भारतातून सोयापेंड निर्यात घसरली, जाणून घ्या कारण

सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन अर्थात S.E.A. च्या ताज्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2020 च्या तुलनेत डिसेंबर 2021 मध्ये तेलबियांपासून मिळणाऱ्या पेंडींची निर्यात घटली आहे. डिसेंबर 2020 मध्ये सर्व पेंडी मिळून 5,16,006 टनांची निर्यात झाली होती.
भारतातून सोयापेंड निर्यात घसरली, जाणून घ्या कारण
Soyameal

१) दक्षिण कोकणावर गेल्या तीन ते चार दिवसांपासून निर्माण झालेली चक्रवाताची स्थिती आता निवळली आहे. आज सकाळच्या चोवीस तासांपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात आकाश बहुतांशी निरभ्र होते. मध्य महाराष्ट्रात मात्र आज सकाळी दाट धुक्याची चादर पाहायला मिळाली. त्यात विशेषतः अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांमधील काही ठिकाणांचा समावेश होता. तसेच शनिवारपासून राज्याच्या किमान तापमानात वाढ होत असून, थंडी कमी होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर राज्यात येते पाच दिवस हवामान मुख्यतः कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

२) रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवडयोग्य क्षेत्र वाढले आहे. वाढलेल्या लागवड क्षेत्रामुळे खतांची मागणीही वाढली. मात्र, अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढवल्यामुळे महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडत नाहीये. याबाबत राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय खत आणि रसायन मंत्री मनसुख मांडविय यांना पत्र लिहून खतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी असल्याने वाढीव दरामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे खतांच्या किमती पूर्ववत कराव्यात, असे भुसे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

३) देशात रब्बी पिकांचा एकूण पेरा यंदा 1.2 टक्क्यांनी वाढला असून देशात आत्तापर्यंत 664 लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार यंदा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत पीक पेऱ्यात आठ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. त्याचबरोबर यंदा एकूण देशाचा विचार करता हवामानामुळे रब्बी पिकांची उत्पादकता खालावण्याची शक्यता सध्या दिसत नाही. हरियाणा आणि राजस्थानमध्ये रब्बीची पेरणी पूर्ण झाली असून महाराष्ट्राच्या पीक पेरणी अहवालानुसार राज्यात 99 टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावरची पेरणी आटोपली आहे. देशात रब्बीच्या कडधान्यांचे क्षेत्र कमी अधिक प्रमाणात गेल्या वर्षीइतकेच असून 160.2 लाख हेक्टरवर कडधान्यांचा पेरा आहे. तर दुसरीकडे तेलबियांमध्ये मात्र 21 टक्क्यांची क्षेत्रवाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 18 लाख हेक्टरने वाढ झाली आहे. मोहरीचे वाढलेले क्षेत्र हे यामागील मुख्य कारण असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

४) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून महागाई नियंत्रणासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. परिणामी, कडधान्य आणि खाद्यतेलांच्या किमतीचा आलेख आता खालावताना दिसतोय. गेल्या दोन लाटांच्या वेळेस कडधान्य आणि खाद्यतेलांच्या किमती वधारल्या होत्या. पण यावेळी मागणीच्या तुलनेत मुबलक पुरवठा असून सरकारी हस्तक्षेपामुळे भाववाढ मंदावली आहे. होटेल, रेस्टॉरंट, आणि केटरिंग क्षेत्रावर पुन्हा निर्बंध आल्याने पामतेलासारख्या काही जिन्नसांच्या किमतीत घट झाली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीतून हे निष्कर्ष पुढे आलेत.

व्हिडीओ पाहा - 

५) सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन अर्थात S.E.A. च्या ताज्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2020 च्या तुलनेत डिसेंबर 2021 मध्ये तेलबियांपासून मिळणाऱ्या पेंडींची निर्यात घटली आहे. डिसेंबर 2020 मध्ये सर्व पेंडी मिळून 5,16,006 टनांची निर्यात झाली होती. पण गेल्या डिसेंबरमध्ये फक्त 1,70,338 टन पेंड निर्यात होऊ शकली आहे. पेंड निर्यातीत झालेली ही 67 टक्के घट ही सोयापेंड आणि मोहरी पेंड निर्यात कमी झाल्याचा परिणाम असल्याचे S.E.A. ने म्हटले आहे. तर एप्रिल ते डिसेंबर 2021 या कालावधीत एकूण  17,66,687 टन पेंड निर्यात झाली असून त्यापूर्वीच्या वर्षी याच कालावधीत 24,67,564 टन पेंड निर्यात झाली होती. याचाच अर्थ एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत पेंड निर्यात 28 टक्क्यांनी घसरल्याचे S.E.A. चे म्हणणे आहे. त्यातही यंदा सोयाबीन उत्पादकांनी मालाची टप्प्याटप्प्याने विक्री केल्याने सोयाबीनच्या दरांना आधार मिळालाय. तर, देशांतर्गत पेंड विक्रीला मर्यादा येत असल्याचे S.E.A. ने म्हटले आहे. देशातल्या सर्व प्रमुख बाजारांमध्ये सोयाबीनची भावपातळी सध्या 6300 च्या घरात आहे. दुसरीकडे देशात सोयाबीनचे क्रशींग मंदावल्याने कच्च्या सोयाबीन तेलाची आयात वाढली आहे. त्यामुळे येते दोन ते तीन महिने भारतातून सोयापेंडीची निर्यात परवडण्यासारखी राहणार नाही, असे दिसते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com