पुणतांब्यात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू

पाच वर्षांपूर्वी शेतकरी आंदोलनामुळे देशभरात चर्चेत आलेल्या अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील पुणतांबा गावात पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. १) विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं आहे.
Puntamba Farmer
Puntamba FarmerAgrowon

पाच वर्षांपूर्वी शेतकरी आंदोलनामुळे देशभरात चर्चेत आलेल्या अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील पुणतांबा गावात पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. १) विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या ग्रामसभेत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. सरकारने त्याची दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी सकाळी धरणे आंदोलनाला सुरूवात केली. गहू आणि कांदा निर्यातीवरची बंदी (Wheat and Onion Export Ban) उठवा यासह शेतकऱ्यांच्या विविध सोळा मागण्या आहेत.

“ग्रामसभेतील निर्णयाची प्रत आणि आंदोलनाचा इशारा देणारे पत्र पाठवूनही सरकारने पुणतांब्यातील शेतकऱ्यांशी कसलाही संपर्क साधला नाही. त्यामुळे आम्ही ठरल्याप्रमाणे आंदोलन सुरू केलं आहे. सरकारने दखल घेतली नाही तर आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल,” असे पुणतांब्याचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे म्हणाले.

ग्रामसभेतील ठरावानुसार ग्रामस्थांनी सकाळी धरणे आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनापूर्वी गावात दिंडी काढण्यात आली. त्यानंतर बळीराजाच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक घालण्यात आला. या आंदोलनात बाहेर गावातील शेतकरी सहभागी झाले आहेत. ग्रामस्थांनी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे. धरणे आंदोलनात सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी रोज विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत.

दुधाचे भाव, शेतातील शिल्लक ऊस, कांद्याचे भाव आणि पिकांना हमीभाव यासारख्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मागच्या आठवड्यात पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी ग्रामसभेत १६ ठराव पास केले होते. राज्य सरकारला ग्रामस्थांनी या ठरावाचे निवेदन पाठवले होते. आणि त्याचबरोबर राज्य सरकारने ग्रामस्थांशी संपर्क केला नाही, तर १ जूनपासून ५ जूनपर्यंत सकाळी ९ ते संध्याकाळी ७ आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. मात्र आठवड्याभरात आघाडी सरकारने ग्रामस्थांशी संपर्क केला नाही, त्यामुळे ठरावानुसार ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेतः

शिल्लक उसाला दर हेक्टरी २ लाख अनुदान

उसाला एकरी एक हजार रुपये अनुदान

कांद्याला प्रति क्विंटल पाचशे रुपये अनुदान

कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव

शेतकऱ्यांना दिवसभर वीज

कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी

सर्व पिकांना आधारभूत किंमत मिळावी, त्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करावा

२०१७ साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी

नियमित कर्ज भरणाऱ्यांना अनुदान

उसाप्रमाणे दुधाला हमीभाव

दुधाला कमीत कमी ४० रुपये दर

खासगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी

वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान झाल्यास भरपाई

मागील वेळी शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत

पुणतांब्यातील ग्रामस्थांनी २०१७ मध्ये शेतकरी आंदोलन सुरू केले होते. हळूहळू ते आंदोलन महाराष्ट्रभर पसरले होते. त्यावेळी आंदोलनाची राज्य आणि केंद्र सरकारलाही दखल घ्यावी लागली होती. आता पुन्हा एकदा पुणतांब्यातील ग्रामस्थांनी आंदोलाचा पवित्रा घेतला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com