साखर निर्यात जोरात ?

भारतीय साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामातील ऑक्टोबर-डिसेंबर अखेरीस १७ लाख टन साखर निर्यात केली आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत ४.५ लाख टन साखर निर्यात झाली होती. त्या तुलनेत यंदाच्या साखर निर्यातीचे प्रमाण २७७ टक्क्यांनी वाढले आहे.
साखर निर्यात जोरात ?
Sugar Export

जानेवारी २०२२ अखेरपर्यंत आणखी ७ लाख टन साखरेची निर्यात अपेक्षित असल्याचा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनकडून  (ISMA ) व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय निर्यातदारांनी यापूर्वीच ३८ ते ४० लाख टन साखर निर्यातीचे करार करून ठेवलेले आहेत. मात्र जागतिक बाजारातील साखरेच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे निर्यातदारांकडून 'वेट अँड वॉच' चे धोरण अंगिकारण्यात आले आहे.

जागतिक बाजारातील साखरेचे दर प्रति पौंड १८ सेंट्सने घसरले असून या दराने गेल्या पाच महिन्यांतील नीचांकी स्तर गाठला आहे. २०२२-२०२३ मध्ये (एप्रिल-मार्च) साखरेचे दर वधारण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.  

भारतीय कारखाने योग्य दरासाठी अचूक संधीची वाट पाहात असून निर्यातीचे आगामी करार करण्याबाबत त्यांना कसलीच घाई नसल्याचे ISMA च्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.  १ ऑक्टोबर ते जानेवारी १५ या काळात देशभरात १५१. ४१ लाख टन साखर उत्प[दनाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या हंगामात या कालावधीत १४२. ८७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा त्यात ६ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या हंगामात देशभरातील ४८७ कारखाने सक्रिय होते. यंदाच्या गाळप हंगामात ५०४ कारखाने पूर्ण क्षमतेने सक्रिय आहेत.    

महाराष्ट्रात जानेवारीच्या मध्यापर्यंत ५४.८४ लाख टन साखरेची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या हंगामात जानेवारीपर्यंत साखर उत्पादनाचे प्रमाण ५१.५५ लाख टन होते. राज्याच्या साखर उत्पादनात यंदा १४ टक्क्यांनी वाढ पहायला मिळालेली आहे.  दरम्यान उत्तर प्रदेशने यंदा जानेवारीपर्यंत केवळ ४०.१७ लाख टन साखर उत्पादित केली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच कालावधीत उत्तर प्रदेशातीळ साखर उत्पादनाचे प्रमाण ४२. ९९ लाख टन एवढे होते.

देशातील तिसऱ्या क्रमांकाचे साखर उत्पादक राज्य असा नावलौकिक असलेल्या कर्नाटकात यंदा जानेवारीच्या मध्यापर्यंत ३३. २० लाख टन साखर उत्पादित करण्यात आली आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत राज्यात केवळ २९. ८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.

२०२१-२०२ च्या हंगामातील देशभरातील साखर उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जानेवारी महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात येणार असल्याचे ISMA ने आपल्या निवेदनात नमूद केले आहे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.