
पोषक हवामान आणि लागवड योग्य जमिनीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे पीक (Tomato Crop) घेतले जाते. सरासरी उत्पादनाच्या तुलनेत महाराष्ट्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. परंतु गेल्या एक-दोन वर्षापासून टोमॅटोचे पीक विविध रोगांना बळी पडत आहे. यावर्षी महाराष्ट्रासह देशभरात टोमॅटोवर टुटा अळीचा (Tuta Absoluta Pesticides) प्रादुर्भाव झाला आहे. या अळीचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने यंदा उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून टोमॅटोवर या किडीचा प्रादुर्भाव आहे. मात्र, यंदा सप्टेंबरमधील लागणीवर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. कीड नियंत्रणात येत नसल्याने टोमॅटो उत्पादक मात्र संकटात सापडला आहे.
हेही वाचा - आशियासाठी भारत ठरतोय गव्हाचे भांडार
महाराष्ट्रात टोमॅटोचे पीक हे ठराविक पट्ट्यात घेतले जाते. सातारा जिल्ह्यातील पाडेगाव, संगमनेर, अकोला तसेच पुणे जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर, आंबेगाव, लातूर अशा प्रमुख भागामध्ये टोमॅटोचे पीक (Tomato) प्रामुख्याने घेतले जाते. टुटाच्या प्रादुर्भावामुळे (Tuta Outbreak) या भागात टुटा नियंत्रणासाठी अंधाधुंद फवारण्या झाल्या आहेत. अशा अंधाधुंद फवारण्यांमुळे किडीमध्ये प्रतिकार क्षमता निर्माण झाली आहे.
यावर्षी झालेला अतिरिक्त पाऊस आणि पोषक वातरवणामुळे किडीचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. आधीच राज्यात टोमॅटोची लागण कमी प्रमाणात झाली आहे. त्यातही किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. अळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होवून मागणी पुरवठ्याचे गणित कोलमडणार आहे. त्यामुळे येत्या काळात टोमॅटोचे दर वाढण्यचा अंदाजही जाणकार व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - येवल्यातील नऊ गावांत अवकाळीचा पिकांना फटका
टुटामुळे सप्टेंबरमध्ये लागण झालेल्या पिकाचेजवळपास ५० टक्क्यांवर नुकसान झाल्याचे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्याचे शेतकरी चैतन्य पाटील सांगतात. पाटील म्हणाले की, या अळीचे वैशिष्ट्य म्हणजे याचा पतंग तीन फुटांपेक्षा जास्तवर उडू शकत नाही. अळीचा पतंग एकाचवेळी २०० अंडी देतो. याचेच रुपांतर नंतर अळीमध्ये होते. त्यामुळे प्रादुर्भावाचा वेगही प्रचंड आहे. सध्या सर्व प्लॉट हे मल्चिंगवर असल्याने फवारणीवेळी पतंग मल्चिंगखाली जावून बसतात. त्यामुळे कितीही फवारण्या घेतल्या तरी प्रादुर्भाव रोखणे कठीण होत आहे, असा अनुभवही पाटील यांनी सांगितला.
पाटील पुढे म्हणाले की, टुटाअळी आणि पतंग दोन्हीही पिकांचे नुकसान करतात. अंडी देण्यासाठी पतंग फळावर डंख करते. त्यामुळे संपूर्ण फळाचे नुकसान होते. या संदर्भात त्यांनी दिल्ली येथील आयसीएआरच्या शास्त्रज्ञांशी संपर्क साधला. मात्र, यावर अजूनतरी प्रभावी असे औषध नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सापळे लावणे आणि एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करणे हाच उपाय आहे. या किडीवर अजून कोणतेही लेबल क्लेम औषध नाही. किडीच्या प्रादुर्भावामुळे पुढील नुकसान आणि खर्च टाळण्यासाठी पाटील यांनी आपला दीड एकराचा संपूर्ण प्लॉट काढून टाकला आहे.
बीड जिल्ह्यातील नाळवंडी येथील शेतकरी जावेद सय्यद यांचीही हीच अवस्था आहे. सय्यद हे गेल्या २० वर्षांपासून टोमॅटोची शेती करतात. यंदा त्यांनी दीड एकरवर टोमॅटोचे पीक घेतले आहे. यापैकी त्यांच्याकडील ५० टक्के प्लॉटचे किडीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचे सय्यद सांगतात.
नियंत्रणासाठी कामगंध सापळे -
टुटा अळी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याचे किटकशास्त्रज्ञ डॉ. अंकुश चोरमुले यांनी अॅग्रोवनशी बोलताना सांगितले. चोरमुले म्हणाले की, केवळ किटकनाशकांचा मारा करून अळीचा प्रादुर्भाव रोखता येणार नाही. यासाठी प्रकाश सापळे, कामगंध सापळे यांचा वापर करणे गरजेचे आहे. याशिवाय जैविक किटकनाशके आणि नंतर रासायनिक किटकनाशकांचा वापर करणे गरजे असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादनाचा थेट परिणाम देशपातळीवर दिसतो. भारतातील एकूण फलोत्पादनाच्या उत्पादनाचा विचार केल्यास ते ३३ कोटी टन आहे. यामध्ये टोमॅटोचा वाटा दोन कोटी टनांचा आहे. गेल्या तीन वर्षातील उत्पादन पाहिल्यास १९० लाख टन उत्पादन होते. जे २०२१-२२ मध्ये २१० लाख टनांवर पोहोचले आहे. याशिवाय तीन वर्षांपूर्वी टोमॅटोखालील क्षेत्र जे पावणे आठ लाख हेक्टर होते. जे ७५ हजार हेक्टरने वाढून साडे आठ लाख हेक्टर झाले आहे. देशातील एकूण टोमॅटो उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा हा २० टक्क्यांपर्यंत आहे. टोमॅटो पिकासंदर्भात शेतमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण यांनी अॅग्रोवनच्या काय म्हणतंय मार्केट या कार्यक्रमात टोमॅटोबाबतची सखोल माहीती दिली आहे. पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा कार्यक्रम पाहू शकता. https://youtu.be/LoTFWVmgw94
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.