Book Review
Book ReviewAgrowon

लुत्फ़ जो मिला इंतज़ार में

प्रतीक्षेच्या समईतल्या वाती मंदावतात तेव्हापावेतो प्रेमिकाशी मिलनापेक्षाही वाट पाहण्यातच आनंद वाटायला लागलेला असतो. एखादाच फ्लोरेंतिनो अरिसा असतो ज्याला म्हातारपणी का असेना आपलं प्रेम गवसतं. उरलेल्यांच्या वाट्याला येतो तो ठाम नकाराचा पूर्णविराम किंवा अंतहीन इंतजार!

मला भावलेलं पुस्तक
--------
हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक
खुदा करें के कयामत हो और तू आयें
- साहिर लुधियानवी, प्रख्यात शायर

असं कुणी कुणाची वाट पाहतं का? तेही इतका दीर्घकाळ? जगबुडीपर्यंत? सारंच कसं अजब, न पटणारं! पण असं कुणी तरी असतं, कुठं तरी... आपल्या मंगेश पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणं, ‘नदीच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे...’ अशा साच्यातलं! साऱ्याच प्रेम कहाण्या सुखांत नसतात, बहुतांश कहाण्यांचा अंत शोकात्मच. कारणं काहीही असोत, ताटातूट ठरलेली. पण जगरहाटी काहीही असली तरी प्रेम करायचं कोणी थांबत का? दुनियेच्या आरंभापासून हा सिलसिला सुरू आहे आणि अंतापर्यंत तो सुरूच राहील. साहिर लुधियानवी म्हणतात तसं, ‘कल्पांतापर्यंत (प्रलय) तिची वाट पाहण्याची त्याची तयारी आहे. परमेश्‍वर करो, तो विश्‍वाचा अखेरचा दिवस उजाडावा आणि तू यावंस!’ ही कवी कल्पना असली तरी प्रियेसाठी अवघ्या जगाला ‘कयामत’च्या जोखडात अडकवण्याची तयारी दाखवणाऱ्यांची कमी नाही दुनियेत!

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधील एक कलाकार केकी मूस यांची दंतकथेसारखी वाटणारी प्रेमकथा कदाचित तुम्ही ऐकली असेल. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा हा कलाकार आता हयात नाही. तो चित्रकार होता, छायाचित्रकार होता, शिल्पकार होता, ओरिगामी कलाकार होता. मूर्ख लोकांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटेपण परवडलं, असं त्याचं रोकडं मत. सुमारांची संगत टाळून त्यानं एकांतवास पत्करला. जगाला फाट्यावर मारून कलासाधनेत रमला. त्यासाठी चाळीगाव रेल्वे स्थानकाजवळील वडिलार्जित दगडी बंगल्यात त्यानं स्वतःला अक्षरशः कोंडून घेतलं आणि झपाटल्यासारखी कलानिर्मिती केली. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंसह देश-विदेशांतील अनेक मातब्बर त्याच्या कलेचे दिवाने होते. तरुणपणी मुंबईतील एका तरुणीवर त्याचं प्रेम होतं, पण त्यांच्या लग्नाला तिच्या वडिलांचा विरोध होता. का, तर हा भिकारडा कलाकार तुला कसा सुखात ठेवेल, हा व्यवहार्य प्रश्‍न. त्याचं उत्तर ना तिच्याकडं होतं, ना त्याच्याकडं. तरीही तिनं केकी मूसला सांगितलं, ‘तू निघ. मी कलकत्ता मेलनं चाळीसगावला येते.’ तो चाळीसगावला परतला. कलकत्ता मेल दररोज मुंबईहून येत होती, पण ती काही आली नाही. तो मात्र कलासाधना करता करता दररोज कळत नकळत कलकत्ता मेलची वाट पाहायचा, तब्बल ५० वर्षं हा क्रम अविरत सुरू राहिला. त्याची प्रतीक्षा संपली नाही. ३१ डिसेंबर १९८९ रोजी तिच्या भेटीविनाच त्यानं अखेरचा श्‍वास घेतला. चटका लावणारी ही कहाणी आपल्या भवतालातली तर आहे. एकमेकांसाठी जीव देणाऱ्या लैला-मजनूपेक्षा आयुष्यभर जीव झुरणीला लावणारं हे संयत समर्पण खचितच महान आहे, नाही का!

‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’ ही विश्‍वविख्यात कादंबरी. दक्षिण अमेरिकेतील नोबेल पुरस्कार विजेते लेखक गॅब्रिअल गार्सिया मार्केझ यांची ही कलाकृती. तिचं कथासूत्रही साधारण असंच, केकी मूसच्या जातकुळीतलं, पण सुखांत. फ्लोरेंतिनो अरिसा आणि फर्मिना डाझा यांची ही प्रेमकहाणी. दक्षिण अमेरिकेतील व्हाइसरॉय या शहरातला डॉ. जुव्हेनल अर्बिनो हा एक प्रथितयश डॉक्टर. कादंबरीच्या सुरुवातीला त्याचा जवळचा मित्र जेरेमी मरतो. डॉ. अर्बिनो मृतदेहाची तपासणी करायला जातो. जेरेमीनं वयाच्या साठाव्या वर्षी ‘गोल्ड सायनाइड व्हेपर्स’ वापरून आत्महत्या केलेली असते. त्याला म्हातारं व्हायचं नसतं. डॉक्टर अर्बिनो घरी परततो तेव्हा त्याचा लाडका पोपट पिंजऱ्यातून उडून आंब्याच्या झाडावर जाऊन बसलेला असतो. पोपट पकडायला गेलेला डॉक्टर शिडीवरून घसरून पडल्यानं मरतो. नंतर या कादंबरीचा नायक फ्लोरेंतिनो अरिझा प्रवेश करतो. फर्मिना ही डॉ. अर्बिनोची बायको. त्याआधी तरुणपणाच्या उंबरठ्यावर असताना फर्मिनाचं फ्लोरेंतिनोवर आत्यंतिक प्रेम असतं. फर्मिनाच्या वडिलांना ते पसंत नसल्यानं ते फर्मिनाला एका नातेवाइकांकडं पाठवतात. परत आल्यावर १७ वर्षांची झालेली फर्मिना, फ्लोरेंतिनोनं तिला विसरावं असं सांगते आणि डॉ. अर्बिनोसोबत लग्न करते. फर्मिना आणि अर्बिनो हे एक आनंदी जोडपं असल्याचं भासवत असलं तरी प्रत्यक्षात तसं नसतं. डॉ. अर्बिनो बाहेर दुसऱ्या एका महिलेत गुंतलेला असतो.

