कांदा भाव पडले, उपाय काय?

कांद्याचे भाव देशांतर्गत बाजारांमध्ये पडत असताना येते काही दिवस कांदा भाव सावरण्याची आयती संधी चालून आली आहे. ती काय आणि कशी, वाचा पूर्ण बातमी.
Onion Export News
Onion Export News

पुणे : गेल्या एका आठवड्यापेक्षा जास्त काळापासून लासलगाव बाजार समितीत कांद्याचे भाव सातत्याने तुटत आहेत. खरिपात उशिरा पेरणी झालेला (late Kharif), आणि रब्बीच्या सुरुवातीचा (early Rabi) माल एकत्रच बाजारात येत असल्याने तात्कालिक पुरवठा मागणीच्या तुलनेत भरमसाठ वाढला. त्यामुळे दरांवर परिणाम झाला. पण दुसरीकडे बांगलादेशमध्ये कांद्याचा स्थानिक पुरवठा कमी पडल्याने किरकोळ बाजारात भावापातळी 20 रुपयांनी वधारली आहे. गेल्या चार ते पाच आठवड्यांमध्ये भाव दुप्पट झाले आहेत. त्यामुळे भारतीय कांदा उत्पादकांना निर्यातीसाठी संधी (onion export) आहे. ही जमेची बाजू म्हणता येईल.

लासलगाव बाजारात गेल्या आठवडाभरात लाल कांद्याची १,३९,४२६ क्विंटल आवक (red onion arrivals) झाली. लाल कांद्याच्या ज्या मालाला एका आठवड्याआधी क्विंटलमागे ₹२१७० चा भाव होता, तोच आता ₹१६५० रुपयांवर आला आहे. म्हणजेच एका आठवड्यात ₹५२० घट झाल्याचे स्पष्ट होते. तसेच एका आठवड्यात २२३० क्विंटल आवक झालेल्या उन्हाळ कांद्यात तर ₹८५१ ची घसरण झाली. कारण आठवडाभराच्या आधी ₹२४५१ रुपयांवर असलेले भाव आज ४ मार्चला ₹१६०० वर आलेत. हे सर्व सर्वसाधारण दर आहेत. कमाल आणि किमान भावात चढ उतार कायम आहे.

असे असताना कांदा उत्पादक चिंताग्रस्त होणे साहजिक आहे. पण या सगळ्यातून मार्गच नाही असे नाही. बांगलादेशात तिथले नवे कांदा पीक यायला अजून दोन आठवड्यांचा वेळ आहे. त्यामुळे ढाका सदर बाजारातील कालचे भाव पाहिल्यास कांदा भाव अजूनही वधारलेले दिसतात. अशा परिस्थितीत तिथे नव्या आवकेच्या आधी कांद्याच्या तुटवड्याची परिस्थिती आहे.

“सध्याची परिस्थिती पाहता बांगलादेशात नवं पीक येण्याआधी भारतातल्या कांद्याला १५ मार्चपर्यंत चांगला उठाव अपेक्षित आहे. त्यात मार्चमध्ये महाराष्ट्र आणि देशभरातल्या अर्ली रब्बी आणि लेट खरीपाच्या कांद्याची आवकही वाढणार आहे,”

- दीपक चव्हाण, कांदा बाजार विश्लेषक

१५ मार्चनंतर बांगलादेशमधील पबना या मुख्य कांदा उत्पादक जिल्ह्यातील ४५ हजार हेक्टरवरचा ६ लाख टन कांदा टप्प्याटप्प्याने बाजारात येईल. यावर पुढचे दोन ते तीन महिने स्थानिक गरज भागेल. बांगलादेशमध्ये वर्षाकाठच्या एकूण उत्पादनातील ३३ टक्के वाटा एकट्या पबना जिल्ह्यातून येत असतो. म्हणून मग बांगलादेशात कांदा पाठवता येईल (onion export).

“भारतीय कांद्याला बांगलादेशमध्ये निर्यातीसाठी पडतळ आहे. पण त्यातही ही पडतळ गोल्टी कांद्याला आहे. बांगलादेशसाठी गोल्टी कांद्याला सध्या ₹१४ वर पडतळ असून भाडे ₹७ आहे. तसेच सध्या आपल्याकडून बांगलादेशला निर्यातही चालू आहे,”

- पांडुरंग देवरे, कांदा निर्यातदार, उमराणे

एकूण आपल्याकडे जास्त पुरवठा - कमी भाव तर बांगलादेशमध्ये याच्या बरोबर विरुद्ध स्थिती आहे. येते दहा ते बारा दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. भरीस भर म्हणजे भारतात पश्चिम बंगालच्या सुखसागर भागातील लेट खरीप कांदाही उशिरा आला आहे. त्यामुळे ती आवकही सध्या सुरू आहे. त्यामुळे राज्यातील गोल्टी कांद्याच्या निर्यातीला वाव आहे, असे स्पष्ट दिसते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com