‘एसएओं’ना लवकरच सहसंचालकपदी बढती

अधिकाऱ्यांना पदोन्नतीचे वेध; कृषी आयुक्तालयाची माहिती
‘एसएओं’ना लवकरच सहसंचालकपदी बढती
Department Of AgricultureAgrowon

पुणे ः राज्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना (Superintendent Agriculture Officer) (एसएओ) आता पदोन्नतीचे वेध लागलेले आहेत. जवळपास १० अधिकाऱ्यांना लवकरच सहसंचालकपदावर बढती दिली जाणार आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या (Agriculture Commissionerate) सूत्रांनी दिली.

कृषी विभागात संचालकांपाठोपाठ सहसंचालकपद महत्त्वाचे समजले जाते. आकृतिबंधानुसार सहसंचालकांची मंजूर पदे १४ आहेत. मात्र, २५ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्य शासनाने प्रतिनियुक्तीवरील आणखी पाच पदांना मान्यता दिली. त्यामुळे कृषी विभागातील एकूण सहसंचालकांची संख्या आता १९ झाली आहे. सध्या नाशिक, ठाणे, पुणे व लातूर विभागाला पूर्णवेळ सहसंचालक नियुक्त करण्यात आलेला नाही.

कृषी विभागाकडे आकृतिबंधानुसार मंजूर असलेली एसएओंची पदे सध्या ४६ आहेत. प्रतिनियुक्तीवरील ५५, तर स्मार्ट प्रकल्पात एसएओंच्या १९ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कृषी विभागात एकूण एसएओंची पदे आता १२० पर्यंत गेलेली आहे. सध्याच्या १० एसएओंना सहसंचालकपदी पदोन्नती दिली गेल्यास १० कृषी उपसंचालकांना एसएओची बढती मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या एसएओंच्या यादीत सर्वांत पहिले नाव रफिक नाईकवडी यांचे आहेत. त्यांचे मूळ पद पुण्याच्या कृषी सहसंचालक कार्यालयातील एसएओचे आहे. परंतु सध्या कृषिमंत्र्यांच्या कार्यालयीन कामकामाची जबाबदारी सांभाळत असतानाच सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारदेखील त्यांच्याकडे आहे. याशिवाय पुण्याचे एसएओ ज्ञानेश्‍वर बोटे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, साखर सहसंचालक पांडुरंग शेळके, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुनील बोरकर, मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव प्रमोद लहाळे यांच्यासह नलिनी भोयर, तुकाराम मोरे, साहेबराव दिवेकर यांची नावे बढतीच्या यादीत असल्याची चर्चा आहे. अर्थात, यातील कोणते अधिकारी निकषात बसतात, याबाबत अंतिम निर्णय राज्य शासनाकडून घेतला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

चौकट ----
भोसलेंची बढती रखडली
कृषी संचालकपदासाठी नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले पात्र आहेत. मात्र त्यांच्या बढतीची फाइल गेल्या काही महिन्यांपासून सापडत नसल्याचे बोलले जाते. ‘‘फाइल जागेवरच आहे; पण एका उच्चपदस्थाने त्यांच्या बढतीची प्रक्रिया रखडविली आहे,’’ असे आस्थापना विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. कृषी विभागाच्या विस्तार कामकाजातील हुशार व कष्टाळू अधिकाऱ्यांमध्ये भोसले यांचे नाव घेतले जाते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com