शिवसेनेत बंड

शिवसेनेत बंड

महाविकास सरकार अडचणीत

मुंबई : शिवसेनेचे दिग्गज नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ३५ आमदारांसह बंड करत गुजरातमध्ये जात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांना खिंडीत गाठले. दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदावरून दूर केले आहे. शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांसोबत फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare), गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईही (Shambhuraj Desai) असल्याचे सांगण्यात आले.

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा एक उमेदवार पराभूत झाल्यानंतर महाविकास आघाडीतील आमदारांची फूट समोर आल्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह बंड केल्यानंतर काही वेळातच त्यांची शिवसेना गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.
सोमवारी (ता.२०) विधानपरिषदेसाठी मतदान झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह बंगल्यावर गेले. तेथून ठाण्याला जात थेट सुरतला रवाना झाले. शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा संपर्क होत नसल्याने सतर्क झालेल्या शिवसेना नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या. रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्याच चर्चा सुरू होती. एकनाथ शिंदे हे समर्थक आमदारांसह गुजरातमध्ये गेल्याने भाजपशी त्यांची हातमिळवणी होईल, असे बोलले जात आहे. शिंदे यांची समजूत काढण्यासाठी ठाकरे यांचे निकटवर्तीय शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक गुजरातला रवाना झाले. सायंकाळी पाचच्या दरम्यान ते सुरतमध्ये शिंदे राहत असलेल्या मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या.

शिवसेनेत बंडाळी माजली असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत रवाना झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि फडणवीस यांची दीर्घकाळ बैठक झाली. तसेच राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचीही पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे बंड हा शिवसेनेचा पक्षांतर्गत मामला आहे. त्यामुळे तो पक्ष याचा फैसला करेल, असे सांगितले. तसेच रात्री आठच्या दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे आणि आपण चर्चा करत असल्याचेही सांगितले. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना राष्ट्रवादीच्या आमदारांचे अपहरण करून हरियानात ठेवण्यात आले होते, तसाच हा प्रकार असावा, असेही ते म्हणाले. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे हे रश्मी ठाकरे यांच्या सातत्याने संपर्कात होते. त्यांनी आपण बंड करीत नसून किमान आपल्या मागण्या तरी मान्य कराव्यात, असे सांगत होते.


ठाकरेंच्या बैठकीला ३५ आमदार
मंगळवारी सकाळी उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी आमदारांची बैठक बोलाविली. या बैठकीला ३० ते ३५ आमदार असल्याची माहिती शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी दिली. तसेच शिंदे यांच्यासोबत १० ते १५ आमदार गेल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांनी बंड केले असून भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केल्याचे सांगितले. तसेच शिवसेनेचे आमदार स्वखुशीने नव्हे तर त्यांचे अपहरण केले आहे, असेही ते म्हणाले. शिवसेनेतील बंडामुळे धुरळा उठला असतानाच काँग्रेसच्या चार आमदारांचा संपर्क होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडींचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

सत्तेसाठी प्रतारणा करणार नाही : शिंदे
शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात गोंधळ उडाला असताना त्यांनी टि्वट करत ‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,’ असे ट्विट केले. त्यामुळे अधिकच संभ्रम वाढला.


आमदारांना मारहाण : संजय राऊत
बंडाबाबत बोलताना शिवसेना खासदार राऊत म्हणाले, ‘मलाही
ईडीची नोटीस आली, पण मी घाबरून पक्ष सोडला नाही. काहीजण दबावात आले असतील. मला नोटीस आली. अनिल परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेले आहेत. त्यामुळे दबावात येणे हे शिवसेनेला माहीत नाही. आमच्या आमदारांना गुजरातमध्ये नेऊन मारहाण केली आहे. आज सकाळी झालेल्या बैठकीला ३१ आमदार होते. त्यांच्या सह्या आहेत. प्रताप सरनाईक, सुहास कांदे यांच्यासह अनेक आमदार परत आले आहेत. त्यामुळे फारसा काही फरक पडणार नाही.’

शिंदेंची नाराजी का?
शिंदे हे विधीमंडळातील शिवसेना गटनेते असले तरी त्यांना प्रत्यक्षात काहीच अधिकार देण्यात आले नाहीत. नगरविकास हे वजनदार खाते असूनही त्यांच्या खात्याची अनेक कामे गेल्या वर्षभरापासून थांबविण्यात आली आहेत. त्यामुळे शिंदे यांनी समर्थक आमदारांच्या मतदारसंघात दिलेली कामे झालेली नाहीत. तसेच संघटनात्मक पातळीवर शिंदे यांना पूर्णपणे डावलण्यात आले आहे. शिवसेनेत बाजूला पडलेल्या रामदास कदम यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी कदम यांना पुन्हा सक्रिय होण्याचे आवाहन केले होते. मात्र त्याला शिवसेना नेतृत्वाने फारसा प्रतिसाद दिला नाही. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडेच सगळी सूत्रे दिल्याने शिंदे नाराज होते. तसेच शिंदे समर्थक आमदारांना मातोश्री, वर्षा निवासस्थांनासह आणि मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला होता.

भाजपमध्ये बैठकांचे सत्र
दिल्लीत गेलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे. पी. नड्डा आणि आणि अमित शहा यांच्याशी दीर्घ चर्चा केली. तसेच दुपारनंतर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड हेही गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘नेतृत्वाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आलो आहे’ असे सूचक वक्तव्य केले. शरद पवारही दिल्लीहून मुंबईकडे तातडीने रवाना झाल्यानंतर महाविकास आघाडीची वर्षा निवासस्थानी बैठक बोलविण्यात आली. सहा वाजता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते वर्षा निवासस्थानी दाखल झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com