‘दुष्काळातील पावसाचा थेंबः गोदावरी डांगे'ची कथा

या प्रकल्पाला सुरुवात झाली, तेव्हा कोविड-१९चा प्रसार, लॉकडाऊन वगैरे चालू होतं. आम्ही महाराष्ट्रातील स्त्रीवादी नेत्यांचा शोध सुरू केला, कारण आम्हाला दोघींना मराठी भाषा समजते. जवळपासचा भाग निवडला तर, काम करणे सोपे जाणार होते. आम्हाला प्राधान्याने लिंगभाव, शेती आणि हवामान बदल यांतील संबंधांवर लक्ष केंद्रित करायचं होतं
‘दुष्काळातील पावसाचा थेंबः गोदावरी डांगे'ची कथा

Goethe-Institute या प्रख्यात संस्थेने २०२० मध्ये जगभरातील कॉमिक बुक्स बनवणाऱ्या कलाकारांना प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या स्त्रीवादी नेत्या किंवा चळवळींवर पुस्तक प्रस्ताव सादर करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. आम्हा दोघींना लिंग समानता आणि सामाजिक हक्कांच्या विषयावर काम करण्यात रस असल्यानं आम्ही त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. याआधीही आम्ही अशाच प्रकारच्या प्रकल्पावर एकत्र काम केलं आहे. आम्ही दोघी मुंबईच्या असून यापूर्वी अनेक वर्षं मुंबई शहरात काम केलं आहे. आमच्यापैकी रीतिकाने मराठवाडा विभागातील लिंगभाव आणि कामगार समस्यांविषयी संशोधन केलं आहे, तर मैत्रीने वर्तमानपत्र आणि मासिकांसाठी लिंगभाव व इतर सामाजिक समस्यांवर विविध रेखाचित्रे रेखाटली आहेत. या प्रकल्पाला सुरुवात झाली, तेव्हा कोविड-१९(covid)चा प्रसार, लॉकडाऊन वगैरे चालू होतं. आम्ही महाराष्ट्रातील स्त्रीवादी नेत्यांचा(politcian) शोध सुरू केला, कारण आम्हाला दोघींना मराठी भाषा समजते. जवळपासचा भाग निवडला तर, काम करणे सोपे जाणार होते. आम्हाला प्राधान्याने लिंगभाव, शेती आणि हवामान बदल (Climate change)यांतील संबंधांवर लक्ष केंद्रित करायचं होतं. कारण भारतात शेतीतली बहुतांश कामं महिलाच करतात, या महिला जवळपास ८० टक्के अन्न पिकवतात; तरीही त्यांना शेतकरी म्हणून ओळख मिळत नाही, जमीनही त्यांच्या मालकीची नसते. सुरुवातीच्या संशोधनादरम्यान आम्हाला गोदावरी डांगे आणि ‘स्वयं शिक्षण प्रयोग’ (SSP) या स्वयंसेवी संस्थेच्या कामाबद्दल माहिती मिळाली. गोदावरीताई उस्मानाबाद जिल्ह्यात २० वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कामाद्वारे हजारो महिला आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात बदलून घडवून आणला आहे. तरीही, महाराष्ट्रात आणि भारतीय पातळीवरील प्रमुख वर्तमानपत्रांत किंवा मासिकांत त्यांच्याबद्दल फारसं काही लिहिलं गेलेलं नाही. आम्ही गोदावरीताईंशी संपर्क साधला आणि या प्रकल्पाचा भाग बनण्यास स्वारस्य आहे का, असं विचारलं. त्यांनी होकार दिल्यावर आम्ही Goethe-Institutच्या प्रकल्पासाठी प्रस्ताव पाठवला. त्यांच्याकडे आलेल्या दोनशेहून अधिक प्रस्तावांतून १६ प्रस्तावांची निवड झाली, त्यात आमचाही समावेश होता. ...