Top 5 News: रशिया-युक्रेन संघर्षाचा भारतीय शेतमाल बाजारावर परिणाम होणार?

युरोप खंडात पुन्हा एकदा युद्धाची खरीखुरी शक्यता निर्माण झाली आहे. रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाचा भारतीय शेतमाल बाजारावर काय परिणाम होऊ शकतो, वाचा सविस्तर...
Indian Commodity Markets
Indian Commodity Markets

1. सध्या पंजाबपासून झारखंडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय (trough). त्यामुळे वायव्य भारतातले थंड वारे खाली सरकतायत. तर पुढे ते गुजरात, महाराष्ट्र, आणि कर्नाटकात येऊन स्थिरावताना दिसतायत. देशातल्या वायव्य भागात सध्या थंडीच्या लाटेची दाट शक्यता (cold wave conditions) असून वाऱ्यांच्या चालीमुळे ही लाट उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे 26 आणि 27 जानेवारीला उत्तर मध्य महाराष्ट्राला (North Madhya Maharashtra) थंडीच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. तर गेल्या आठवड्याच्या शेवटी मध्य महाराष्ट्र, कोकण, आणि वऱ्हाडातल्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावल्याने (light to medium rainfall) या भागांमध्ये गारठा वाढला असून, सुर्यप्रकाशाचा जोर कमी पडताना दिसतोय.

2. इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने देशांतर्गत इथेनॉल निर्मितीवर (Ethanol production) भर दिलाय. परिणामी, देशातल्या साखर क्षेत्रातून इथेनॉलचा पुरवठा वाढण्याचा अंदाज आहे. कारण साखर कारखाने  (Sugar factories) जानेवारीपासून दर महिन्याला 4 ते 5 नवे आसवणी प्रकल्प किंवा प्रकल्पांचा विस्तार करण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्याकडून (Oil marketing company) इथेनॉल खरेदीची गती वाढण्याचीही शक्यता आहे. केंद्र सरकारच्या इथेनॉल कार्यक्रमांतर्गत 2021-22 मध्ये सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यानी 459 कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्यासाठी निविदा काढल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्याकडून इथेनॉलला मागणी असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. अतिरिक्त ऊस आणि साखरेचे उत्पादन इथेनॉलकडे वळते केल्यास साखर कारखान्यांना आर्थिक पाठबळ मिळू शकते. त्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना साखर आणि इथेनॉल निर्मितीचा ‘ब्राझील पॅटर्न’ राबवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

3. हळदीच्या (Turmeric) उत्पादनात वऱ्हाडात आघाडीवर असलेल्या वाशीम जिल्ह्यात रिसोड वगळता हळद विक्रीची सुविधा नव्हती. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत वाशीम बाजार समितीत आता हळदीचे दर शनिवारी लिलाव केले जाणार आहेत. या हळद लिलावाला नुकतीच सुरुवात करण्यात आली. उद्घाटनाच्या दिवशी हळदीला 8201 रुपये क्विंटल भाव मिळालाय. वाशीममध्ये हळदीचा बाजार सुरू झाल्याने जिल्ह्यातल्या उत्पादकांना आता स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध झाली आहे. याआधी जिल्ह्यातले शेतकरी हळद विक्रीसाठी मराठवाड्यातल्या बाजारपेठांवर अवलंबून होते. आता त्यांचा वाहतुकीचा खर्च वाचू शकेल, असा विश्‍वास बाजार समितीने (APMC) व्यक्त केलाय.

4. गेल्या दोन महिन्यांपासून सांगलीत बेदाण्याला (Raisins) मागणी असल्याने बेदाण्याची भावपातळी टिकून आहे. सध्या बेदाण्याला 120 ते 230 रुपये किलो असा भाव मिळतोय. बेदाणा निर्मितीचा हंगाम नुकताच सुरू झाला असला तरी व्यापारी नवीन मालाची वाट पाहत आहेत. पण, हवामान बदलाचा परिणाम बेदाणा निर्मितीवर झाला असल्याने नवीन बेदाणा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच येण्याची शक्यता असल्याची माहिती बेदाणा उद्योगातल्या जाणकारांनी व्यक्त केलीय.

हा व्हिडिओ पाहिलात का? : 

5. पूर्व युरोपमध्ये स्थित (East Europe) युक्रेन या देशाचा युरोपिय महासंघ (EU) आणि अमेरिका पुरस्कृत ‘नेटो’ (NATO) या सुरक्षा संघटनेत सामील होण्याचा विचार आहे. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन युक्रेनकडे (Ukraine) आपले मांडलिक राष्ट्र असल्याच्या भावनेतून पाहत असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे. परिणामी, त्यांना युक्रेनने नेटो किंवा युरोपिय महासंघात सामील होणे पसंत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर रशियाने युक्रेनच्या सिमेवर तब्बल एक लाख सैनिक गोळा केले असल्याचे जागतिक माध्यमांनी म्हटले आहे. आमचा युक्रेनवर हल्ला करायचा कोणताही इरादा नाही, असे स्पष्टीकरण रशियाने (Russia) दिले असले तरी दुसरीकडे अमेरिकेने (US) रशिया आक्रमण करू शकते, असे म्हटले आहे. या भागात तणाव निर्माण होऊन व्यापारी मार्ग विस्कळीत झाले किंवा युद्ध टाळण्यासाठी अमेरिकेने रशियावर अतिरिक्त आर्थिक निर्बंध (Economic sanctions) लादले, तर त्याचा प्रभाव भारतावरही पडू शकतो. युक्रेन हा जगातील आघाडीच्या मका आणि गहू उत्पादक देशांपैकी एक आहे. या संघर्षाच्या वेळी आखाती देश, दक्षिण आशिया, आणि आग्नेय आशियात भारताची मका आणि गहू निर्यात वाढू शकते. भारतीय निर्यातदार या भागांमध्ये तुलनेने लवकर माल पोहोचवू शकतात. त्यासाठी लागणारे जहाजाचे भाडे अमेरिका खंडातल्या मका निर्यातदारांच्या तुलनेत कमी असण्याची शक्यता आहे. तसेच खरेदीदारांना आपात्कालिन परिस्थितीसाठी छोट्या प्रमाणात माल विकत घेता येऊ शकतो. पण असे असले तरी युक्रेन सुर्यफूल आणि सुर्यफूल तेलाचा (Sunflower oil) आघाडीचा देश आहे. तिथला व्यापार प्रभावित झाल्यास भारतात युक्रेनमधून आयात होणारे सुर्यफूल तेल महागू शकते. तर या आयातीवर परिणाम झाल्यास भारतात सोयाबीन तेलाचे दर वाढू शकतात. पाम तेलाचे भाव या आधीच उच्चांकी पातळीवर आहेत. पण पाश्चिमात्य देशांनी या संभाव्य संघर्षाविरोधात कोणतेच पाऊल उचलले नाही, तर मात्र हा परिणाम टाळता येऊ शकतो. त्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यातला तणाव निवळतो की चिघळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com