अर्बिनो प्रख्यात डॉक्टर असल्याचं आणि त्याला समाजात मोठं स्थान असल्याचं लक्षात आल्यावर फर्मिनाला प्राप्त करण्यासाठी फ्लोरेंतिनोही यशस्वी व्हायचं ठरवतो आणि ते स्वप्न पूर्णही करतो. काहीही करून फर्मिनाचं प्रेम मिळवायचंच हे त्याचं उद्दिष्ट. त्यासाठी कितीही काळ वाट पाहायची त्याची तयारी असते. सुरुवातीला दुसऱ्या कोणत्याच स्त्रीसोबत संबंध ठेवायचे नाहीत असं ठरवणारा फ्लोरेंतिनो एका जहाजाच्या सफरीवर रोझाल्बा नावाच्या महिलेच्या संपर्कात येतो. नंतर तो अनेक स्त्रियांशी संबंध ठेवतो. डॉ. अर्बिनोच्या मृत्यूनंतर फ्लोरेंतिनो परत एकदा फर्मिनाचं मन जिंकायचा प्रयत्न करतो. ताटातूट झाल्यानंतर ५१ वर्षं ९ महिने आणि ४ दिवस तो तिच्या विरहाचं दुःख उराशी बाळगून असतो. सुरुवातीला त्याला नकार देणारी फर्मिना अखेरीस होकार देते. एका जहाजावर ते दोघं अखेरीस एकमेकांच्या मिठीत विसावतात. मात्र त्यांना कोणीतरी बघेल या भीतीनं फर्मिना भांबावते. तेव्हा फ्लोरेंतिनो जहाजावर कॉलरा असल्याचं निदर्शक पिवळं निशाण फडकवायला सांगतो. ते जहाज त्याच्याच कंपनीचं असतं. आता ते जहाज कॉलऱ्याच्या साथीच्या भीतीनं कोणीच थांबवणार नसतं आणि जहाजातून स्वैर संचार करायला हे वयोवृद्ध प्रेमी मोकळे होतात. तेव्हा फ्लोरेंतिनोचं वय असतं अवघं ७६ आणि फर्मिनाचं वय असतं ७२. अशी ‘अजब प्रेमाची गजब कहाणी’ सांगणारी ही कादंबरी.

ऐंशी वर्षांचं एक अमेरिकन जोडपं दरवर्षी अकापुलाकोला भेटायचं. त्यांचं दोघांचंही प्रत्यक्षात दुसऱ्या जोडीदारांशी लग्न झालेलं होतं. एक दिवस ते बोटीत असताना बोटमननंच त्यांची हत्या केली, तेव्हा त्यांच्या गोपनीय प्रेमसंबंधाची कहाणी जगासमोर आली. या कथेचं मार्केझला खूपच आकर्षण वाटलं आणि त्याला ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’चं कथासूत्र सापडलं, असं सांगितलं जातं. ही कादंबरी १९८५ मध्ये स्पॅनिश भाषेत प्रथम प्रकाशित झाली. पुढं १९८८ मध्ये ती इंग्रजीत अवतरली. सन २००७ मध्ये तिच्यावर चित्रपटही आला. ‘लायन्सगेट’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो उपलब्ध आहे. जगभरातील अनेक भाषांत ती अनुवादित झाली. मराठीत मंजुल प्रकाशननं प्रकाशित केलेल्या आणि आगळा वाचनानुभव देणाऱ्या या कादंबरीचा सरस अनुवाद आघाडीचे तरुण लेखक प्रणव सखदेव यांनी केला आहे. खरं तर हे कठीण काम. दक्षिण अमेरिकेतील संस्कृती, भाषा, सामाजिक वर्तन व्यवहार हे सारंच वेगळं. प्रणव सखदेव यांच्या प्रत्ययकारी अनुवादामुळं मूळ कादंबरीतला आशय आपल्यापर्यंत ठाशीवपणे पोहोचतो.

इथं कथासूत्र थोडक्यात सांगितलं असलं, तरी या कादंबरीचा पट विशाल आहे. दक्षिण अमेरिकी समाजजीवन, तिथल्या समजुती - गैरसमजुती, श्रद्धा-अंधश्रद्धा, कॉलऱ्याच्या साथीनं उडालेली धूळधाण, रात्री रंगणाऱ्या मेजवान्या, शहरांतली वेगवेगळी प्रेमप्रकरणं याचं नेटकं वर्णन लेखक करतो. भाषावैभव तर अफलातून. जगण्याविषयी कसलीही भिडभाड न ठेवता मांडलेलं लख्ख तत्त्वज्ञान चकित करणारं. वैश्‍विक वाङ्‍मय थोर का असतं हे समजून घ्यायचं असेल, तर ३७० पानांत ऐसपैस पसरलेलं हे पुस्तक वाचायलाच हवं. वानगीदाखल, फ्लोरेंतिनो आणि फर्मिना शेवटी बोटीतून प्रवासाला निघतात त्या वेळीचं वर्णन करणारा हा उतारा...

