अन् शेतकऱ्याच्या हातात उरतं फक्त पाचट

उसाला तुरा लागणं याला शेतकरी उसाचं वय झालं असं म्हणतात. यालाच काही भागात म्हाताऱ्या लागणं असंही म्हणतात. याची वेगवेगळी कारण आहेत. उसाला पाणी जास्त झालं किंवा उसाचं वय झालं की, उसाला तुरा लागतो.
अन् शेतकऱ्याच्या हातात उरतं फक्त पाचट
Sugarcane

उसाला तुरा लागणं याला शेतकरी उसाचं वय झालं असं म्हणतात. यालाच काही भागात म्हाताऱ्या लागणं असंही म्हणतात. याची वेगवेगळी कारण आहेत. उसाला पाणी जास्त झालं किंवा उसाचं वय झालं की, उसाला तुरा लागतो. यातही काही उसाच्या वाणाला तर हमखास तुरा लागतोच लागतो, असं शेतकरी (Farmer) सांगतात. उसाला तुरा (sugarcane Arrowing) लागला की, ऊस आतून पोकळ व्हायला सुरूवात होते. त्यामुळे वजनातही घट होते. याचा फटका उत्पादनावर होतो. मग एफआरपी (FRP) नुसती कागदावर राहते.

व्हिडीओ पाहा -  

तुरा लागलेल्या उसाला कारखाना तोड देत नाही आणि शेतकऱ्यांना स्वतः ऊस तोडून कारखान्याला घालणं परवडत नाही. लागवडीच्या वेळी नोंद दिलेली असल्यानं कारखाना वेळेत ऊस घेऊन जाईल, अशी आशा शेतकऱ्याला असते. मात्र कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांनी नोंदीत मागे पुढे करून तोडणी लांबणीवर टाकण्यासारखे प्रकार उसाचं क्षेत्र वाढलं की होतातचं. यात नुकसान मात्र होतं ते शेतकऱ्याचं. कारखान्याचा पट्टा आज पडतोय का उद्या पडतोय म्हणून शेतकरी घाई करतो.   

शेतकरी कारखान्याचा सभासद असला, तरी उसाला वेळेवर तोड मिळेल याची खात्री नाही. मग अशावेळी कारखानदारांच्या (Sugar Mill) हातापाया पडण्याशिवाय पर्यायच उरत नाही. कशीबशी तोड मिळालीच तरी उसतोड मजूरांचा वेगळाच रुबाब. तुरा लागलेल्या उसाला वाडं नाही म्हणून फडात घुसण्याच्या आधीच मजुरांकडून पैशाची मागणी होते.

"ऊसतोड मजुरांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एक रुपयाही देऊ नये",  असं गाळप हंगामाच्या सुरुवातीला साखर आयुक्तांनी म्हटलं होतं. पण वास्तव मात्र वेगळंचंय. ऊसतोड मजूर पैसे घेतल्याशिवाय फडात पाय ठेवायला तयार होत नाही. ऊस तोडणीसाठी आता मोठं मोठाले हार्वेस्टर आलेत. पण मोठं क्षेत्र असलेल्या फडाकडेच हे हार्वेस्टरवाले (Sugarcane Harvester) जातात. लहान शेतकऱ्यांनी तडजोड केली, तरच मशीन रानात येतं. या तडजोडीत मग बाटली, मटणाची पार्टी नाहीतर पैसे देऊन मशीन चालकाची मर्जी राखावी लागते.    अवेळी होणारा पाऊस, वातावरणातील बदल आणि बाजारातील सरकारी हस्तक्षेपाला कंटाळून थोडंफार पाणी असेल, तर शेतकऱ्यांचा इतर पिकांऐवजी उसाचं पीक घेण्याकडे कल असतो. उसाचा एकगठ्ठा पैसा हातात येईल, असं शेतकऱ्यांना वाटतं खरं. पण साखर कारखानदारांच्या दावणीला बांधून घेतल्याशिवाय साधी उसावर तोडसुद्धा येत नाही. हे वास्तवयं. अशावेळी काहीजण गुऱ्हाळाचा पर्याय सुचवतात. 

मराठवाड्यात गूळ (Jaggery) आणि गूळ पावडर (Jaggery Powder) तयार करणाऱ्या गुऱ्हाळांची संख्या वाढलीय. पण गुळाला बाजारात मोठी मागणी नाही. परिणामी गुऱ्हाळवाले शेतकऱ्यांना परवडेल असा भाव देत नाहीत. आज महाराष्ट्र ऊस उत्पादनात उत्तरप्रदेशला मागे टाकेल, अशी स्थिती आहे. साखर कारखानदार मात्र रिकव्हरी मिळाली नसल्याचं कारण पुढं करत शेतकऱ्यांना बिलात दणका देतात. पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती जराशी वेगळी असेल. पण मराठवाड्यातला ऊस उत्पादक शेतकरी मात्र उस जसा चरख्यात घालून पिळून काढतात तसा कारखानदारांनी पुरता पिळून काढलाय.  

एकूणच काय तर उसाची शेती म्हणजे नुसता भोंगळा कारभारंय. उसाचं उत्पादन घेणारा शेतकरी म्हणायला नुसताच बागायतदार असतो. पण ज्यावेळी त्याच्या फडातला ऊस तुटून जातो. तेव्हा त्याच्या हातात उसाचं वाडंच काय पण साधं टिपरू पण राहत नाही. उरतं ते फक्त पाचटं.

धनंजय सानप यांच्या फेसबुक वॉलवरून...

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.