ज्वारी वाणाची विविधता : मूल्यवर्धनातून बीजसंवर्धन

ज्वारी जात ः गूळभेंडी
ज्वारी जात ः गूळभेंडी

कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीचे विविध वाण आपापल्या शेतात जतन करून ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात. मुख्यतः भाकरी या दैनंदिन अन्नघटकासाठी ज्वारीची लागवड होत असली, तरी याचे अन्य उपयोग आहेत. प्रत्येक उपयोगासाठी एक वेगळा गुणधर्म असलेला ज्वारीचा वाण आपल्याला पाहायला मिळतो.   

पंढरपूरची आषाढी वारी विठ्ठल भक्तांसाठी पर्वणी असते. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून तसेच शेजारी राज्यांतूनही वारकरी संप्रदायाचे स्त्री-पुरुष या वारीत सामील होतात. यांपैकी बहुतेक जण पारंपरिक शेतकरी असतात. त्यांपैकी अनेक जण वारीच्या परंपरेप्रमाणेच शेतातही वैशिष्ट्यपूर्ण बीज राखण्याची परंपरा चालवतात. शेती जीविधा अभ्यासकांसाठी हे वारकरी म्हणजे पारंपरिक बी- बियाणे, पीकपद्धती, शेतीसंस्कृतीचे चालते बोलते ज्ञानकोश. याचे महत्त्व जाणून आटपाडीच्या शेती परिवार कल्याण संस्थेने आषाढी वारीमध्ये ‘बीजरथ’ या माध्यमातून जवळजवळ १००२ शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकरी पारंपरिक बियाणे का व कसे राखतात हे समजून घेण्याचा प्रयत्न झाला. त्यापैकी ज्वारी हे अत्यंत महत्त्वाचे पीक असल्याचे लक्षात आले. कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीचे विविध वाण आपापल्या शेतात जतन करून ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र जनुक कोश प्रकल्पांतर्गत या सर्व वाणांची शोधमोहीम हाती घेण्यात आली. या संवाद साधलेल्या शेतकऱ्यांपैकी ८७ टक्के शेतकऱ्यांना पारंपरिक वाणांविषयी माहिती होती. ३० टक्के शेतकरी स्वतःच्या शेतात पारंपरिक वाण लागवड व जतन करतात, तर १५ टक्के शेतकऱ्यांनी पारंपरिक वाण लागवड करण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

ज्वारीचे क्षेत्र 

 •  ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख कोरडवाहू पीक. महाराष्ट्रातील खरीप व रब्बी दोन्ही हंगाम मिळून ५५ लाख हेक्टर क्षेत्र ज्वारी पिकाखाली आहे. 
 •  भारताच्या एकूण ज्वारीच्या क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्र व उत्पादनापैकी ५७ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात सर्वसाधारण ५५ लाख हेक्टर क्षेत्र ज्वारी लागवडीखाली येते. त्यापैकी २२ लाख हेक्टर  (४० टक्के) खरिपात तर ३३ लाख हेक्टर (६०टक्के) रब्बीत हंगामात येते. 
 •  खरीप हंगामात जरी क्षेत्र कमी असले तरी या हंगामात संकरित वाणांचा वापर जास्त होत असल्यामुळे खरीप हंगामातील उत्पादन हे रब्बी हंगामातील उत्पादनापेक्षा जास्त असते. रब्बी हंगामात मात्र संकरित वाणांऐवजी पारंपरिक किंवा सरळ वाण वापरण्यावर शेतकऱ्यांचा जास्त कल आहे. 
 •  रब्बी हंगामातील हे ज्वारीचे पीक मुख्यतः महाराष्ट्राच्या अवर्षणप्रवण क्षेत्रात घेतले जाते. सोलापूर हा जिल्हा तर महाराष्ट्राचे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो.
 •  मुख्यतः भाकरी या दैनंदिन अन्नघटकासाठी ज्वारीची लागवड होत असली तरी याचे अन्य उपयोग आहेत. प्रत्येक उपयोगासाठी एक वेगळा गुणधर्म असलेला ज्वारीचा वाण आपल्याला पाहायला मिळतो.   
 • पारंपरिक वाणांच्या लागवडीची कारणे   ज्वारीच्या विविध वाणांचा रोजच्या जीवनाशी, सण- परंपरांशी असलेला संबंध लक्षात येतो. उदा. लाह्यांकरिता कावळी ज्वारीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले, की नागपंचमीच्या सणाला घरी लाह्या लागतात. त्याकरिता नेहमीच्या ज्वारीबरोबर कडेला चार-पाच ओळी कावळी ज्वारीची लागवड आम्ही करतो. हुरड्याकरिता गूळभेंडी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मतानुसार घरी खायला चांगला हुरडा पाहिजे. शिवाय पै पाहुणे येतात, त्यांना द्यायला हुरडा पाहिजे, याकरिता चार-पाच ओळी या गूळभेंडी ज्वारीची लागवड आम्ही करतो. व्हंडी ही ज्वारी मुख्यतः पशुपालक शेतकरी खास वैरणीकरिता लागवड करीत असतात. हे वाण जतन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून ज्वारी पिकाचे विविध गुणधर्म असणारे विविध वाणांची माहिती मिळाली.