बोट दृश्य प्रवाहांमधून, दलदलीतून जिथे कोळ्यांच्या बोटींचे दिवे शांतपणे हिंदकळत होते तिथून पुढे गेली आणि शेवटी तिने माग्दालेना नदीच्या विशाल पात्रात मुक्त श्‍वास घेतला. मग बँड लोकप्रिय धून वाजवू लागला, आनंदी प्रवाशांची गर्दी जमली आणि त्या गर्दीत नाच सुरू झाला. फर्मिना डाझाने तिच्या केबिनमध्ये थांबून राहणं पसंत केलं. त्या संपूर्ण संध्याकाळभर ती एकही शब्द बोलली नव्हती आणि फ्लोरेंतिनो अरिसाने तिला तिच्या विचारांत मग्न राहू दिलं. ती दमली नव्हती, तिला जरा थंडी वाजत होती आणि तिने त्या दोघांनी थोडा वेळ तिच्या खासगी डेकवर नदी पाहत बसावं असं सूचित केलं. फ्लोरेंतिनो अरिसाने चाकांच्या बांबूच्या दोन खुर्च्या आणल्या, दिवे बंद केले, तिच्या खांद्यावरून लोकरी शाल पांघरली आणि तिच्याशेजारी बसून राहिला. ती काही बोलत नव्हती. क्षितिजावरचे शहरी दिवे हरवून गेले. पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये अंधाऱ्या डेकवरून शांत, सहज वाहणारी नदी दिसत होती आणि दोन्ही किनाऱ्यांवरची कुरणं अंधारात चमकत होती.

वेळोवेळी अधूनमधून मोठी शेकोटी पेटवलेलेली दिसायची, त्याच्या शेजारी झोपडी असायची. हा संकेत होता. तो असा, की बोटीसाठी लागणारं लाकूड इथे मिळेल. तरुण असताना केलेल्या प्रवासाच्या धुगधुगत्या आठवणी अजूनही फ्लोरेंतिनो अरिसाला आठवत होत्या आणि चमकणाऱ्या विजांचं प्रतिबिंब नदीत पाहून त्या पुन्हा जिवंत झाल्या, जणू काही ते सगळं कालपरवा घडलेलं असावं. त्यातल्या काही आठवणी त्याने फर्मिना डाझाला सांगितल्या, त्यामुळे कदाचित ती थोडी हालचाल करेल असं त्याला वाटलं होतं; परंतु ती धूम्रपान करत वेगळ्याच कुठल्यातरी जगात गेली होती. फ्लोरेंतिनो अरिसाने त्याच्या आठवणी सांगणं थांबवलं आणि तिला तिचं तिचं राहू दिलं. मध्यरात्रीनंतर संगीत संपून गेलं, प्रवाशांचे आवाज विरून गेले आणि झोपाळू कुजबुज सुरू झाली. डेकच्या अंधारात दोन एकटी हृदयं बोटीच्या श्‍वासोच्छ्वासाबरोबर त्या कालौघात धडधडत होती.

कादंबरीचे लेखक गॅब्रिअल गार्सिया मार्केझ मूळचे दक्षिण अमेरिकेतील कोलंबियाचे. ६ मार्च १९२८ रोजी जन्मलेले मार्केझ उत्कृष्ट लॅटिन-अमेरिकन साहित्यिक म्हणून ओळखले जातात. लहानपणीच मार्केझच्या पालकांनी त्याला त्यांच्या आजी-आजोबांच्या स्वाधीन केले, ज्यांनी त्याला आठ वर्षांचा होईपर्यंत वाढवलं. तो अरकाटाका, कोलंबिया येथे लहानाचा मोठा झाला. या शहराचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत केळीच्या बागा हा होता. त्याचे आजोबा निवृत्त कर्नल होते. त्यांनी अनेकदा मार्केझला युद्धभूमीवरच्या शौर्यकथा सांगितल्या.

