भारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात

इतर कुठल्याच देशातील गव्हाचा नवा माल या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यापर्यंत बाजारात दाखल होणार नाही, तोवर खरेदीदारांसमोर भारताचा पर्याय शिल्लक असणार आहे, त्यामुळे मार्चपर्यंत भारताच्या गहू निर्यातीचा वेग चांगला राहण्याची शक्यता आहे.
भारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात
wheat crop

दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील वाढत्या मागणीच्या अनुषंगाने या आर्थिक वर्षात भारताची गहू निर्यात ६.५ दशलक्ष ते ७ दशलक्ष टन असा विक्रमी टप्पा गाठेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.   

भारताने डिसेंबर अखेरीस ४.५ मेट्रिक टन गहू निर्यात केलेला आहे. प्रत्येक महिन्यात ५ ते ६ लाख टन गहू निर्यातीचा अंदाज असून त्यामुळे अतिरिक्त अशा १.५ ते २ मेट्रिक टन निर्यातीमुळे एकूण निर्यातीचा आकडा ७ मेट्रिक टनांवर पोहचण्याची शक्यता ओलम ॲग्रो इंडिया लिमिटेडच्या राईस अँड ग्रेन्सचे उपाध्यक्ष नितीन गुप्ता यांनी व्यक्त केली आहे.     

अपेडाच्या अंदाजानुसार (Agriculture and Processed Food Products Export Development Authority) गहू निर्यातदारांनी यंदाच्या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान ८,५४७.५८ कोटी रुपयांचा ४.११ मेट्रिक टन गहू निर्यात केलेला आहे. त्यातुलनेत गेल्या आर्थिक वर्षात गहू निर्यातदारांनी ४०३३.८१ कोटी रुपयांचा २.०८ मेट्रिक टन इतकाच गहू निर्यात केला होता.   

२०१२-२०१३ साली भारताने ६.५१ मेट्रिक टन गहू निर्यात करून १०,५२९ कोटी रुपयांची कमाई केली होती. २०१३-२०१४ मध्ये भारताने ५.५७ मेट्रिक टन गहू निर्यातीमधून ९२७७.६५ कोटी रुपये मिळवले होते.

प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत भारतीय गव्हाच्या मागणीत वाढ झाल्यामुळे या आर्थिक वर्षात भारताची गहू निर्यात ६.५ मेट्रिक टनावर जाईल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच वर्तवलेला आहे.  

भारत आपला गहू बांगलादेश, फिलिपिन्स, श्रीलंकेला निर्यात करत आहे. सध्या भारतीय गव्हाची किंमत ३०० ते ३०५ डॉलर प्रति टन असल्याचे ओलम इंडियाच्या गुप्ता यांनी म्हटले आहे. डिसेंबर महिन्यात गव्हाने प्रति टन ३२० डॉलरचा आकडा गाठला होता. मात्र धान्याची गुणवत्ता खालावल्यामुळे ऑस्ट्रेलियाने त्यापेक्षा कमी किमतीत गहू निर्यात करायला सुरुवात केली.    

आंतरराष्ट्रीय धान्य परिषदेच्या (International Grains Council) मतानुसार, अर्जेंटिनाने आपल्या गव्हाचे दर ३०४ डॉलर प्रति टन घोषित केले आहेत, तर फ्रान्सकडून अव्वल दर्जाच्या गव्हासाठी प्रति टन ३२४ डॉलरचा दर घोषित केला आहे. अमेरिकेने सॉफ्ट रेड विंटर गव्हाला प्रति टन ३४७ डॉलर, रेड विंटर गव्हाला प्रति टन ३९७ डॉलरचा दर घोषित केला आहे. त्यामुळे भारताच्या गव्हाला ऑस्ट्रेलियाची स्पर्धा राहिली नाही, या दरम्यान खरेदीदारांसमोर भारतीय गव्हाचा पर्याय शिल्लक राहिला असल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे.  

व्हिडीओ पहा

ऑस्ट्रेलिया जलवाहतुकीच्या मुख्य महामार्गावर नसल्याचाही फटका त्या देशातील जहाजांना बसत असल्याचे दिल्लीस्थित बाजार विश्लेषक एस. चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे. आफ्रिका, दक्षिण पूर्व आशियायी देशांकडे गहू घेऊन जाणारी भारताची जहाजे परतताना कोळसा, खनिजे अथवा अन्य पदार्थ घेऊन येत असतात, हा लाभ ऑस्ट्रेलियाला मिळत नाही. त्यामुळे भारताच्या गहू निर्यातीस चालना मिळताना दिसते आहे. त्यासाठी रशिया-युक्रेन संघर्षाची पार्श्वभूमी कारणीभूत आहे. मात्र यादरम्यान या संघर्षामुळे जलवाहतुकीच्या खर्चात वाढ होण्याची शक्यताही चंद्रशेखरन यांनी व्यक्त केली आहे.  

इतर कुठल्याच देशातील गव्हाचा नवा माल या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यापर्यंत बाजारात दाखल होणार नाही, तोवर खरेदीदारांसमोर भारताचा पर्याय शिल्लक असणार आहे, त्यामुळे मार्चपर्यंत भारताच्या गहू निर्यातीचा वेग चांगला राहण्याची शक्यता आहे. 

जुलै २०२१ ते जुन २०२२ दरम्यान भारतात १०९.५ मेट्रिक टन एवढे विक्रमी गहू उत्पादन होणार असल्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) वर्तवला आहे. भारताच्या कृषी विभागाच्या चौथ्या अंदाजानुसार गेल्या हंगामातील गव्हाचे उत्पादन १०९.५२ मेट्रिक टन होते. हिवाळ्यातील अनुकूल वातावरणामुळे यंदाही भारतात दर्जेदार गव्हाचे उत्पादन होईल. गहू उत्पादनाचे प्रमाण १०५ ते १०८ मेट्रिक टन असेल, असा अंदाज गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.  

गेल्यावर्षीच्या गहू लागवड क्षेत्राच्या (३४५. १४ लाख हेक्टर) तुलनेत यंदा गहू लागवड क्षेत्रात किंचित घट (३४०.८२ लाख हेक्टर) झाली असूनही बम्पर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विक्रमी निर्यातीमुळे भारताकडे केवळ २३ दशलक्ष टन गव्हाचा साठा शिल्लक राहील, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) व्यक्त केला आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (Food Corporation of India) आकडेवारीनुसार १ जानेवारी अखेरीस भारताकडील गव्हाचा साठा ३३.०१ दशलक्ष टनांवर आला आहे, गेल्यावर्षी याच कालावधीत FCI कडे ३४.२९ मेट्रिक टन गव्हाचा साठा उपलब्ध होता.      

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.