  ज्वारीच्या वाणांची वैशिष्ट्ये

 •  ज्वारी वाणांच्या तपासणीसाठी डीयूएस तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे नियोजन केले. यामध्ये प्रामुख्याने विशिष्टता, सार्वत्रिकता आणि शाश्वतता तपासणी केली. याकरिता काही प्राथमिक तुलनात्मक निरीक्षणे तयार केलेली आहेत.
 •  उदाहरणार्थ कावळी व गूळभेंडी हे ज्वारीचे वाण अनुक्रमे लाह्या व हुरडा या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत, तर या गुणधर्माचे नेमके काय वैशिष्ट्य यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल याकरिता या दोन्ही वाणांचा इतर वाणांच्या तुलनेत लाह्या आणि हुरडा तयार करून त्याचे शेकडा प्रमाण काढण्यात आले. त्यातून लक्षात आले, की गूळभेंडी ज्वारीपासून सर्वांत जास्त हुरडा मिळतो, लाह्या मिळण्याचे प्रमाण सर्वांत कमी आहे. कावळी या ज्वारीपासून लाह्या मिळण्याचे प्रमाण इतर वाणांपेक्षा सर्वांत जास्त आहे, तर हुरडा सर्वांत कमी मिळतो.
 •   खवैयांच्या मते गूळभेंडी वाणाचा हुरडा इतर वाणांच्या हुरड्यापेक्षा अधिक चवदार, विशिष्ट सुगंध देणारा व लसलुशीत असतो. कावळी वाणाच्या लाह्या इतर वाणांच्या लाह्यांपेक्षा अधिक नाजूक, चवदार व खुसखुशीत असतात. 
 •   निष्कर्ष 

 •  प्रचलित असलेल्या मालदांडी या वाणापेक्षा कावळी आणि गूळभेंडी या वाणांचे धान्य उत्पादन कमी आहे. अर्थातच घाऊक बाजारात धान्य स्वरूपात विक्री करताना मालदांडीपेक्षा खूपच कमी आर्थिक लाभ झाला. अशा वेळी शेतकरी या वाणांच्या लागवडीपासून परावृत्त होतो. परंतु जर मूल्यवर्धनाची प्रक्रिया केली तर हेच वाण अधिक आर्थिक लाभ देऊ शकतात. याच धर्तीवर व्हंडी ज्वारीचे तयार मुरघास, तयार हुरडा ही उत्पादने घेता येऊ शकतात. 
 • योग्य बीजनिवड पद्धत अवलंबून प्रतिएकरी उत्पादन वाढवणे, प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे व संगठित होऊन विक्री करणे या शेतकऱ्यांना सहज आत्मसात होणाऱ्या बाबींनी पारंपरिक वाणांचे बीज संवर्धन करणे सहज शक्य आहे.
 • - प्रसाद देशपांडे, ९४२३०३७०९४ (लेखक आटपाडी, जि. सांगली येथील शेती परिवार कल्याण संस्थेचे अध्यक्ष आहेत)   

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com