वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेत उद्भवणाऱ्या समस्या, उपाययोजना

 वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेत उद्भवणाऱ्या समस्या, उपाययोजना
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेत उद्भवणाऱ्या समस्या, उपाययोजना

सध्याच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या वाढीतील द्राक्षबागेमध्ये वाढत्या तापमानामुळे काही ठिकाणी समस्या उद्भवताना दिसतात, तर काही ठिकाणी त्याचा फायदा होताना दिसतो. ज्या ठिकाणी अडचणी आहेत, त्यावर पुढील उपाययोजना महत्त्वाच्या असतील. १) स्थानिक बाजारपेठेकरिता गोड द्राक्षाची गरज ः या बागेमध्ये लांब मण्याच्या द्राक्ष जाती प्राधान्याने आढळून येतील. उदाहरणात, माणिक चमन, सुपर सोनाका, आरके सीडलेस आदी या द्राक्ष जाती ग्राहकांपर्यंत पोचते वेळी जितक्या पिवळ्या रंगाची असतील, तितकी पसंती अधिक मिळते. मणी पिवळा असणे म्हणजेच त्यामध्ये गोडी जास्त असणे. ही परिस्थिती आपल्याला पोटॅशच्या उपलब्धतेमुळे मिळू शकते. मात्र, जर या वेळी पानांची कार्यक्षमता कमी झालेली असल्यास याचा फायदा होणार नाही. या वेळी शक्यतो मुळांचीही कार्य करण्याची क्षमता कमी झालेली असेल. त्यामुळे जमिनीतूनसुद्धा उपलब्ध केलेले अन्नद्रव्यापैकी काही प्रमाणात वेलींना उपलब्ध होते. फवारणीच्या माध्यमातून अन्नद्रव्ये दिल्यास यापेक्षा चांगले परिणाम मिळतात. सल्फेट ऑफ पोटॅश (०-०-५०) ३ ते ४ ग्रॅम प्रतिलिटर दोन ते तीन फवारण्या सायंकाळच्या वेळी करता येतील. दुसऱ्या परिस्थितीत घडाच्या मागील व पुढील प्रत्येकी दोन पाने गाळल्यास किंवा काढून टाकल्यास तो घड सूर्यप्रकाशामध्ये येईल. अशा परिस्थितीत मणी पिवळा होण्यास मदत होईल. परंतु, द्राक्ष घड जास्त काळ प्रखर सूर्यप्रकाशात राहिल्यास मणी डागाळण्याची समस्याही उद्भवू शकते. तेव्हा घडावर अर्धा सूर्यप्रकाश व अर्धी सावली राहील, याची काळजी घ्यावी. २) मण्यात गोडी कमी येण्याची कारणे ः बऱ्याचशा बागेत वाढत्या तापमानात मण्यामध्ये गोडी येत नसल्याचे दिसून येते. तुळजापूर (जि. सोलापूर) या भागात पाहणी करते वेळी लाल कोळीचा प्रादुर्भाव आढळून आला. या प्रादुर्भाव असलेल्या बागेमध्ये पाने करपल्यासारखी किंवा सुकल्यासारखी दिसून येतात. या पानांमध्ये हरितद्रव्ये कमी झालेले आढळून येईल. यामुळे पानांची कार्य करण्याची क्षमता कमी झालेली असते. मण्यात गोडी मिळण्याकरिता कार्यक्षम पानांचा महत्त्वाचा वाटा असतो. ज्या बागेत लाल कोळीचा प्रादुर्भाव झालेला आहे, अशा बागेत मण्यात गोडी येण्यास विलंब लागेल किंवा गोडी मिळणे कठीण होईल. या बागेत उपाययोजना म्हणून अॅबामेक्टिन (१.९ ईसी) ०.७५ मि.लि. प्रतिलिटर पाणी किंवा बायफेनाझेट (Bifenazate) (२२.५ एसी) ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. या कीटकनाशकांचा पीएचआय ३० दिवसांचा असल्यामुळे आपल्या बागेतील छाटणीचा दिवस व आपली गरज यानुसार निर्णय घ्यावा. ३) मिली बगचा प्रादुर्भाव ः बऱ्याचशा बागेमध्ये वाढत्या तापमानात मिली बगचा प्रादुर्भाव दिसून येतो. ही कीड खोडापासून ओलांडण्यापर्यंत ते घडाच्या मण्यात प्रवेश करताना दिसून येते. या किडीचा प्रादुर्भाव जास्त झालेला असल्यास द्राक्ष घड खाण्याजोगा राहत नाही. या वेळी कीटकनाशकांच्या फवारणीची शिफारस केली जात नाही. सिलिकॉनयुक्त सरफॅक्टंटचा वापर करून खोड, ओलांडा व द्राक्ष घड व्यवस्थितरीत्या धुवून घेतल्यास मिली बगचा प्रादुर्भाव कमी करता येईल. याकरिता साधारणपणे १० ते १२ लिटर द्रावण सिंगल गनचा वापर केल्यास परिणाम चांगले मिळतील. ४) लवकर छाटणी झालेल्या बागेत किडींचा प्रादुर्भाव नाशिक जिल्ह्यातील सटाणी तालुका, तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर व बोरी भागामध्ये खरड छाटणी लवकर घेतली जाते. या बागांमध्ये छाटणीनंतरच्या काळात वाढत्या तापमानात किडींचा प्रादुर्भाव विशेषतः उडण्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. काही परिस्थितीत डोळे फुटल्यानंतर नवीन कोवळ्या फुटीवर थ्रिप्स दिसून येईल. चार ते पाच पाने असलेल्या फुटींच्या अवस्थेत मिली बगच्या प्रादुर्भावामुळे पूर्ण फूट गुंडाळलेली दिसून येईल. अशा बागेत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.४ मिली प्रतिलिटर पाणी यांची ड्रेंचिग केल्यास वर दिलेल्या किडींवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल. ५) रिकट घेतलेल्या बागेतील किडीची समस्या या बागेत नवीन फुटी ओलांडा तयार करते वेळी आपण तारेवर वळवताना बागेमध्ये पाणी बऱ्यापैकी वापरले गेले असते. वाढत्या तापमानात आर्द्रताही तितकीच वाढलेली दिसेल. अशा स्थितीमध्ये थ्रिप्ससारखी रसशोषक कीड जोरात प्रादुर्भाव करते. या किडीचा जास्त प्रादुर्भाव असल्यास पानांच्या वाट्या होताना दिसतील, पाने चुरगळल्यासारखी दिसतील, फुटींची वाढ थांबेल व पानांचा आकारही कमी होईल. असे झाल्यास ओलांडा व त्यावर मालकाडी तयार करणे कठीण होईल. या प्रभावी उपाययोजना म्हणून अनावश्यक असलेल्या बगलफुटी आधी काढून घ्याव्यात. यामुळे फवारणीचे कव्हरेज व्यवस्थित होऊन कीड नियंत्रणात येईल. यानंतर फिप्रोनील (८० डब्ल्यूजी) ०.०६ ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा इमामेक्टिन बेंझोएट (५ एसजी) ०.२२ ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा सायअॅण्ट्रानिलीप्रोल (१० ओडी) ०.७ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी केल्यास या किडीवर नियंत्रण शक्य होईल. कोणतीही फवारणी उन्हामध्ये घेऊ नये. अन्यथा, स्कॉर्चिंग येऊ शकते. संपर्क ः डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६००१ डॉ. डी. एस. यादव, ०२०-२६९५६०३५ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com