आणि त्यातून ‘दुष्काळातील पावसाचा थेंब : गोदावरी डांगे’ या पुस्तकाचा जन्म झाला. आमचं कॉमिक बुक गोदावरीताईंच्या जीवन आणि कार्याची कथा सांगतं. गोदावरीताईंचा जन्म १९७७ मध्ये तुळजापुरात झाला. त्या काळात मराठवाडा ७२च्या दुष्काळातून सावरत होता. मराठवाड्यातील जनतेनं जवळपास अर्ध्या शतकात अनुभवलेला तो सर्वांत भीषण दुष्काळ होता. जनावरं मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी पडली होती. अनेक कुटुंबांना पाणी आणि अन्न मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. दलित आणि आदिवासी समाजातील लोकांना तर खूपच हालअपेष्टा भोगाव्या लागल्या. महिलांना पाणी भरण्यासाठी खूप लांबवर पायी जावं लागायचं. अनेक मुलींना शाळा सोडून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करावं लागलं. त्यानंतर बरोबर ४० वर्षांनी म्हणजे २०१२मध्ये मराठवाड्यात आणखी एक गंभीर दुष्काळ पडला. मधल्या काळातही या प्रदेशानं वारंवार तीव्र दुष्काळ अनुभवले. दुष्काळ, कर्ज आणि संकटाच्या या पार्श्वभूमीवर गोदावरीताई लहानाच्या मोठ्या झाल्या. त्या काळात उच्चवर्णीय समुदायातील बहुतेक पुरुष शेतकरी उसासारखी नगदी पिके घेत होते. त्याला खूप पाणी लागायचं. पण अल्पभूधारक आणि वंचित समाजातील शेतकऱ्यांकडे पुरेशी संसाधनं उपलब्ध नव्हती. त्यांच्यावर खूप कर्जही होतं. दुष्काळात महिलांचे श्रमही वाढायचे. कुटुंबाला खाऊ-पिऊ घालणं हे काम महिलांचंच आहे, असं मानलं जात असे. त्यामुळे सगळ्यांसाठी उस्तवार करून त्यांना अनेकदा अर्धपोटीही राहावं लागत होतं. या समस्येवर मात करण्याच्या इराद्यानं गोदावरीताईंनी आपल्या ‘स्वयं शिक्षण प्रयोग’ संस्थेतील सहकाऱ्यांना सोबत घेऊन ‘एक एकर मॉडेल’ तयार केलं. या मॉडेलनुसार महिलांना जमिनीच्या छोट्या तुकड्यांमध्ये पिकं घेण्यास प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्यात आलं. गोदावरीताईंनी महिलांना ३६ विविध प्रकारच्या अन्नधान्य पिकांच्या बियण्यांचं वाटप केलं. त्यांना शेतीसाठी हातभार लावायला सुरुवात केली. कुटुंबात कोणीही उपाशी राहू नये आणि सर्वांना पोषक आहार मिळावा, यावरही लक्ष केंद्रित केलं. भाजीपाला, ठराविक तृणधान्यं आणि कडधान्यं पिकवण्यासाठी कमी पाणी लागतं आणि दुष्काळी परिस्थितीतही वर्षभर कोणतं ना कोणतं पीक घेता येतं. त्यामुळे ही पीकपध्दती त्यांनी निवडली. हा प्रयोग करून पाहण्यासाठी सुरुवातीला फार कमी महिला पुढे आल्या. त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडून, विशेषत: नवऱ्यांकडून बराच विरोध सहन करावा लागला. बहुतेक पुरुषांना वाटत होतं की, हा वेळ आणि संसाधनांचा अपव्यय आहे. मात्र, आज उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांत तब्बल ५० हजाराहून अधिक महिला शेतकरी ‘एक एकर मॉडेल’ वापरत आहेत. २०२०मध्ये कोविड-१९च्या सुरुवातीला लादलेल्या पहिल्या देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान सर्व काही ठप्प झालं होतं. या काळात प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी धडपडत होता. त्या वेळी उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांत महिल्या शेतकऱ्यांसाठी गोदावरीताईंचं ‘एक एकर मॉडेल’ मोठं वरदान ठरलं. हे मॉडेल वापरणाऱ्या महिला शेतकऱ्यांनी स्वतःच्या एक एकर शेतात वेगवेगळी पिकं छोट्या प्रमाणावर घेतली. