्हा परिषदेतील कृषी विभागाकडून कडबाकुट्टीचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी ७५ लाखांची तरतूद असून, ८३३ लाभार्थी निवडले जाणार आहेत. प्रतिलाभार्थ्याला ९ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

त्यानुसार कृषी विभागाने तालुकानिहाय लाभार्थी नियोजन केले आहे. कडबाकुट्टी वाटपाचे नियोजन करताना सर्व तालुक्यांना समान वाटप करण्याऐवजी संगमनेर, अकोले व नगर या तालुक्यांना झुकते माप देण्यात आले. मुळात लाभार्थी निवडताना सोडत पद्धतीने निवडणे गरजेचे असताना येथे मात्र सदस्यांच्या शिफारशीवरून समितीच्या बैठकीत निवडी होत असल्याने कमी कडबाकुट्टी मिळालेल्या सदस्यांनीही त्यावर बोलण्याऐवजी नियोजन बदलण्याचा आग्रह धरला आहे. आठ दिवसांपासून या विषयावर कृषी विभाग आणि जिल्हा सदस्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. 

दरम्यान, तालुकानिहाय लाभार्थी निवडीचे अधिकार कृषी समितीला असून, समितीने निवडीचे नियोजन केले असल्याचे समोर आले आहे. सोमवारी (ता. १७) कृषी समितीची बैठक होणार असून, त्यात पुन्हा विषय घेण्यात येणार आहे. त्या वेळी काही प्रमाणात वाटप नियोजनात बदलाची शक्यता आहे. 

तालुकानिहाय वाटपाचे नियोजन असे ः अकोले ७३, संगमनेर २१८, कोपरगाव ४०, राहाता ४९, राहुरी ४२, श्रीरामपूर ३८, नेवासा ६५, शेवगाव ४०, पाथर्डी ४४, जामखेड १५, कर्जत ३८, श्रीगोंदा ५६, पारनेर ३९, नगर ७६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com