त्याची आजी देखील एक चांगली कथाकथनककार होती आणि तिनं मार्केझला लोककथा, दंतकथा आणि भुतांच्या कथा सांगितल्या. बालपणीचं हे संचित त्याच्या लेखक म्हणून झालेल्या जडण-घडणीत उपयुक्त ठरलं. मार्केझ यांच्या जीवनातील बऱ्याच व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे आरोपण या कादंबरीतील पात्रांवर करण्यात आलं आहे. विशेषतः मार्केझच्या आई-वडिलांचा पूर्वेतिहास ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’ची पात्ररचना करताना मार्केझच्या कामी आला. मार्केझचे स्वतःचं जीवन देखील कॉलराच्या काळातील प्रेमाच्या घटना आणि पात्रांशी समांतर आहे. फर्मिना डाझाप्रमाणेच, मार्केझच्या प्रेयसीनं लग्नासाठी हात मागण्यासाठी त्याला प्राथमिक शाळेतून पदवीधर होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितलं होतं. तिच्याशी लग्न करण्यासाठी मार्केझला चौदा वर्षं वाट पाहावी लागली. असं वास्तव आणि अद्‍भूत एका कल्पित कथेत गुंफून सादर करण्याच्या लेखन प्रकाराला ‘मॅजिकल रिॲलिझम’ म्हटलं जातं आणि मार्केझना या प्रकारातलं वस्ताद मानलं जातं. १९६७ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ या कादंबरीसाठीही मार्केझ प्रसिद्ध आहेत. जगातील मोजक्या अभिजात साहित्यात या अव्वल कलाकृतीची गणना होते.

काही लोक कमालीचे हट्टी असतात. ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’चा नायक फ्लोरेंतिनो अरिसा तर हट्टीपणाचा अर्कच! फर्मिनाच्या प्रेमानं पछाडलेला फ्लोरेंतिनो अखेर तिला प्राप्त करतोच. एखादी गोष्ट नाही मिळाली तर काही जण हट्टानं पेटून उठतात. काही करून ती त्यांना हवी असते. पण सहजतेनं मिळालेल्या उत्तम गोष्टींचं मोल मात्र माणसाला नसतं. प्रख्यात शायर निदा फाजली यांची जगजित सिंग आणि चित्रा सिंग यांच्या गायकीनं अमर झालेली ही सुंदर गझल जरूर ऐकली पाहिजे...

दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है।
मिल जाये तो मिट्टी है खो जाये तो सोना है।

वाट पाहणं, प्रतीक्षा करणं हे संयमाचंच काम. हलक्या लोकांचा हा घास नाही. असा संयम किती काळ टिकतो किंवा टिकावा याचं उत्तर व्यक्तिनिहाय वेगवेगळं असू शकतं. काही वेळा ही प्रतीक्षा अंतापर्यंत चालते. फना निजामी कानपुरी यांची जगजितसिंग आणि चित्रा सिंग यांनीच गायिलेली आणखी एक छान गझल...

दिन गुज़र गया ऐतबार में
रात कट गई इंतज़ार में।
वो मज़ा कहाँ वस्ल-ए-यार में
लुत्फ़ जो मिला इंतज़ार में।

प्रतीक्षेच्या समईतल्या वाती मंदावतात तेव्हापावेतो प्रेमिकाशी मिलनापेक्षाही (वस्ल-ए-यार) वाट पाहण्यातच (इंतजार) आनंद (लुत्फ़) वाटायला लागलेला असतो. एखादाच फ्लोरेंतिनो अरिसा असतो ज्याला म्हातारपणी का असेना आपलं प्रेम गवसतं. उरलेल्यांच्या वाट्याला येतो तो ठाम नकाराचा पूर्णविराम किंवा अंतहीन इंतजार! ‘तू नहीं तो और सही...’च्या या जमान्यात ‘कौन करेगा इतना इंतजार?’
--------
(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com