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह यशस्वीपणे करता आला. आणि शिल्लक शेतमाल स्थानिक बाजारात विकून थोडेफार पैसेही कमावता आले. थोडक्यात, या मॉडेलने त्यांना कोविड-१९च्या त्या वाईट दिवसांतही टिकून राहण्यास मदत केली. गोदावरीताईंची ही कहाणी लोकांपर्यंत कशी पोहोचवायची, त्यासाठी माध्यम काय निवडायचे यावर आम्ही बराच विचार केला. आम्हा दोघींचा कथेच्या सामर्थ्यावर खूप विश्वास आहे. आम्हाला वाटलं की, चित्रांद्वारे ही कथा सांगणं महत्त्वाचं आहे. गुंतागुंतीचे तपशील सोप्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा ‘इलस्ट्रेशन’ (illustration) हा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे. यात भाषेचे अडथळे येत नाहीत. आपलं म्हणणं वाचू शकत नसलेल्या समुदायांपर्यंतही पोहोचवणं शक्य होतं. म्हणून, आम्ही जाणीवपूर्वक ‘दुष्काळातील पावसाचा थेंब : गोदावरी डांगे’ हे कॉमिक बुक तयार केलं. या माध्यमातून गोदावरीताईंच्या यशस्वी प्रयोगाची कथा स्थानिक आणि जागतिक पातळीपर्यंत पोहचवण्याची संधी मिळाली. आमच्या पुस्तकात बरीच चित्रं आहेत आणि आम्ही हेतुपुरस्सर अतिशय कमी मजकूर वापरला आहे. आम्हाला आमच्या शहरी, उच्चवर्णीय पार्श्वभूमीची जाणीव होती. त्यामुळे या प्रकल्पाला न्याय द्यायचा असेल तर ही कथा सांगण्यासाठी गोदावरीताईंना सोबत घेणं, त्यांचा सक्रिय सहभाग मिळवून काम करणं महत्त्वाचं होतं. आम्ही गोदावरीताईंचे शब्द वापरून मजकूर लिहिला. मजकुराचा साधेपणा, छोटी छोटी वाक्यं आणि हातानं काढलेली चित्रं एकमेकांना अगदी पूरक झाली. चित्रांमध्ये, गोदावरीताईंनी केस कसे बांधले होते, त्यांच्या आईने स्वयंपाकघरात भांडी कशी लावली होती आणि घराच्या भिंतींचा रंग कोणता होता, असे सर्व बारीकसारीक तपशील समाविष्ट केले. आमचं लेखन आणि चित्रं यांवर वेळोवेळी गोदावरीताईंचा अभिप्राय मिळावा, यासाठी आम्ही एक व्हॉटसअ‍ॅप ग्रुप बनवला. त्यांच्या बालपणीची छायाचित्रंही त्यांनी या ग्रुपवर शेअर केली. गोदावरीताईंच्या मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य आणि इतर महिला शेतकऱ्यांनी आम्हाला खूप मदत केली. हे कॉमिक बुक प्रसिद्ध झाल्यावर आम्ही गोदावरीताईंना पाठवलं. त्यांना आणि त्यांच्या आईला ते आवडलं. तुम्हालाही ते नक्कीच आवडेल, अशी खात्री आहे. “आपल्या देशाचीही फारशी माहिती नसलेल्या ज्या काही व्यक्ती असतील, त्यातलीच मी एक. पण ‘स्वयं शिक्षण प्रयोग’ या संस्थेनं दिलेल्या संधीमुळे आणि आमच्या ‘एक एकर मॉडेल’मुळे मी आज ‘ग्लोबल नेटवर्क’शी जोडले गेले आहे. आजवर मला परदेशांत अनेक कार्यक्रमांमध्ये बोलण्याची आणि स्वत:चा अनुभव मांडण्याची संधी मिळाली आहे. उदा. क्लायमेंट वीक, UN वुमन कॉन्फरन्स, आशिया मिनिस्ट्री कॉन्फरन्स इ. अर्थात हे माझ्या संस्थेतल्या आणि तिच्याशी जोडल्या गेलेल्या महिलांमुळेच शक्य झालं आहे. शिक्षण कमी असल्यामुळे मी इंग्रजी बोलू शकत नाही, पण या पुस्तकाच्या माध्यमातून आमच्या प्रयोगाची माहिती महाराष्ट्र आणि जगभराच्या वाचकांपर्यंत पोहोचली आहे. पुस्तक वाचणं आणि पुस्तकातून बोलणं हे आनंददायी क्षण असतात. रीतिका आणि मैत्री या दोघींनी प्रत्यक्ष येऊन, भेटून, गावा-गावांत जाऊन माझं कुटुंब, मैत्रिणी आणि आमच्या महिला कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. आमच्या मॉडेलची स्वत: पाहणी केली. त्याचबरोबर सखोल अभ्यास केला. त्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. या पुस्तकामुळे आम्हाला आनंद झाला आणि खूप छान वाटत आहे!” - गोदावरी डांगे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com