Marigold Rate : शेअर बाजारापेक्षा वेगाने वाढले झेंडूचे भाव

शेअर बाजारापेक्षा प्रचंड वेगाने झेंडूचे भाव वाढले. सकाळी दहा वाजता १२० रुपये किलो असणारा झेंडू दुपारी तीन वाजता ४०० रुपये किलोवर पोचला.
Marigold Rate
Marigold RateAgrowon

राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : शेअर बाजारापेक्षा (Share Market) प्रचंड वेगाने झेंडूचे भाव (marigold Rate) वाढले. सकाळी दहा वाजता १२० रुपये किलो असणारा झेंडू दुपारी तीन वाजता ४०० रुपये किलोवर पोचला. पोहोचला नाही तर व्यापाऱ्यांनी पोहोचविला. ग्राहकांनी तर डोक्यावर हात मारून घेतलाच. पण झेंडूचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांनी मात्र अक्षरशः अगतिकपणे हा सौदा पाहिला. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील महत्त्वाच्या बाजारपेठेत सोमवारी (ता.२४) असणारे हे दृश्‍य ग्राहकांना घाम फोडून गेले, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवे आणून गेले.

अगदी ठरवून घाला घातल्याप्रमाणे शुक्रवारी (ता.२१) ढगफुटीसदृश पाऊस शिरोळ तालुक्यात झाला. दोन तासांत १०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस तालुक्यात पडला. एवढ्या पावसाची सवय नसणारी शिवारे हा हा म्हणता पाण्याखाली गेली. अगदी हातात तोंडाशी आलेल्या झेंडू प्लॉटमध्ये बघता बघता पाणी शिरले.

तरारून आलेले झेंडू आणि खाली फुटभर पाणी असे अस्वस्थ करणारे चित्र प्रत्येक ठिकाणी होते. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. अगोदरच झेंडूची चणचण असताना या पाण्याने शेतकऱ्यांना झेंडूच्या प्लॉटमध्येही जाऊ दिले नाही. परिणामी, दिवाळीच्या पूर्वसंध्येपासून अगदी दहा ते पंधरा टक्केच झेंडू बाजारात आला. दरवर्षी जागोजागी असणारे झेंडूचे ढीग यंदा गायब झाल्यासारखी स्थिती होती.

जयसिंगपूरमध्ये सकाळी दहा वाजता साधारणतः किलोस १०० ते १२० रुपयापर्यंताचा भाव झेंडूला होता. दरवर्षीप्रमाणे दुपारनंतर झेंडूचे दर काहीसे कमी होतील, या अपेक्षेत ग्राहक होते. पण नेमका उलटाच परिणाम झाला. शेतकऱ्याकडून आवक त्या दिवशी झालीच नाही. जयसिंगपूर सारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत केवळ दोन ते तीन ठिकाणी झेंडूची उपलब्धता होती. दुपारी दोनच्या सुमारास झेंडू कुठेच उपलब्ध नसल्याची खात्री झाल्यानंतर व्यापारी वृत्तीने आपले पाय पसरविण्यास सुरुवात केली. तासा तासाला ५० रुपयांनी भाव वाढवत अखेर दुपारी तीन वाजता ४०० रुपये किलोवर भाव स्थिरावला.

व्यापाऱ्यांनी केले झेंडूचे सोने
एक किलो खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी पाव किलो झेंडू खरेदी करत नाराजीनेच बाजारपेठ सोडली. शेतकऱ्याकडे झेंडू नसल्याने आणि जे आहेत त्यांची दोन दिवसांपूर्वीच कमी दरात विक्री झाल्याने शेतकऱ्यांना थेट विक्री करायची संधीच मिळाली नाही. या संधीचे नव्हे तर झेंडूचे सोने मात्र व्यापाऱ्यांनी करून घेतले.

दोन दिवसांपूर्वीच काढणी करून झेंडू मुंबईच्या बाजारपेठेत पाठविला. पंधरा दिवसांपासून ३० ते ४० रुपये इतकाच दर स्थानिक बाजारपेठेत राहिला. मुंबई बाजारपेठेत शंभर रुपयांच्या आसपास दर मिळाला. पण प्लॉटपासून अगदी नजीकच्या बाजारपेठेत झेंडूला इतका दर मिळाल्याचे पाहून आश्चर्य वाटले. पण याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही.

- मुकुंद बंडगर, झेंडू उत्पादक,उदगाव, जि. कोल्हापूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com